लग्नाला कितीही वर्ष झाली तरीही नवरे आमच्या घरी, आमचा सुतार, आमचे फॅमिली डॉक्टर, गेला बाजार आमच्या संडासातल्या पाली (!), ह्या सगळ्या गोष्टींवर वारसा हक्क दाखवत राहतात. अरे मग, जिनी तुझ्यासाठी राहतं घर, संडासातल्या पाली- ह्या सगळ्या-सगळ्यांवर पाणी सोडलं तिला तू "आपलं"सं कधी करणार?
आयुष्यभर बहिणीशी भांडत स्वतःच्या कपाटाला हातही लावू ना देणाऱ्या तिनेच लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेल्यानंतर त्याच कपाटात ठेवणीतली अंथरुणं-पांघरुणं बघितल्याचा धक्का पचवलेला असतो. आई पण ओशाळवाणं होऊन म्हणते, "अगं, लग्नाआधी तुझ्या मागे लागले होते ते कपाट जरा स्वच्छ करून दे, तुझी फर्स्ट ईअरपासूनची पुस्तकं-नोट्स काढून टाक. पण तुला काही वेळ झाला नाही, मग आता मीच ते सगळं रद्दीत देऊन आले. आता बघ कसा सुटसुटीत वाटतंय!" तीही कसनुसं हसते, आईला आपल्या बबडीला समज आल्याची पाहून हुश्श्य वाटतं. अशा हळूहळू माहेरच्या पाऊलखुणा पुसल्या जातात.
"आमच्याकडे नं सगळ्यांना ओल्या नारळाच्याच करंज्या आवडतात, त्या सुक्या खोबऱयाच्या कशा खुळखुळ्याच्या वाटतात नाही...", असं ऐकल्यावर तिनं पुन्हा कधीच त्या खिरापतीच्या करंज्या केलेल्या नसतात- चुली वेगळ्या झाल्या तरीही! कारण तिच्या डोक्यात ती उंबरठा ओलांडून आली तेव्हाच ती इकडची झालेली असते. आता जे काही इकडे आवडेल तेच "आपलं", चुकूनही "आमच्या घरी असं करायचे...", असं ओठावर येऊ द्यायचं नाही अशी खबरदारी ती घेत असते. रुजवून घेण्याचा, सगळ्यांना सामावून घेण्याचा तिला इतका काही पुळका असतो की ओढून-ताणून "आमचं" चं "आपलं" कधी होईल ह्याची वाट बघण्यातच कैक वर्षं निघून जातात.
बघता बघता बाजू पालटतात. आता येणाऱ्या नवीन सुनेशी बोलताना ती जाणीवपूर्वक म्हणते, "आपल्याकडे नं..."
No comments:
Post a Comment