Wednesday, July 17, 2019

लुटूपुटूचा डाव


लुटूपुटूचा डाव
लुटूपुटूचा डाव मांडूया
तुझा नि माझा खेळ रंगवूया
सारथी तू अन सोबती मी
स्वप्नातील वारू उधळूया

हरवून जाऊ धुक्यामध्ये
तुझ्या नि माझ्या स्वप्नांमध्ये
जे साकारले फक्त भासांमध्ये
ते अनुभवू आज श्वासांमध्ये

घडीभरच्या भातूकलीतील
खेळभांडीही मांडूया
तुझ्या नि माझ्या भासांमधले
घर-संसारही आज थाटुया

पुसटशा होतील मग मर्यादा
ओझरत्या स्पर्शावरच थांबूया
भान हरवता एकाचे
दुसर्याने अलगद सावरुया

लुटुपुटूच्या डावामधल्या
आठवणी हृदयात साठवूया
उमटलेली डोळ्यांतील प्रीती
उरी जपुनी ठेवूया

भरेल घटका मग परतीची
हासत हासत निरोपही घेऊया
डोळ्यांमधले पाणीही
पुन्हा एकदा परतवूया

लुटुपुटूच्या डावामधुनी
चल आज भातुकली मांडूया