मध्यंतरी एक अप्रतिम सिनेमा बघितला- नजर अंदाज! बघितला नसेल तर आवर्जून बघा. हा लेख सिनेमाच्या परीक्षणासाठी नाहीये, नाहीतर उगाच गैरसमजूत व्हायायची. हा सिनेमा मनात घर करून राहिला ते त्यातल्या गाण्यांसाठी आणि कुमुद मिश्राच्या सहज-सुलभ अभिनयासाठी. त्या सिनेमात दोन गाणी आहेत- "एक आधी कहानी थी ..." आणि ".. जादू.." अक्षरशः पंधरा-वीस मिनिटांत आपल्याला पहिल्या प्रेमाची, ताटातुटीची आणि पूर्णतेची कल्पना येते.
कुमुद मिश्रा जन्मतः आंधळा असतो आणि आपल्या पहिल्या प्रेमापासून स्वतःला दूर ठेवतो आयुष्यभर. आयुष्याच्या सांजवेळी पुन्हा एकदा तिला मनापासून भेटावसं वाटत असतं. आणि ते दोघं भेटतातही. त्यानी ना सांगताच तो आल्याबरोबर ती त्याच्या आवडीची खांडवी करायला घेते. त्या खमंग फोडणीच्या वासानेच तो तृप्त होतो. जेव्हा ती खांडवी तो तोंडात घालतो तेव्हाचा त्याचा अभिनय खूप काही सांगून जातो. अतृप्ततेला अत्युच्च समाधानाची पावती असते. संपूर्ण सिनेमात डोळे बंद असूनही ह्या सीनमध्ये त्याचे ते बंद डोळे खूप काही सांगून जातात.
संध्याकाळी नदीवर जेव्हा ते दोघे भेटतात ती भेटही खूप हळवी करून जाते. तिचं आता लग्न झालंय त्याच्याच जिवलग मित्राशी. त्यामुळे तो अजूनही मर्यादा सांभाळूनच तिच्याशी बोलतोय. आणि ती मात्र त्या क्षणांसाठी भूतकाळात जाऊन पोहचलीये. त्यांच्या भेटीत, त्याच्या तिला "बघण्यात" काहीच वावगं वाटूच शकत नाही. ती त्याला विचारते की न बघताही कोणी एखाद्यावर इतकं प्रेम कसं काय करू शकतो? खरंच की असे प्रेम कोण करू शकेल? न बघता तिच्यावर मनापासून प्रेम करून, तिच्या जीवनात आपण अडथळा बनू नये म्हणून स्वतःहून दूर जाऊन, इतकी वर्षं एकमेकांशी काहीही संबंध न ठेवताही इतक्या वर्षांनी समोर आल्यावर ती एकांतात भेटायला येईलच ही खात्री! अशा प्रेमाला सलाम!
अशा वेळी राधा-क्रुष्णाची आठवण काढल्याशिवाय राहवत नाही. राधेचं लग्न झालं होतं. ती क्रुष्णाहून नक्कीच वयाने मोठी होती. राधा-क्रुष्ण फार-फार तर ४-५ वर्षं एकमेकांच्या सहवासात आले असतील, बरोबर? तरीही प्रेमाचं बेमिसाल उदाहरण म्हणून, सोलमेट्स म्हणून राधा-क्रुष्णाचंच नाव घेतलं जातं नं? मान्य आहे की, त्यांचं प्रेम उदात्त होतं, युगानंयुगं चालत आलं होतं. वादच नाही त्याबद्दल. आणि आपल्यासारख्या सामान्यांची लायकीही नाही ते पूर्ण समजून घेण्याची. पण असं प्रेम उलगडण्यासारखं, व्यक्त होऊन समजावण्यासारखं नसतंच मुळी. ते अनुभवायचं असतं. मनाच्या कुपीत सांभाळून ठेवायचं असतं. आणि ते समजून घेणारं कोणी मिळालंच तर दुग्ध-शर्करा योग!