शरयूला आईची सकाळपासूनची लगबग बघून कोपऱ्यात शांतपणे बसून राहायचं एवढं कळलं होतं. आई तिची ठेवणीतली साडी नेसून, छान-छान दागिने घालून नटली होती. शरयूनी शेजारच्या बागेतून तिला वाळू, फुलं, पत्री आणून दिलेली. आईनी मग स्वस्तिक काढलं, त्यावर पाट मांडला. त्याभोवती रांगोळी काढली. मग सुबकस वाळूचं शिवलिंग मांडलं. त्याच्याभोवती वाळूच्याच सख्या, पार्वती मांडल्या. मग साग्रसंगीत पूजा केली. शरयू शेजारी बसून सगळं बघत बसलेली. अधून मधून आई देत होती ती फुलं-पत्री वाहत होती. आईनी केला की तसाच नमस्कार करत होती. पूजा झाली की मग शरयूला गरमागरम मसाला दूध, तिची आवडती साबुदाणा खिचडी मिळायची. दिवसभर मग चंगळच असायची. आईच्या मैत्रिणी यायच्या, मग कोणीतरी हातावर मेंदी काढून द्यायचं. मग गाणी लावून फुगड्या आणि काय काय खेळ असायचे. रात्री चक्क जागरण असायचं. आणि शरयूला कोणीच लवकर झोपवायचं नाही. बाबा लहानग्या माधवला आणि आजोबांना घेऊन काकाकडे गेलेले असायचे. घरी कविता आत्या, चित्रा काकू, आजी, शेजार-पाजारच्या आईच्या मैत्रिणी, तिच्या मैत्रिणी जमून नुसता धिंगाणा घालत. लहानपणापासून दर वर्षी हरतालिकेच्या पूजेची ही धमाल शरयूनी मनापासून अनुभवली होती. तेव्हाच मनासारखा नवरा मिळावा, नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे व्रत करायचं असतं हे मनावर ठसलं होतं.
शरयू दहावीत असतानाच बाबांचा अपघात झाला आणि आईची हरतालिका तिच्यावर रुसली. बाबांच्या अकस्मात जाण्याचा धक्का आई पचवू शकली नाही आणि एक सहा महिन्यातच तीही बाबांना भेटायला निघून गेली. शरयू अकाली प्रौढ झाली. स्वतःचं, माधवचं शिक्षण, आजी-आजोबांची काळजी घेणं हे तिनं स्वतःवर ओढून घेतलं. वयपरत्वे आजी-आजोबा थकत गेले. पुढच्या शिक्षणासाठी गेलेला माधव ऑस्ट्रेलियालाच स्थायिक झाला. लग्नाचं वय आलं आणि आजी-आजोबांनी त्यांच्या परीने तिच्या लग्नासाठी खटपटही केली. पण लग्न केलं तर आजी-आजोबा शरयूबरोबरच राहतील ही तिची अट मान्य करणारा भोळा सांब तिच्या आयुष्यात आलाच नाही.
आपल्या आधी मुलांना का नेलं ह्याचा जवाब विचारण्यासाठी आजोबाही निघून गेले. कविता आत्याही यंदा शरयू आणि आजीच्या सोबतींनीच राहू लागली होती. तिला नवसायासानेही जिवती पावली नव्हती. त्यामुळे, जेव्हा तिचे यजमान देवाघरी गेले तेव्हा तिनंही होतं नव्हतं ते सगळं आवरून, अकोल्याला राम-राम ठोकला होता. त्यामुळे शरयू आता कविता आत्याचीही आजीच्या बरोबरीने काळजी घ्यायला लागली होती. आयुष्यात इतके चढ-उतार येऊन गेल्यानंतरही ती सगळे सण-वार मनापासून साजरे करत असे. तिचा उत्साह बघून आजी आणि आत्यालाही जगण्यात नवीन जोम येत असे.
दर वर्षीप्रमाणे शरयूनं हरतालिकेची पूजा मनोभावे केली. नवीन आणलेल्या साडीची घडी मोडली, आणि जरतारी केसांच्या बटा सांभाळत छानसा सेल्फी काढला. शास्त्र असल्याने FB /व्हाट्सएप वर स्टेटसही टाकलं झोकात. ते बघून नकळत कविता आत्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या तोंडून निघून गेलं, "वयाची साठी आली आता, आता कोणासाठी हरतालिका मांडत्येस, शरू?" शरू प्रसन्न हसत म्हणाली, "आत्या, अगं हरतालिका मांडायची ते फक्त मनासारखा नवरा मिळावा, मिळालेला नवरा दीर्घायुषी व्हावा म्हणून थोडीच असते. माझी ही हरतालिका माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि आजीसाठीही. नवरा असणं आणि नसणं ह्यावर जर आपण नटणं-सजणं, ओटी भरणं हे ठरवत राहिलो तर आपण तिघींनी हे सगळं कधी करायचं? देव काही आपल्याला अडवत नाही नं, मग ये तू पण पत्री वाहायला बस इकडे." कविता आत्यानी आजीला हात धरून खुर्चीवर बसवलं आणि त्या तिघींनी हरतालिका पुजायला सुरुवात केली.
नेहमप्रमाणेच खुपचं छान कथालेखन
ReplyDeleteThanks :)
Delete