"मला
नं भाऊच हवाय माझ्याशाख्खा
दंगा घालनाला. मुलींना गुद्दे घातले की त्या ललतात..."
"अरे,
असं आपल्या हातात नसतं, देव बाप्पा देईल
ते बाळ तुझ्याशीच खेळायला
येणार आहे नं..."
"नाही
म्हंजे नाही, बहीन झाली तल
तिला आपन डॉक्टल काकांना
पळत देऊन टाकू."
हा असा संवाद सतत
झाल्याने सरिता जेव्हा छोट्या आहनाला घेऊन घरी आली
तेव्हा, तिच्या पोटात भीतीचा गोळाच होता. आता श्रेयस कसा
वागणार आहे ह्याची धडकीच
भरलेली. त्यातच ह्या दोघी हॉस्पिटलमधून
घरी येणार म्हणून घरी सगळेच जमले
होते. तिच्या मैत्रिणी, दोन्हीकडचे आजी-आजोबा, दीर-जाऊ, शेजारचे.
सासूबाईंनी
त्या दोघींवरून भाकर-तुकडा ओवाळून
टाकला, औक्षण केलं आणि श्रेयसनी
सरिताच्या पायांना मिठी मारली. खाली
वाकून सरितानी त्याची आहनाशी ओळख करून दिली,
"ही बघ तुझी बहीण,
आहना!"
श्रेयसला
भाऊ हवा असल्याच एव्हाना
सगळ्यांना माहिती होता त्यामुळे मुद्दाम
त्याची खोडी काढायला त्याची
काकू म्हणाली,"श्रेयू, तुला भाऊ हवा
होता नं, मग आहनाला
मी घेऊन जाते...", असा
म्ह्णून तिनं आहनाला घेण्यासाठी
हात पुढे केले.
ताबडतोब
शूर सरदारासारखा दोन्ही हात पसरवून तिची
वाट अडवून तो म्हणाला,"माजी बहीन आहे
ती, ऐकलं नाहीश तू
आईनी काय शांगितलं? हात
नाही लावायचा कोंनीच!"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ये
रड्या, एक गुद्दा घातला
पाठीत तर लगेच आजीला
काय सांगायला जातोस?"
"सांगणार
सांगणार, हज्जार वेळा तुझं नाव
सांगणार. सुमो रेसलर कुठला,
खा-खा खातोस आणि
मला बुकलत राहतोस. मला नाही खेळायचं
तुझ्याशी..."
"जा
रे जा, मग मी
पण तुला बॅटिंग देणार
नाहीये. शेपूट कुठला, सारखा माझ्या मागे मागे येतो.
तुझे मित्र कर नं..."
ही अशी रोजची भांडणं
ऐकून आजीचेही कान किटले होते.
"अरे,
असे वैर्यांसारखे भांडू नका रे, ती
चार भावांची गोष्ट आठवतेय नं? एकटी असली
की काटकी मोडता येते, पण मोळीत असली
तर त्यांची एकजूट कोणीच नाही तोडू शकत.
अरे, मंदार- अमेय ऐकताय का?"
आजीचं
ऐकायला ते दोघे घरात
होतेच कुठे, ते तर केव्हाच
मैदानावर खेळायला पळून गेले होते.
"कसं
होणार गं ह्यांचं, अलका?
तूच समजावून सांग गं." अलका
गालातल्या गालात हसत होती. तिनं
आजींना गॅलरीत आणलं, "ते बघा..."
खाली
क्रिकेटच्या टीम्स पाडल्या जात होत्या. छोटा
असल्याने अमेयला कोणीच घेत नव्हतं. संज्या
तर सगळ्यांसमोर म्हणाला, "ए मंदार, का
आणतोस ह्याला? रोज रडीचा डाव
खेळतो, आणि एकदा बॅट
घेतली की सोडता सोडत
नाही हा. घरी पाठव
ह्याला!" "
ए संज्या, असू देत रे.
लहान आहे तो. आणि
आज नाही रडणार तो.
त्याला नाही घेतलं तर
मी पण चाललो घरी.
चल रे, अम्या."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ए
रितुडे, कित्ती गोड़ दिसत्येस तू.
तुझा dp पण काय भार्री
आलाय."
"काय
हवंय? सरळ बोल, उगाच
मस्का नको मारूस..."
"बरं
बरं, मी आज संध्याकाळी
तुझा ब्लॅक स्कर्ट घालणार आहे. आधीच सांगतेय
नाहीतर मागच्या वेळी केलास तसा
राडा घालशील माझ्या फ्रेंड्ससमोर."
"अजिबात
नाही, मी नाही देणार."
"ए,
तुला विचारतय कोण? मी सांगतेय!"
"बरा
घालशील, मी लपवून ठेवीन."
"हा
हा, too late! मी आधीच लपवून
ठेवलाय. तू असाच खडूसपण
करणार माहिती होतं मला. ही
आई पण नं, तरी
मी तिला सांगत होते
मला पण same स्कर्ट घेऊयात म्हणून तर म्हणते कशी,
दोघी बहिणीच आहेत तर एक
कॉमन घ्या नं. म्हणजे
आळी-पाळीने घालता येईल. आणि आपोआपच जास्त
व्हरायटी मिळेल दोघींनाही. तिला नं काही
कळतच नाही!"
लहानपणपासून ही
अशीच जुळ्यांची दुखणी. पण रीमा जेव्हा
नोकरीसाठी बेंगलोरला जायला निघाली तेव्हा रितूनं स्वतःच तिचा वॉर्डरोब उघडून
दिला, "घे तुला जे
कपडे हवे ते, तुला
तिकडे जरा बरं दिसायला
लागेल. आणि तुझा चॉईस
म्हणजे महानच आहे. चल घे
पटकन, before I change
my mind!"
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशा
सगळ्या भांडकुदळ पण एकमेकांशिवाय अजिबात
नं करमणाऱ्या भावंडांना
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment