Friday, September 17, 2021

दिल है हिंदुस्थानी- शेजारी!



कमी-बहुत प्रमाणात भारतात शेजारधर्म पाळणारे सगळेच असतात असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सख्खे शेजारी वर्षानुवर्षं एकमेकांच्या सुख-दुख्खात सहभागी होतात. मुंबईसारख्या सर्व धर्म समभाव मानणाऱ्या शहरात तर शेजारी जवळच्या नातेवाइकांसाखेच होऊन जातात. त्यात कोणाची भाषा-धर्म-जात शक्यतो आडवी येत नाही. अठरापगड जातीतले शेजारी एकाच बिल्डिंगमध्ये राहून सगळे सण- वार एकत्र साजरे करतात. ईदीचा शीरखुर्मा, गणपतीचे मोदक, ख्रिसमसचा केक एकमेकांचं घरी जात असतात. आम्ही ज्या मजल्यावर राहायचो तिथे तर मराठी, गुजराथी, तामिळ, आणि पंजाबी अशी चार घरं होती. सगळ्यात धम्माल म्हणजे ह्या चार शेजारणींच्या गप्पा. प्रत्येक जण मातृभाषा आणि तोडक्या-मोडक्या बंबय्या हिंदीचा वापर करून तासन्तास गप्पा मारत. तरीही त्यांचं कधी कुठे अडलं नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती,ह्या उक्तीप्रमाणे शेजाऱ्यांच्या वेगवेगळ्या तर्हा असतात. "सख्खे शेजारी","चाळ नावाची वाचाळ वस्ती", "वागळे की दुनिया" अशा अनेक मालिका दूरदर्शनवरती एके काळी गाजल्या होत्या. थोड्या फार फरकाने त्यातले भाग दैनंदिन जीवनात घडतही असतात. काही शेजारी तुमच्या सुरक्षेची इतकी काळजी वाहतात की, तुम्हाला ह्या काळातल्या डिजिटल सेफ्टीचीही गरज भासणार नाही. म्हणजे असं की तुमच्या घरी बेल वाजली की, आधी ह्यांचं दार उघडतं कोण आलंय ते बघायला. एव्हाना तुमच्या घरी येणारे सगळेच त्यांच्या ओळखीचे झालेले असतात. पण चुकून माकून कोणी अनोळखी आलंच तर तुमच्या घरात यायच्या आधी त्या पाहुण्यांना शेजारच्यांच्या प्रश्नोत्तरांना समोर जावं लागतं. अशा शेजाऱ्यांच्या मदतीमुळे आई-बाबा निःशंक मनाने वयात आलेल्या मुलं-मुलींना घरी एकटे जाऊन बाहेर जाऊ शकतात, काय बिशाद त्या मुलांची की घरी पार्टी करतील किंवा घरात टाळकी जमवून धिंगाणा घालतील!

पूर्वी असं ऐकलंय की चाळींमधले शेजारी वाटीभर साखरेपासून सगळं काही हक्काने मागून घेत, आणि त्यात कोणालाही काही कमीपणा वाटत नसे. कारण सगळ्यांचीच परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच असायची. आताशा ही मागून नेण्याची पद्धत फारशी प्रचलित नसली तरी, काही शेजारी त्या पूर्वीच्या आठवणी मनात घेऊन असतात. कोणी काही बोलण्याची खोटी की लग्गेच मदतीला पुढे धावतात. आमच्या ओळखीतले एक कुटुंब आहे, प्रचंड प्रेमळ आणि सदैव सगळ्यांच्या मदतीला तत्पर. त्यांच्या कुठल्याही गोष्टीची तारीफ केली की, ताबडतोब ते तुम्हाला ती वस्तू घेऊन जाण्याचा आग्रह करतात. कधी त्यांच्याकडे जेवायला गेलं की, परत येताना तारीफ केलेल्या पदार्थांचा दुसऱ्या दिवशीसाठी डबा असणारच. कधी काकूंच्या साडीचं कौतुक केलं तर लगेच एखाद आठवड्यात काकू ती साडी मला किंवा आईला नेसायला पाठवणार. असे हे प्रेमळ शेजारी कधीकधी आम्हाला कानकोंडे करून टाकतात. झालं असं की, त्या काकूंना एकदा हार्ट अटॅक आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटायला गेलो होतो. रुग्णांशी जुजबी बोलणं होतं तसं करून आम्ही निघणार होतो, तर काकांनी "कौतुकानी" त्यांना दिलेल्या औषधांची नावं- कुठलं औषध कशासाठी आहे ते सांगायला सुरुवात केली. ते दाखवत असताना नकळत मी बोलून गेले की,  ह्या ब्लड थिनरच्या गोळ्या माझ्या नविन बॉसला पण घ्यायला सांगितल्या आहेत सध्या. झालं तेवढं निमित्त पुरलं. माझ्याही नकळत मी त्या ब्लड थिनरच्या गोळ्यांची एक स्ट्रीप घेऊन घरी आले होते. काकांनी आग्रहाने मला ती एक्सट्रा स्ट्रीप घ्यायला लावली. "अगं, तुझा नविन बॉस आहे ना. इम्प्रेशन पडेल त्याच्यावर, घेऊन जा तू. आणि तर तुला माहितीये मी नेहमी सगळं जास्तीचा आणून ठेवतो, आयत्या वेळी काही कमी पडू नये म्हणून. शिवाय ह्या हॉस्पिटलला जोडूनच मेडिकलचे दुकानही आहे. वाटलं तर कधीही आणता येईल." आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, काय देतोय ह्याचा काही मागचा पुढचा विचार नाही. मदत करायची म्हणजे करायचीच!

भारतीयांची एक खासियत म्हणजे, "सुखात बोलावल्याशिवाय जायचं नाही आणि दुःखात कोणी हाक मारण्यासाठी थांबायचं नाही." जोपर्यंत शेजाऱ्यांच्या नात्यातला असा ओलावा टिकून आहे, तोपर्यंत जागेचा/पाण्याचा/विजेचा/ कुठलाच अभाव कोणाला जाणवणार नाही. आणि माझं मन पुन्हा पुन्हा म्हणत राहील की, जगाच्या पाठीवर मी कुठेही असले तरी, "दिल है हिंदुस्थानी!"

- केतकी जोशी.

#ProudToBeIndian #DilHaiHindutani

Wednesday, September 15, 2021

हक्क!



त्या दिवशी तू भरकटत चाललेलास
सगळेच खेचतायेत म्हणून उगाच एका मैत्रीणीला चिडवत होतास
तिचे भरून आलेले डोळे,
नकळत गिळलेला आवंढा
न बघताही माझ्यापर्यंत पोहोचला होता…
गमती-गमतीत सगळेच तिला चिडवत होते
तर अचानक खपली काढली गेल्यानी ती मुक झालेली…
अन् त्या तिच्या मौनाने तू अजूनच भरकटणार,
नकळत तुझ्याबद्दल अढी बसणार!
सगळे आजूबाजूला असतानाही कधी नव्हे ते मी तुला इशारा केला,
एवढ्या गदारोळातही तुझ्या डोळ्यांना माझी विनंती कळून चुकली!
मग अचानक तू नमतं घेतलंस, कान पकडून तिची माफीही मागितलीस
कधीच न नमणारा तू माझ्या डोळ्यांतलं समाधान मिळवायला तुझ्याही नकळत झुकला होतास!
तुझ्याशी कोणतंही नातं नसताना माझ्या डोळ्यांनी फितुरी करून तुझ्यावरचा हक्क बजावला होता.
माझंही कधी चुकलं तर टपली मारून कान पकडायला लावतोस,
अनामिकशा नात्यातनं कोणता हक्क मागत असतोस?
अद्रुश्य रेखेला उल्लंघून न तुला पाऊल उचलायचं असतं न् मला त्या रेषेचं अस्तित्वच मान्य करायचं नसतं…
नात्यांमधे गुरफटलेलास तू मलाही चाकोरीत बांधून ठेवतोस.
तोल तुझाही जात नाही, माझाही ढळू देत नाहीस.
पिढ्यांपिढ्या चालणार्या विरहकथेला म्हणे पहिल्या प्रेमाचा शाप असतो,
तू न् मी तरी का त्याला अपवाद असतो.

Wednesday, September 8, 2021

तिची हरतालिका...


 

शरयूला आईची सकाळपासूनची लगबग बघून कोपऱ्यात शांतपणे बसून राहायचं एवढं कळलं होतं. आई तिची ठेवणीतली साडी नेसून, छान-छान दागिने घालून नटली होती. शरयूनी शेजारच्या बागेतून तिला वाळू, फुलं, पत्री आणून दिलेली. आईनी मग स्वस्तिक काढलं, त्यावर पाट मांडला. त्याभोवती रांगोळी काढली. मग सुबकस वाळूचं शिवलिंग मांडलं. त्याच्याभोवती वाळूच्याच सख्या, पार्वती मांडल्या. मग साग्रसंगीत पूजा केली. शरयू शेजारी बसून सगळं बघत बसलेली. अधून मधून आई देत होती ती फुलं-पत्री वाहत होती. आईनी केला की तसाच नमस्कार करत होती. पूजा झाली की मग शरयूला गरमागरम मसाला दूध, तिची आवडती साबुदाणा खिचडी मिळायची. दिवसभर मग चंगळच असायची. आईच्या मैत्रिणी यायच्या, मग कोणीतरी हातावर मेंदी काढून द्यायचं. मग गाणी लावून फुगड्या आणि काय काय खेळ असायचे. रात्री चक्क जागरण असायचं. आणि शरयूला कोणीच लवकर झोपवायचं नाही. बाबा लहानग्या माधवला आणि आजोबांना घेऊन काकाकडे गेलेले असायचे. घरी कविता आत्या, चित्रा काकू, आजी, शेजार-पाजारच्या आईच्या मैत्रिणी, तिच्या मैत्रिणी जमून नुसता धिंगाणा घालत. लहानपणापासून दर वर्षी हरतालिकेच्या पूजेची ही धमाल शरयूनी मनापासून अनुभवली होती. तेव्हाच मनासारखा नवरा मिळावा, नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे व्रत करायचं असतं हे मनावर ठसलं होतं.

शरयू दहावीत असतानाच बाबांचा अपघात झाला आणि आईची हरतालिका तिच्यावर रुसलीबाबांच्या अकस्मात जाण्याचा धक्का आई पचवू शकली नाही आणि एक सहा महिन्यातच तीही बाबांना भेटायला निघून गेलीशरयू अकाली प्रौढ झालीस्वतःचंमाधवचं शिक्षणआजी-आजोबांची काळजी घेणं हे तिनं स्वतःवर ओढून घेतलंवयपरत्वे आजी-आजोबा थकत गेलेपुढच्या शिक्षणासाठी गेलेला माधव ऑस्ट्रेलियालाच स्थायिक झालालग्नाचं वय आलं आणि आजी-आजोबांनी त्यांच्या परीने तिच्या लग्नासाठी खटपटही केलीपण लग्न केलं तर आजी-आजोबा शरयूबरोबरच राहतील ही तिची अट मान्य करणारा भोळा सांब तिच्या आयुष्यात आलाच नाही.

आपल्या आधी मुलांना का नेलं ह्याचा जवाब विचारण्यासाठी आजोबाही निघून गेलेकविता आत्याही यंदा शरयू आणि आजीच्या सोबतींनीच राहू लागली होतीतिला नवसायासानेही जिवती पावली नव्हतीत्यामुळेजेव्हा तिचे यजमान देवाघरी गेले तेव्हा तिनंही होतं नव्हतं ते सगळं आवरूनअकोल्याला राम-राम ठोकला होतात्यामुळे शरयू आता कविता आत्याचीही आजीच्या बरोबरीने काळजी घ्यायला लागली होतीआयुष्यात इतके चढ-उतार येऊन गेल्यानंतरही ती सगळे सण-वार मनापासून साजरे करत असेतिचा उत्साह बघून आजी आणि आत्यालाही जगण्यात नवीन जोम येत असे.

दर वर्षीप्रमाणे शरयूनं हरतालिकेची पूजा मनोभावे केलीनवीन आणलेल्या साडीची घडी मोडलीआणि जरतारी केसांच्या बटा सांभाळत छानसा सेल्फी काढलाशास्त्र असल्याने FB /व्हाट्सएप वर स्टेटसही टाकलं झोकातते बघून नकळत कविता आत्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या तोंडून निघून गेलं, "वयाची साठी आली आताआता कोणासाठी हरतालिका मांडत्येसशरू?"  शरू प्रसन्न हसत म्हणाली, "आत्याअगं हरतालिका मांडायची ते फक्त मनासारखा नवरा मिळावामिळालेला नवरा दीर्घायुषी  व्हावा म्हणून थोडीच असतेमाझी ही हरतालिका माझ्यासाठीतुझ्यासाठी आणि आजीसाठीहीनवरा असणं आणि नसणं ह्यावर जर आपण नटणं-सजणंओटी भरणं हे ठरवत राहिलो तर आपण तिघींनी हे सगळं कधी करायचंदेव काही आपल्याला अडवत नाही नंमग ये तू पण पत्री वाहायला बस इकडे." कविता आत्यानी आजीला हात धरून खुर्चीवर बसवलं आणि त्या तिघींनी हरतालिका पुजायला सुरुवात केली.

आमटी


 

मराठी घर म्हण्टलं की आमटी हा प्रकार सर्रास केला जातो. कोणी त्याला डाळ म्हणतं, कोणी कालवण, कोणी फोडणीचं वरण. तर नावात काय आहे तर नावात काय आहे असं म्हंटलं तरीही प्रत्येक घराची आमटी ही त्यांची पेटंट असते. नवख्या व्यक्तीने केलेली आमटी मग कधी नाक मुरडून कधी वेगळंच काहीतरी खाल्ल्याची अनुभूती देऊन जाते.

    आमच्या घरी प्रत्येक आमटीला त्या त्या व्यक्तींनी केल्यामुळे प्रसिद्ध झाल्याने त्यांचं नाव आहे. म्हणजे, आमसूल-खोबरं-तिखट घालून केली की जयूमावशी आमटी, काळा/गोडा मसाला-हिरव्या मिरच्यांची फोडणी म्हणजे मुलुंड आजीची आमटी, सासरी मलकापूरच्या कोणी दूरच्या मामींनी केलेली मलकापुरी डाळ केली जाते. गम्मत म्हणजे फोडणी कधी दिली त्यावरून आमटीचं नाव बदलतं. म्हणजे जर फोडणी आधी देऊन त्यात डाळ शिजवली तर तिला मलकापुरी डाळ म्हणायचं. पण जर आधी वरण घोटून घेतलं असेल आणि वरून फोडणी दिली तर त्याला फोडणीचं वरण म्हणायचं. जर वरण घट्ट गोळा असेल आणि वरून फोडणी दिली तर त्याला कलसलेलं वरण म्हणायचं.
    गोड आंबट आमटी असली की त्यात चिंच-गुळाचं, गोड्या मसाल्याचं प्रमाण अचूक जमलं की ब्रम्हानंदी टाळी लागते. खान्देशातली भज्यांची आमटी, मिसळणीचं वरण ज्यात मिश्र डाळी शिजवून त्याला लसूण-जिरं-सुकं खोबऱ्याचं वाटण लावून फोडणी दिली जाते. बरं फोडणीचेही प्रकार घरागणिक बदलत जातात. मंगला गोडबोलेंनी जिवंत फोडणीचे वर्णन केल्यानी असाही प्रकार असतो ते नव्यानेच कळलेलं. पण आईनी शिकवल्याप्रमाणे तेल "छान" तापवून घ्यायचं. तेल "छान" तापल्याशिवाय त्यात मोहरी घालायची नाही. शेवटची मोहरी तडतडायची थांबली की मग चिमूटभर हिंग, कडीपत्ता घालायचा. ही अशीच फोडणी मी करत आले नेहमी. पण मध्यंतरी यूट्यूबवर अर्चनाज किचन मध्ये कळलं की, फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकायची. करून बघितलं, अप्रतिम चव येते.

जशी अन्नपूर्णा घराघरात प्रसन्न होते तशी तुम्हां-आम्हा होवो. अशी ही साठा आमटीची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.