माझी आई कितीही संकटं आली तरी शांत असायची. कधी माझी तंतरलेली असली तरी ती शांतपणे मिष्किल हसून आकाशाकडे बोट दाखवून म्हणायची, “तो आहे, त्याचं सगळीकडे लक्ष असतं.” ह्यावर मी आणखीनच चिडून म्हणायचे, “अगं, माझ्याबाबतीतच का असं?” मग ते “असं” म्हणजे शाळेत जायला झालेला उशीर, कठीण गेलेला पेपर, इंजिनियरिंगला आलेला खडूस external examiner, आयत्या वेळेस ड्रेसवरची ओढणी न सापडणे किंवा वर्षा सहलीच्या आदल्या दिवशीच नेमकी सुरू झालेली पाळी- ह्यातलं काहीही असलं तरी माझा त्रागा आणि तिचा शांतपणा ठरलेला.
भविष्याची काळजीच तिला वाटली नाही असं कसं म्हणू. बाबा वारले तेव्हा नविन घराचे हफ्ते, ६,१०,१६ वर्षांच्या तीन मुली आणि समस्त “आप्तेष्टांनी” (सन्माननीय अपवाद वगळता) फिरवलेली पाठ, हे सगळं ती खंबीरपणे हाताळू शकली. फक्त “तो आहे!”, ह्या विश्वासावर.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आम्हा तिघी बहिणींच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आमची आजारपणं, करियरच्या दिशा ठरवताना- जोडीदार निवडताना उडालेली तारांबळ, दोन्हीकडचा मान-पान सांभाळून थाटात केलेली लग्न कार्य, बाळंतपणं, संसार उभे करताना केलेली आर्थिक मदत, सगळीकडेच तिला कधी काहीच कमी नाही पडलं. आम्हीच गांगरून जायचो, “आई गं, कसं होणार आता?” तेव्हा ती फक्त आकाशाकडे बोट दाखवून गालातल्या गालात हसायची.
ती गेल्यावरही तिचा "तो आहे" विश्वास वारसा हक्काने आम्हा तिघींकडे आला आहे, थोडासा बदल होऊन.
माझ्या बाळंतपणात माझ्या मैत्रिणींनी पाठवलेले डबे, नवर्यानी/सासूबाईंनी केलेल्या खिरी-लाडू ह्यातून मला ती जाणवत राहिली. इतक्या वर्षांनीही जेव्हा मैत्रिणीची आई इथे अमेरिकेत आली की आठवणीनी जेवायला बोलावून तव्यावरची पोळी पानात वाढते, माझ्याकडे जेवायला बोलावल्यावरही हक्कानी शेवटची भाकरी मित्राची आई मला गरम-गरम करून देते, भारतात गेल्यावर बहिणी, सासूबाई, नणंद, काकू/मावशी, आवर्जून आवडीचे पदार्थ करून खायला घालतात. हक्कानी डोक्याला तेलाची मालिश करून "केसांची कशी वाट लागलीये, काळजी घेत जा", असं दरडावतात, एखादी अनोळखी आजी रस्त्यानं जाता- जाता माझ्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत कौतुक करते, तेव्हा-तेव्हा मी मनात म्हणत असते, "ती आहे!"