Wednesday, September 15, 2021

हक्क!



त्या दिवशी तू भरकटत चाललेलास
सगळेच खेचतायेत म्हणून उगाच एका मैत्रीणीला चिडवत होतास
तिचे भरून आलेले डोळे,
नकळत गिळलेला आवंढा
न बघताही माझ्यापर्यंत पोहोचला होता…
गमती-गमतीत सगळेच तिला चिडवत होते
तर अचानक खपली काढली गेल्यानी ती मुक झालेली…
अन् त्या तिच्या मौनाने तू अजूनच भरकटणार,
नकळत तुझ्याबद्दल अढी बसणार!
सगळे आजूबाजूला असतानाही कधी नव्हे ते मी तुला इशारा केला,
एवढ्या गदारोळातही तुझ्या डोळ्यांना माझी विनंती कळून चुकली!
मग अचानक तू नमतं घेतलंस, कान पकडून तिची माफीही मागितलीस
कधीच न नमणारा तू माझ्या डोळ्यांतलं समाधान मिळवायला तुझ्याही नकळत झुकला होतास!
तुझ्याशी कोणतंही नातं नसताना माझ्या डोळ्यांनी फितुरी करून तुझ्यावरचा हक्क बजावला होता.
माझंही कधी चुकलं तर टपली मारून कान पकडायला लावतोस,
अनामिकशा नात्यातनं कोणता हक्क मागत असतोस?
अद्रुश्य रेखेला उल्लंघून न तुला पाऊल उचलायचं असतं न् मला त्या रेषेचं अस्तित्वच मान्य करायचं नसतं…
नात्यांमधे गुरफटलेलास तू मलाही चाकोरीत बांधून ठेवतोस.
तोल तुझाही जात नाही, माझाही ढळू देत नाहीस.
पिढ्यांपिढ्या चालणार्या विरहकथेला म्हणे पहिल्या प्रेमाचा शाप असतो,
तू न् मी तरी का त्याला अपवाद असतो.

No comments:

Post a Comment