खूप वेळा वाटतं की, तुला एकदा विचारून टाकावं. तुझ्यासाठी मी नक्की कोण आहे? ओळख, मित्र, जवळचा मित्र की त्याहीपेक्षा वेगळं काही? पण पुन्हा एकदा विचार येतो, न जाणो तू खरं बोललीस आणि तुझं सत्य मला पचवता नाही आलं तर? आहे का माझी तयारी, तुझ्या मनातलं जाणून घेण्याची, की माझ्या जागेपणीच्या स्वप्नातलीच तू खरी आहेस? आताशा तर खरं काय आणि माझ्या मनातलं काय ह्याच्या सीमारेषाही धुसर होत चालल्या आहेत. ह्या न संपणार्या स्वप्नातून मला स्वतःला उठवायचंच नाहीये.
सगळे आजूबाजूला असतानाही मी सिगरेट हाती घेतल्याबरोबर तुझा नापसंतीचा कटाक्ष मला कळून मी आपसूकच ती सिगरेट परत ठेवून देतो, तू मात्र नामानिराळी राहून चहाचे घुटके घेत गालातल्या गालात हसत राहतेस.
तासन्तास आपल्या गप्पा रंगलेल्या असतात. आपल्या ह्या जगावेगळ्या मैत्रीला कोणी नावं तर ठेवणार नाही नं, ह्या विचारानं मी कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे बघत राहतो. माझं लक्षच नाहीये असं वाटून वैतागून तू निघून जातेस, अन् तुला माझ्या मनातल्या भावना का नाही कळत म्हणून धुसमुसत राहतो.
मी खुलून बोलावं म्हणून तू डिवचत राहतेस, आणि तुला सगळं कळूनही तू न कळल्याचं दाखवतेस म्हणून मी तणतणत राहतो. माझ्या ह्या अशा वागण्यानं हल्ली तू दुरावते आहेस. पण खरंच दुरावते आहेस की, कधी जवळच नव्हतीस?
सांग नं गं एकदा, मी कोण आहे तुझ्यासाठी? पण नको, तो प्रश्नही नको, अन् तुझं उत्तरही नको. मी असंच मनापासून आजन्म तुझ्यावर प्रेम करत राहीन, बंधनात न अडकता. तुझ्या आवडत्या गाण्यासारखं-
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा…”
No comments:
Post a Comment