Tuesday, August 17, 2021

दिल है हिंदुस्तानी - आग्रह!

  

 आमचा एक मित्र आहे, तो आणि त्याची बायको तब्ब्येतीची छान काळजी घेतात. रोजचं १० किलोमीटर धावणं, साखर/गोड तर वर्षाकाठी जेमतेम चार वेळा- तेही मोजून मापून. दुग्धजन्य पदार्थ, ग्लुटन ह्या गोष्टी तर त्यांच्या आयुष्यातून केव्हाच बाद झाल्या आहेत. पण कोणाला घरी बोलावलं की त्यांच्यासाठी मात्र ते हे असले कुठलेही नियम पाळायला लावत नाहीत. बरं दोघंही उत्तम स्वयंपाक करतात, आणि प्रचंड आग्रहाने जेवू-खावू घालतात. कधी कधी तर वाटतं आम्हाला खिलवून ते त्यांच्या सुप्त इच्छाच पूर्ण करतायेत. त्यांच्याकडे गेलं की मी पोट अर्ध भरलंकीच जेवण थांबवते. कारण त्याचा आग्रहच इतका असतो की, माणूस पोटाला तड लागून पानावरून हलूही शकत नाही.
तर झालं असं की, एकदा त्यांनी पाव-भाजीचा बेत केला होता. नेहमीप्रमाणे आग्रहानी आम्हाला जेवायला आधी बसवलं. गरमागरम भाजी त्यात सढळ हातानी घातलेलं अमूल बटर आणि जोडीला बटरने माखलेले लुसलुशीत पाव! अहाहा ते बघूनच रसना चाळवली गेली नाही असा मुंबईकर जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. निम्मं पोट भरल्यावर लक्षात आलं की आता पातेल्यात जेमतेम त्या दोघांपुरतीच भाजी उरली होती. मी आखडता हात घेऊन ताटच सिंकमधे ठेवून दिलं, आणि नवर्यालाही नजरेनीच “आता पुरे” चा इशारा करू लागले. पण त्याचं माझ्याकडे लक्ष जायला मी काही अमूल बटरमधे माखले नव्हते नं! शेवटी एकच पाव उरल्यावर त्याची पोट फुटण्याची अवस्था आली आणि त्यानी कळवळून आग्रह थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले.
त्यावर मित्र मनापासून म्हणाला, “अरे संपव रे, एकच पाव तर उरलाय. तसंही तुला तर माहितीच आहे, आमच्याकडे आम्ही दोघंही मैदा, बटर हे असलं फॅटी खातच नाही. तू नाही खाल्लंस तर फेकावंच लागेल. घे तू. “
हलवून हलवून लोणच्याच्या बरणीत मीठ भरावं तसं नवरा बटर (मूग नव्हे) गिळून पाव संपवू लागला…

No comments:

Post a Comment