कमी-बहुत
प्रमाणात भारतात शेजारधर्म पाळणारे सगळेच असतात असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
सख्खे शेजारी वर्षानुवर्षं एकमेकांच्या सुख-दुख्खात सहभागी होतात. मुंबईसारख्या सर्व
धर्म समभाव मानणाऱ्या शहरात तर शेजारी जवळच्या नातेवाइकांसाखेच होऊन जातात. त्यात कोणाची
भाषा-धर्म-जात शक्यतो आडवी येत नाही. अठरापगड जातीतले शेजारी एकाच बिल्डिंगमध्ये राहून
सगळे सण- वार एकत्र साजरे
करतात. ईदीचा शीरखुर्मा, गणपतीचे मोदक, ख्रिसमसचा केक एकमेकांचं घरी जात असतात. आम्ही
ज्या मजल्यावर राहायचो तिथे तर मराठी, गुजराथी, तामिळ, आणि पंजाबी अशी चार घरं होती.
सगळ्यात धम्माल म्हणजे ह्या चार शेजारणींच्या गप्पा. प्रत्येक जण मातृभाषा आणि तोडक्या-मोडक्या
बंबय्या हिंदीचा वापर करून तासन्तास गप्पा मारत. तरीही त्यांचं कधी कुठे अडलं नाही.
व्यक्ती
तितक्या प्रकृती,ह्या उक्तीप्रमाणे शेजाऱ्यांच्या वेगवेगळ्या तर्हा असतात. "सख्खे
शेजारी","चाळ नावाची वाचाळ वस्ती", "वागळे की दुनिया" अशा
अनेक मालिका दूरदर्शनवरती एके काळी गाजल्या होत्या. थोड्या फार फरकाने त्यातले भाग
दैनंदिन जीवनात घडतही असतात. काही शेजारी तुमच्या सुरक्षेची इतकी काळजी वाहतात की,
तुम्हाला ह्या काळातल्या डिजिटल सेफ्टीचीही गरज भासणार नाही. म्हणजे असं की तुमच्या
घरी बेल वाजली की, आधी ह्यांचं दार उघडतं कोण आलंय ते बघायला. एव्हाना तुमच्या घरी
येणारे सगळेच त्यांच्या ओळखीचे झालेले असतात. पण चुकून माकून कोणी अनोळखी आलंच तर तुमच्या
घरात यायच्या आधी त्या पाहुण्यांना शेजारच्यांच्या प्रश्नोत्तरांना समोर जावं लागतं.
अशा शेजाऱ्यांच्या मदतीमुळे आई-बाबा निःशंक मनाने वयात आलेल्या मुलं-मुलींना घरी एकटे
जाऊन बाहेर जाऊ शकतात, काय बिशाद त्या मुलांची की घरी पार्टी करतील किंवा घरात टाळकी
जमवून धिंगाणा घालतील!
पूर्वी
असं ऐकलंय की चाळींमधले शेजारी वाटीभर साखरेपासून सगळं काही हक्काने मागून घेत, आणि
त्यात कोणालाही काही कमीपणा वाटत नसे. कारण सगळ्यांचीच परिस्थिती थोड्याफार फरकाने
सारखीच असायची. आताशा ही मागून नेण्याची पद्धत फारशी प्रचलित नसली तरी, काही शेजारी
त्या पूर्वीच्या आठवणी मनात घेऊन असतात. कोणी काही बोलण्याची खोटी की लग्गेच मदतीला
पुढे धावतात. आमच्या ओळखीतले एक कुटुंब आहे, प्रचंड प्रेमळ आणि सदैव सगळ्यांच्या मदतीला
तत्पर. त्यांच्या कुठल्याही गोष्टीची तारीफ केली की, ताबडतोब ते तुम्हाला ती वस्तू
घेऊन जाण्याचा आग्रह करतात. कधी त्यांच्याकडे जेवायला गेलं की, परत येताना तारीफ केलेल्या
पदार्थांचा दुसऱ्या दिवशीसाठी डबा असणारच. कधी काकूंच्या साडीचं कौतुक केलं तर लगेच
एखाद आठवड्यात काकू ती साडी मला किंवा आईला नेसायला पाठवणार. असे हे प्रेमळ शेजारी
कधीकधी आम्हाला कानकोंडे करून टाकतात. झालं असं की, त्या काकूंना एकदा हार्ट अटॅक आला.
त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटायला गेलो होतो. रुग्णांशी जुजबी बोलणं होतं तसं करून
आम्ही निघणार होतो, तर काकांनी "कौतुकानी" त्यांना दिलेल्या औषधांची नावं-
कुठलं औषध कशासाठी आहे ते सांगायला सुरुवात केली. ते दाखवत असताना नकळत मी बोलून गेले
की, ह्या ब्लड थिनरच्या गोळ्या माझ्या नविन
बॉसला पण घ्यायला सांगितल्या आहेत सध्या. झालं तेवढं निमित्त पुरलं. माझ्याही नकळत
मी त्या ब्लड थिनरच्या गोळ्यांची एक स्ट्रीप घेऊन घरी आले होते. काकांनी आग्रहाने मला
ती एक्सट्रा स्ट्रीप घ्यायला लावली. "अगं, तुझा नविन बॉस आहे ना. इम्प्रेशन पडेल
त्याच्यावर, घेऊन जा तू. आणि तर तुला माहितीये मी नेहमी सगळं जास्तीचा आणून ठेवतो,
आयत्या वेळी काही कमी पडू नये म्हणून. शिवाय ह्या हॉस्पिटलला जोडूनच मेडिकलचे दुकानही
आहे. वाटलं तर कधीही आणता येईल." आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, काय देतोय ह्याचा
काही मागचा पुढचा विचार नाही. मदत करायची म्हणजे करायचीच!
भारतीयांची
एक खासियत म्हणजे, "सुखात बोलावल्याशिवाय जायचं नाही आणि दुःखात कोणी हाक मारण्यासाठी
थांबायचं नाही." जोपर्यंत
शेजाऱ्यांच्या नात्यातला असा ओलावा टिकून आहे, तोपर्यंत जागेचा/पाण्याचा/विजेचा/ कुठलाच
अभाव कोणाला जाणवणार नाही. आणि माझं मन पुन्हा पुन्हा म्हणत राहील की, जगाच्या पाठीवर
मी कुठेही असले तरी, "दिल है हिंदुस्थानी!"
- केतकी जोशी.
#ProudToBeIndian
#DilHaiHindutani
खूपच सुंदर लेखन. लहानपणीचा काळ आठवला
ReplyDeleteThanks 😊
Delete