Monday, February 7, 2022

शाश्वत!

खूप मनसोक्त गप्पा होतील, खाण्या-पिण्यापेक्षा तुझ्या सोबतीनंच पोट भरलं असेल. 
 एखाद्या विनोदावर सहजगत्या दिलेल्या टाळीनं हात आठवणीतही थरथरत असेल. 
 कळत-नकळत झालेल्या पुसटशा स्पर्शानं अंगभर शहारा फुललेला असेल. 
 आणि बघता बघता मैफिल संपून परतीची ओढही लागेल. 
पण निरोप घेण्याइतपतही एकांत मिळणार नाही. 
 हजारोंच्या गर्दीत एक नाव हवेवर विरून जाईल 
आणि तुझ्या अफाट पसार्यात तुला जाणवणारही नाही. 

कधीतरी अचानक वळीवाचा सुगंध धडधड वाढवेल, 
 लुटूपुटीच्या भांडणांचीही सय काढेल!
हजारोंच्या गर्दीतलं नाव हजारांत एक होतं, पण …
बजावला नाही अशा हक्काचं असं कोणी होतं, पण…
पण हे तर होणारच आहे नं? 
हे माहित असूनही मन कातर होणारच नं! 
अनुत्तरीत प्रश्न अन् मनानंच दिलेली उत्तरं, ह्यांची मैफील रंगणारच नं… 


 हल्ली आपल्या सगळ्यांच्याच सोशल मिडियावर हजारो मित्र-मैत्रीणी असतात. अधून मधून forward केलेल्या मेसेजेसवर इमोजींच्या मदतीनी “संवादाची” देवाण-घेवाणही होत असते. 
ह्या सगळ्या गोतावळ्यात मनातलं बोलायचं राहून जातं, घट्ट मिठी मारायची होती- आभाळ फुटल्यागत रडायचं होतं, झटका आल्यागत धोधो हसायचं होतं, हे पुढे-पुढे ढकललं जातं. 
नियतीचं शाश्वत बदलत नाही. कधीतरी घडणारच ते अघटित घडतं, आणि आपणच आपल्याला समजावतो- पण हे तर होणारच आहे नं?

No comments:

Post a Comment