Wednesday, May 25, 2022
हेअरकट
पोळी?
तिळ-गूळ!
एकदा
कपडे घ्यायला मॅालमधे गेले होते. कपड्यांचा ढीग घेऊन ट्रायल रुममधे गेले. हा टॅाप
घालून बघ,
नाक मुरडून दुसरा घालून बघ, असं
करता करता अचानक माझा खरेदीचा मूडच गेला. सगळे कपडे चुकीच्या साइझचे वाटू लागले.
मग ह्या दुकानात माझ्या देहयष्टीला सुडौल भासवणारे ब्रॅन्ड्सच नाहीत, असा
मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. सगळा पसारा आवरून बाहेर पडणार तितक्यात कानावर गोड
हिंदी आलं. “अजी,
सुनते हो. तुस्सी देखलो इक वार. थोडी मोटी तो नही
लगदी?”
परदेशात राहून दोन दशकं उलटलीयेत, तरीही
आपली भाषा ऐकली की,
पटकन मन भारतात जाऊन पोहोचतं. परदेशात असल्यानी
त्या दोघांनाही,
“आपली भाषा कोणाला कळणार आहे, बोला
बिनधास्त!”,
असा एकप्रकारचा आत्मविश्वास असावा. त्यात मी भसकन्
बाहेर पडून त्यांचा पचका करू नये, असं वाटून मी त्या २X२
च्या ट्रायल रुममधे बसून राहिले. आत बसून भिंतींना कान असतात ह्याच्ं प्रात्यक्षिक
करू लागले. आता तो काय म्हणतो ह्याकडे माझं लक्ष होतं. “जैसे हो, वैसेही
दिखना है आपको. बस करो अब…” असं वाक्य कानावर आल्यावर पटकन बाहेर जाऊन न बघितलेल्या
तिला सांगावंसं वाटलं,
“तुस्सी वड्डे सोणे लग रहे हो ज्जी” अगदी
पोटतिडकीनी तिला लेक्चर द्यायचा मोह मला होत होता की, बाई
आता तरी
आपण
कसं दिसतोय,
हे स्वतःला न विचारता दुसर्यांच्या नजरेतून आपलं
सौंदर्य बघण्याची सवय सोड आता! पण तेवढं पंजाबी सोडा, हिंदीही
बोलणं मला झेपलं नसतं. त्यामुळे मी मुग गिळून ते दोघं जाण्याची वाट बघू लागले.
तेवढ्यात तिनी ठसक्यात ऐकवलं, “तुस्सी तो रेहनेही दो, बैठे
रहो चुपचाप। मैने तो डॅाली के साथही आना था शॅापिंगवास्ते, इक्क
तो फॅशन सेन्स नही है आपको,
और गल कर रह्हे है।”
त्यांचा
तिळ-गूळ असा काही जमला होता की, बत्त्याने फोडूनही फुटला नसता! मी राजरोसपणे
रुमच्या बाहेर पडले. ती आतमधून तडतडतच होती, तर
तो गपगुमान त्याला दिलेल्या स्टुलावर गूळ लावल्यासारखा चिकटून बसला होता.
स्वप्नातल्या कळ्यांनो…
खूप वेळा वाटतं की, तुला एकदा विचारून टाकावं. तुझ्यासाठी मी नक्की कोण आहे? ओळख, मित्र, जवळचा मित्र की
त्याहीपेक्षा वेगळं काही? पण पुन्हा एकदा विचार येतो, न जाणो तू खरं बोललीस आणि तुझं सत्य मला पचवता नाही आलं तर? आहे का माझी तयारी, तुझ्या मनातलं जाणून
घेण्याची, की माझ्या जागेपणीच्या स्वप्नातलीच तू खरी
आहेस? आताशा तर खरं काय आणि माझ्या मनातलं काय ह्याच्या सीमारेषाही धुसर होत चालल्या आहेत.
ह्या न संपणार्या स्वप्नातून मला स्वतःला उठवायचंच नाहीये.
सगळे आजूबाजूला असतानाही मी सिगरेट हाती
घेतल्याबरोबर तुझा नापसंतीचा कटाक्ष मला कळून आपोआपच मी आपसूकच ती सिगरेट परत
ठेवून देतो, तू मात्र नामानिराळी राहून चहाचे घुटके घेत
गालातल्या गालात हसत राहतेस.
तासन्तास आपल्या गप्पा रंगलेल्या असतात.
आपल्या ह्या जगावेगळ्या मैत्रीला कोणी नावं तर ठेवणार नाही नं, ह्या विचारानं मी कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे बघत राहतो. माझं
लक्षच नाहीये असं वाटून वैतागून तू निघून जातेस, अन् तुला माझ्या
मनातल्या भावना का नाही कळत म्हणून धुसमुसत राहतो.
मी खुलून बोलावं म्हणून तू डिवचत राहतेस, आणि तुला सगळं कळूनही तू न कळल्याचं दाखवतेस म्हणून मी तणतणत
राहतो. माझ्या ह्या अशा वागण्यानं हल्ली तू दुरावते आहेस. पण खरंच दुरावते आहेस की, कधी जवळच नव्हतीस?
सांग नं गं एकदा, मी कोण आहे तुझ्यासाठी? पण नको, तो प्रश्नही नको, अन् तुझं उत्तरही नको.
मी असंच मनापासून आजन्म तुझ्यावर प्रेम करत राहीन, बंधनात न अडकता. तुझ्या
आवडत्या गाण्यासारखं-
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा…”
दिल है हिंदुस्थानी- आमंत्रण
आता शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळ्यात बरेच जण कुठे ना कुठे प्रवास करत असतात, त्यामुळे जवळपास दोन महिने फारशी कोणाची भेट होणार नाही. तर त्या आधी एकदा भेटी व्हाव्या म्हणून इथे अमेरिकेत “समर पार्टीज” सुरू झाल्या आहेत. आम्हा भारतीयांच्याही भेटी-गाठी होतायेत, तर मुलांच्या शाळांमधल्या अठरापगड मित्र-मैत्रीणींच्याही पार्ट्या होतायेत. अशावेळी काही फरक प्रकर्षाने जाणवतात.
आपले भारतीय आमंत्रण करतानाच, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर त्यांनाही घेऊन या नक्की, असं आग्रहानी सांगतात कोणाचे आई-बाबा/सासू-सासरे/ पर-राज्यातील बहीण-भाऊ/मित्र-मैत्रीण असं कोणीही तुमच्याकडे आलं तर त्यांनाही आमंत्रण करतात. आयत्या वेळेलाही तुम्ही बिनधास्त इतर कोणालाही घेऊन जाऊ शकता. सगळ्यांचंच आपुलकीने स्वागत होतं. कोणाकडे जायचं असलं की, रिकाम्या हातानी कसं जायचं, ह्या संस्कारांनी भारतीय काही ना काहीतरी घेऊनच एकमेकांकडे जातात. “ह्याची काय गरज होती, कशाला -कशाला…”, म्हणून त्या भेटवस्तू स्विकारल्या जातात. आल्या-आल्या पाणी/सरबत/पेयपानानी जी पाहुणचाराला सुरूवात होते ती बडिशोप/पान/दर्दी लोकांच्या चहानीच संपते. मध्यंतरात काही-ना-काही खायला-प्यायला येतच राहतं, आणि प्रसादाला नाही म्हणू नये तसं ते पोटात ढकलंलंही जातं. सरते शेवटी, लोणच्याच्या बरणीत कसं हलवून हलवून तेल टाकलं जातं, तसं आईसक्रीम किंवा तत्सम गोड पदार्थ ठोसले जातात. सगळ्याचाच आग्रह असतो किंवा किमान प्रत्येकाला आवर्जून हे घेतलं का-ते घेतलं का, अशी प्रेमळ विचारपूस असते.
त्याउलट अ-भारतीयांकडे जायच्या आधीच मेनूला काय असणार आहे ते, तुम्ही तुमची-तुमची दारूची सोय करा (BYOB== Bring Your Own Bottle/Beer)-आम्ही हे-हे देणार आहोत! येण्याची वेळ- पार्टी संपण्याची वेळ, +१ घेऊन यायचंय की तुम्ही एकट्यानेच जायचंय, ह्या सगळ्या प्रकारचे तपशील दिलेले असतात. उगाच संभ्रम नको, आणि कोणाचाच खोळंबा नको. अनौपचारिकपणा इतका की, खाण-पिण समोर ठेवलेले असतं. ज्याला जेव्हा हवं, जे हवं ते घ्या आणि खायला लागा. कोणी येऊन "जेवण लागलंय, करा सुरुवात सगळ्यांनी", असं सांगायला येईलच अशी शाश्वती नाही. सुरुवातीला तर मी समोर सगळं असूनही कोणी घ्यायला ना सांगितल्याने उपाशी घरी परतलेय!
अमेरिकेत जन्म झालेल्या न् वाढलेल्या माझ्या मुलीला तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीकडे आज जायचं होतं तर माझं आपलं, "काहीतरी गिफ्ट घेऊन जा, किमान उन्हाळ्याचं आईस्क्रिम तरी घेऊन जा...", असं चालू होतं. त्यावर तिनी शांतपणे सांगितलं की मी आधीच विचारलंय की मी काही घेऊन येऊ का, तर ती नाही म्हणालीये. तर मी काहीच घेऊन जाणार नाहीये. जाता -जाता तिच्या शैलीतला शालजोडीतला तिनं टाकलाच, “ No one is going to shove food the moment you walk in, you know!”
#proudToBeIndian
Saturday, May 21, 2022
एका चहाची गोष्ट
पाऊस कोसळत होता, आणि मी घरी अक्कलदाढ काढल्याने गाल फुगवून शांतपणे पाऊस बघत बसले होते. मनात नेहमीसारखाच तू होतास. हल्ली तर वेळा-काळाचं भान न ठेवताच तू समोर येऊन ठाकतोस आणि माझ्याही नकळत चेहऱ्यावर ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत हसू पसरत जातं. मग आई किंवा ताई विचारते, "काय गं, एकटीच काय हसत बसलीयेस? बरी आहेस नं ?"
मागच्या सहा महिन्यात तुझ्याशी झालेल्या गप्पा, तुझे सूचक बोलणं, माझं फोनवरच लाजणं, आणि मनाशी आपले संवाद घोळवत राहणं ह्याचा सध्या नादच लागला होता. घरी सगळे झोपले की हळूच फोनची केबल काढून बेडरूम मध्ये न्यायचा आणि अंधार करून तासनतास तुझ्याशी फोनवर बोलत बसायचं. मध्ये आई उठलीच तर काही नाही रॉंग नंबर आला होता, असं काहीबाही कारण सांगून पटकन ठेवून द्यायचा. मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते, पण जगाला कळायचं ते कळतंच. त्यात आई-बाबा वयात आलेल्या मुलं-मुलींवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात, हे स्वतःची मुलं त्या वयात येईपर्यंत कळत नाही. त्यामुळे त्यांना सांगितल्यावर ते काय म्हणतील, ह्या भितीनी पोटात गोळा उठत होता. आज सांगू-उद्या सांगू असं ठरवत घरी सांगण्याची हिम्मत काही केल्या होत नव्हती.
दर वर्षी पाऊस सुरु झाला की लाईट जाणं किंवा फोन बंद पडणं हे अंगवळणीच पडलं होतं. त्यासगळ्याचा ह्या आधी कधी त्रासही झाला नव्हता. पण ह्या वर्षी मात्र माझ्या आवडत्या पावसावर मी रागावले होते. फोन रुसून बसलेला, त्यात अक्कल दाढ काढल्याने खूप दुखत होतं. कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या काळात असे टेक्स्ट मेसेजेस, सेल फोन असे चोचलेही नव्हते. त्यामुळे तुझ्याशी बोलताही येणार नव्हतं. किती दिवस? त्याचाही अंदाज नव्हता. तुझी खूप खूप आठवण येत होती, पण सांगणार कोणाला, आणि करणार काय? उगाच, "माझ्या डोळ्यातला पाऊस, आकाशातून कोसळताना बघ.." अशा आशयाच्या फिल्मी कविता सुचत होत्या.
सगळीकडे पाणी साचून लोकल बंद पडल्या होत्या. घरचे सगळेच सुखरूप घरी पोचले होते. आईनी मस्तपैकी कांदा भजी तळायला घेतली होती, जी मला आज खाता येणार नव्हती. मग तर गालावरची सूज आणखीनच वाढली. आणि तेवढ्यात बेल वाजली. आता कोण तडमडलं, असा विचार करून दार उघडून बघितलं तर नख-शिखांत भिजलेला तू एका हातात हेल्मेट आणि यलो रेन जॅकेट घालून मिश्किल हसत उभा होतास!! क्षणभर मला कळलंच नाही की, नेहमीसारखा भास आहे की, खरंच तू आहेस. तेवढ्यात आई मागनं आली, "कोण आलंय गं?", विचारत. तोंडातल्या कापसाच्या बोळयामुळे काही बोलताही येत नव्हतं, त्यामुळे नुसतेच हवेत हातवारे करत राहिले. ह्याक्षणी धरणी मातेने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत होतं. एकाच वेळी अत्यानंद आणि भितीनी माझ्या चेहऱ्यावर नेहमीचेच बावळट भाव आले असणार. मग तूच बोलायला सुरुवात केलीस, "मी सौरेश, नेहाचा मित्र. आत येऊ का?" कप्पाळ, आजपर्यंत माझा एकही मित्र कधी घरी आला नव्हता. इन फॅक्ट, मला मुलांशी बोलताच यायचं नाही, त्यामुळे एकही मित्रच नव्हता. आणि हा बिनधास्त सांगतोय की मी नेहाचा मित्र! एव्हाना सगळे हॉलमध्ये जमले होते आणि मला कोणाच्याच नजरेला नजर देण शक्य नसल्याने मी वेन्धळयासारखी दार धरून पाऊस काही सुचवेल का ह्याकडे बघत उभी होते. त्यानंतर समोर काय घडतंय ह्याकडे एक मूक प्रेक्षक म्हणून बसण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तू मात्र अगदी रोजचं येणं जाणं असल्यासारखा सगळ्यांशी बोलत होतास. तुला बाबांनी टॉवेल, त्यांचे कपडे बदलायला कधी दिले आणि तू फ्रेश होऊन कधी किचनमध्ये जाऊन भजी खात आईशी गप्पा मारायला लागलास, हे कळलंही नाही. मी आपली दिङगमुखासारखी इकडून तिकडे फिरत होते. आई-बाबा, ताई सगळेच तुझ्याशी गप्पा मारण्यात दंग होते. आणि अचानक बाबांच्या लक्षात आलंच की हा परका मुलगा एवढ्या पावसाचा आपल्या घरी कशाला आला आहे, हे तर आपण विचारलंच नाही. हा आपला आल्यापासून सगळ्या विषयांवर गप्पा मारतोय आणि आपण काहीच विचारलं नाही. मग त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ह्यानी पण अगदी सहजतेने सांगितलं, "काका, झालं काय की मी हिच्यासाठी लायब्ररीतून रेफरन्सचं पुस्तक आणलं होते. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे नं. तर नेमका पाऊस सुरु झाला आणि ही कॉलेजला पण आली नाही नं आज. मग तिचा अभ्यास वेळेत व्हयायला हवा ना. म्हणून मग मीच आलो पुस्तक द्यायला." आई आपली गालातल्या गालात हसत होती. मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघत होते. बाबाही अगदी पटल्यासारखे मान हलवत होते, मनातं म्हंटलं सुटलो आता.
बाबांनी मग आईकडे चहाची फरमाईश केली. आमच्या घरी चहा म्हणजे एक सोहळा असतो. त्यासाठी योग्य प्रमाणात आलं कुटून घ्यायचं, तुकडे करून किंवा किसून नाही चालत. असं छान पाण्यात उकळायचं, काढ्याइतपत नाही. मग त्यात माफक साखर विरघळेपर्यंत एक उकळी काढायची. त्यात आता चहा पावडर टाकून झाकण ठेवून तो चहा दबू द्यायचा. तोवर दूध वर येईपर्यंत उकळून घ्यायचं. मग दुधावर साय धरायच्या आधी ते चहात गाळायचं. दुधाचं प्रमाणही ठरलेलं, चहाचा गुलाबी रंग तर हवा पण दूधपाक नको, तसाच पाणचटही नको. आजीनी ठरवून दिलेली ही चहा करण्याची कृती पिढ्यानपिढ्या इकडची तिकडे झाली नाहीये. आणि असं असताना सौरेशनी एकदम म्हंटलं, "थांबा काकू, मी करतो चहा. तुम्ही बसा शांत." एरवी आमच्याकडे कोणीही आलं तरीही आई चहा मात्र स्वतःच करायची, तर आज तीही अगदी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच ओट्यापासून लांब झाली. मी आपली बघतच राहिले.
बाबांनीही मला आणि ताईला हॉलमध्ये पपेरमध्ये आलेली बातमी दाखवायला बोलावलं. छातीतली धडधड आता शेजारच्यांनाही ऐकू जाईल असं वाटत असताना सौरेश सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर आला. थरथरत्या हातांनी कप ओठांना लावला आणि काय आश्चर्य अगदी आईसारखाच चहा झाला होता! (आम्ही हॉलमध्ये असताना आईनी चहा कसा करायचा हे तुला शिकवलं होतं, हे खूप उशिरा कळलं.) बाबांनी मस्त डोळे मिटून आधी चहावर येणाऱ्या वाफेचा खोल श्वास घेतला, आणि पहिल्या घोटातच सौरेशच्या पाठीवर थाप मारून, "पसंत आहे मुलगा!", अशी दाद दिली. आम्ही दोघे गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागलो. आईनी मला विचारलं, "हाच ना तो रात्रीचा रॉंग नंबर? आणि काय रे पुस्तक द्यायला आलेलास ना, पुस्तक कुठेय?" ते ऐकल्यावर आपली चोरी पकडल्याचं आम्हाला दोघांनाही कळून चुकलं.
Thursday, May 19, 2022
करशील एवढं?
आता भेटशील ना तेव्हा समोर समोर बसून तुझ्याशी बोलायचंय, असे कित्ती वेळा ठरवलंय आणि तू समोर आल्यावर मात्र शब्दांना ओठांवर येण्यापासून थोपवलंय. आयुष्यात चढ-उतार होत राहतात, कोणी येतं -कोणी जातं पण तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. कधी कधी हक्कही गाजवावासा वाटतो पण त्याचा अधिकार मला नाही हेही कळतं. कधी-कधी खूप एकटं वाटत असतं, तू साद घालावीस आणि ते मळभ घालवावं असंही वाटतं. पण तुला ते मी ना सांगताही कळावं, अशी वेडुली ईच्छा असते. आणि खरंच तूही त्याच वेळी नेमका माझ्या वाटणीस येतोस. लुटुपुटुची भांडणं होतात, थोडासा हक्क गाजवला जातो. आणि अचानक लक्ष्मण रेषेची आठवण होते. तोल जाण्याआधीच सावरला जातो. तू तुझ्या विश्वाची मला आठवण करून देतोस, त्यात माझं अस्तित्वच नाहीये ह्याची जाणीव करून देतोस. का रे असा दुष्टासारखा वागतोस? तुझ्याशी मग संवादच खुंटतो. तुझं क्षितिज तुझ्यापाशी सुखरूप आहे, त्यात मी कधीच येणार नाहीये. पण तरीही कुठेतरी कल्पनेतच का होईना मला तू हवा आहेस. सुख-दुःख वाटून घ्यायला, माझा सखा म्हणून. जो मला नेहमी आणि नेहमी फक्त समजून घेईल, ज्याच्या खांदयावर मी डोकं ठेवून निर्धास्त होईन. ज्याच्या फक्त असण्यानीच माझं हसू मावळणार नाही. ज्याच्याकडे मला स्वातंत्र्य मागावं नाही लागणार तर ते आपसूकच दिलं जाईल. मलाही निर्णय घेता येतात, ह्याचा आत्मविश्वास निर्माण होईलही कदाचित. माझ्यावर बोट उचलून बोलण्याची कोणी हिम्मतच नाही करणार, कारण ढालीसारखा तू असशील माझ्याबरोबर!
तुलाही माहितीये मलाही माझा परीघ सोडता येणार नाही, पण त्याच परिघात तू सामावून गेलायेस रे. तसंच तुझ्याही क्षितिजावर लुकलुकणारी चांदणी म्हणून कधीतरी आकाशाकडे मान वर करून बघत जा माझ्याकडे अधून-मधून. समुद्राच्या लाटांनाही माहित असतंच ना की, किनाऱ्याची कितीही आस असली तरी साथ क्षणभराचीच असते. पण त्यांची ओढ काही कमी होत नाही नं?
फक्त एक करशील? जे आहे ते नाकारू नकोस, जे माझ्या कल्पनेत आहे ते तुझ्याही ओठांवर येऊ दे. ते कधी नव्हतंच, फक्त वल्गना होत्या असा बेईमानपणा स्वतःशी तरी करू नकोस. स्वीकारलं नाहीस तरी अवहेरू नकोस. करशील एवढं? माझ्यासाठी?
श्यामची आई
मराठी माणसाला श्यामच्या आईची वेगळी ओळख करून द्यायला नको खरं तर. पण तरीही सांगते,
साने गुरुजींनी लिहिलेली "श्यामची आई"
हे पुस्तक पिढ्यानपिढ्या मराठी घरा-घरांमधे संस्काराचा एक अविभाज्य भाग म्हणून वाचलं जातंय. तिची एक गोष्ट नेहमीच आमच्या घरी वादग्रस्त ठरली आहे. आधी मी माझ्या आईशी त्या गोष्टीवरून वाद घालायचे, आता माझी मुलं माझ्याशी सहमत नाहीयेत. एकदा काय होतं की, श्यामला पोहता येत नसतं,
आणि त्यामुळे त्याचे सगळे मित्र त्याला चिडवत असतात.
त्याची आई श्यामला मारून मुटकून पोहायला पाठवून देते. सरते शेवटी श्यामला पोहायला येऊ लागते, पण तो आईवर खूप रागावलेला असतो. त्यावर त्याची आई त्याला म्हणते, "अरे श्याम,
दुसऱ्या कोणी तुला भित्रा म्ह्णून चिडवू नये म्हणून मी तुला मारलं रे. तुझ्या आईला कोणी म्हणलं
की, तुझा मुलगा किती भित्रा आहे,
तर तुला आवडेल का?" आणि श्यामला हे पटलं सुद्धा!
माझ्या मुलांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना हे अजिबात पटलं नाही. ह्या पिढीला शाब्दिक मार जरी ओळखीचा असला तरी कोणी खरोखर छडीने मारून संस्कार करतं हे पटणं कठीणच आहे. आमची पिढी जरी मार खाऊनच सुसंस्कारित झाली असली तरीही आईनी असं पोहता येत नसताना सगळ्या मित्रांसमोर झोडून काढणं आणि विहिरीत ढकलून देणं जरा अमानुषच वाटायचं. त्यामागची भावना आईनी समजावून सांगितली तरीही स्वतः आई झाल्याशिवाय ते काही पचनी पडलं नाही.
बऱयाचदा आई म्हणायची, "हे शिकून घे, ते कर नाहीतर सासरी माझी लाज काढशील!"
हा बऱ्याच आयांचा अगदी आवडता डायलॉग असायचा. मानस शास्त्रात सुद्धा प्रौढपणीच्या मानसिक समस्यांचे मूळ बालपणात असतं,
अशी धारणा आहे. म्हणजेच
बालवयातले आईचे संस्कार आपल्याला आयुष्यभर पुरून उरतात. मध्ये एकदा बदक आणि त्याचं पिल्लू ह्यांची एक व्यंगचित्रांची मालिका आहे, ती वाचत होते. त्यात ते पिल्लू मोठ होऊन मानसिक उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलेलं असतं. त्याला तीन ह्या अंकाची खूप भीती वाटत असते. काही केल्या कळत नाही असं का होतंय. शेवटी त्याला संमोहित करून लहानपणीच्या आठवणी काढायला सांगतात. तेव्हा त्याला आई दिसते. ती ओरडत असते, "येतोयस की मी येऊ?
एक, दोन,
..."
ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरीही, आईने केलेले संस्कार कायमच लक्षात राहतात. बरेचदा आयांना वाटते की मुलांचं
यश त्यांच्या कर्तृत्वावर मिळालय पण त्यांच्या लहानातल्या लहान चुकांचं खापर मात्र त्या स्वतःवर फोडून घेताना दिसतात. आणि ह्यामुळे कदाचित मुलं कितीही मोठी झाली तरीही आया त्यांच्या चुका काढणं काही थांबवत नाहीत. गंमत सांगते, माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत. त्यांनाही आता सून आलीये. पण त्या काकूंची आई अजूनही त्यांना चारचौघात, "बास एवढं तूप घेऊ नकोस,
जाडी होशील." "हा रंग शोभत नाही तुझ्या रंगावर, केवढी काळवंडली आहेस!", असं आणि बरंच काही बोलत असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की आपली मुलगी आता स्वतः सासू झालीये, आजी झालीये. आता तिला शिस्त लावण्याचे दिवस गेले आहेत. त्यांच्या डोक्यात श्यामच्या आईनंच घर केलेलं असतं.
अशा कितीतरी श्यामच्या आया आजूबाजूला दिसतात. पण त्यामुळे त्यांची मुलं त्यांच्या शब्दांनी दुखावतात. आई नेहमी चूकच काढते, अशी समजूत करून घेतात. आईला मी कधी कळणारच नाही, ह्या समजुतीनं तिच्यापासून नकळत अंतर वाढवत जातात. काळाच्या ओघात जेव्हा स्वतःवर आईपण येत आणि आपण आईचेच शब्द बोलायला लागतो तेव्हा किंवा काही अभाग्यांना आई काळाच्या पडद्याआड जाते तेव्हा तिच्यातली श्यामची आई उमगत जाते.