दुचाकीवरून फिरणार्या, स्वत:च्याच विश्वात गुंग असणार्या समस्त युगुलांना समर्पित!
अलवार
त्याचे नी तिचे नाते अलवार क्षणांचे
उमजूनही न समजल्याचे दाखवायचे
मिळतील ते कवडसे मुठीत घट्ट पकडून ठेवायचे
अन् बोटांच्या फटीतून निसटताना साठवायचे
सहजगत्या त्याच्या खांद्यावर तिचा हात,
अन् सहजगत्याच मागे सरकलेला तो
तिला न्याहाळायला नकळत हलवलेला आरसा,
अन् त्यातून त्याला न्याहाळणारी ती…
काहीतरी पुटपुटत त्यानं तिला जवळ बोलवायचे
अन् स्पीडब्रेकर सांभाळत तिनंही पुढे सरकायचे
बोलता बोलता पुसटसे स्पर्श टाळायचे
अन् फुललेला काटा अंगभर मिरवायचे
कधी तिनं, कधी त्यानं भानावर येत अंतर जपायचे
मग त्याने वाढवलेले अंतर, तिनं सावरलेला तोल
अन् सोबतीचा हुरहूर लावणारा तो अबोला
मुक्कामाचे ठिकाण अजूनच पुढे ढकलायचे
न घडलेल्या क्षणांनाही वारंवार उजळवायचे,
अन् आपापल्या आयुष्यात रममाण व्हायचे
त्याचे नी तिचे नाते अलवार क्षणांचे
उमजूनही न समजल्याचे दाखवायचे
No comments:
Post a Comment