मराठी घर म्हण्टलं की आमटी हा प्रकार सर्रास केला जातो. कोणी त्याला डाळ म्हणतं, कोणी कालवण, कोणी फोडणीचं वरण. तर नावात काय आहे तर नावात काय आहे असं म्हंटलं तरीही प्रत्येक घराची आमटी ही त्यांची पेटंट असते. नवख्या व्यक्तीने केलेली आमटी मग कधी नाक मुरडून कधी वेगळंच काहीतरी खाल्ल्याची अनुभूती देऊन जाते.
आमच्या घरी प्रत्येक आमटीला त्या त्या व्यक्तींनी केल्यामुळे प्रसिद्ध झाल्याने त्यांचं नाव आहे. म्हणजे, आमसूल-खोबरं-तिखट घालून केली की जयूमावशी आमटी, काळा/गोडा मसाला-हिरव्या मिरच्यांची फोडणी म्हणजे मुलुंड आजीची आमटी, सासरी मलकापूरच्या कोणी दूरच्या मामींनी केलेली मलकापुरी डाळ केली जाते. गम्मत म्हणजे फोडणी कधी दिली त्यावरून आमटीचं नाव बदलतं. म्हणजे जर फोडणी आधी देऊन त्यात डाळ शिजवली तर तिला मलकापुरी डाळ म्हणायचं. पण जर आधी वरण घोटून घेतलं असेल आणि वरून फोडणी दिली तर त्याला फोडणीचं वरण म्हणायचं. जर वरण घट्ट गोळा असेल आणि वरून फोडणी दिली तर त्याला कलसलेलं वरण म्हणायचं.गोड आंबट आमटी असली की त्यात चिंच-गुळाचं, गोड्या मसाल्याचं प्रमाण अचूक जमलं की ब्रम्हानंदी टाळी लागते. खान्देशातली भज्यांची आमटी, मिसळणीचं वरण ज्यात मिश्र डाळी शिजवून त्याला लसूण-जिरं-सुकं खोबऱ्याचं वाटण लावून फोडणी दिली जाते. बरं फोडणीचेही प्रकार घरागणिक बदलत जातात. मंगला गोडबोलेंनी जिवंत फोडणीचे वर्णन केल्यानी असाही प्रकार असतो ते नव्यानेच कळलेलं. पण आईनी शिकवल्याप्रमाणे तेल "छान" तापवून घ्यायचं. तेल "छान" तापल्याशिवाय त्यात मोहरी घालायची नाही. शेवटची मोहरी तडतडायची थांबली की मग चिमूटभर हिंग, कडीपत्ता घालायचा. ही अशीच फोडणी मी करत आले नेहमी. पण मध्यंतरी यूट्यूबवर अर्चनाज किचन मध्ये कळलं की, फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकायची. करून बघितलं, अप्रतिम चव येते.
जशी अन्नपूर्णा घराघरात प्रसन्न होते तशी तुम्हां-आम्हा होवो. अशी ही साठा आमटीची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
No comments:
Post a Comment