Thursday, May 19, 2022

करशील एवढं?


     

आता भेटशील ना तेव्हा समोर समोर बसून तुझ्याशी बोलायचंय, असे कित्ती वेळा ठरवलंय आणि तू समोर आल्यावर मात्र शब्दांना ओठांवर येण्यापासून थोपवलंय. आयुष्यात चढ-उतार होत राहतात, कोणी येतं -कोणी जातं पण तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. कधी कधी हक्कही गाजवावासा वाटतो पण त्याचा अधिकार मला नाही हेही कळतं.  कधी-कधी खूप एकटं वाटत असतं, तू साद घालावीस आणि ते मळभ घालवावं असंही वाटतं. पण तुला ते मी ना सांगताही कळावं, अशी वेडुली ईच्छा असते. आणि खरंच तूही त्याच वेळी नेमका माझ्या वाटणीस येतोस. लुटुपुटुची भांडणं होतात, थोडासा हक्क गाजवला जातो. आणि अचानक लक्ष्मण रेषेची आठवण होते. तोल जाण्याआधीच सावरला जातो. तू तुझ्या विश्वाची मला आठवण करून देतोस, त्यात माझं अस्तित्वच नाहीये ह्याची जाणीव करून देतोस. का रे असा दुष्टासारखा वागतोस? तुझ्याशी मग संवादच खुंटतो. तुझं क्षितिज तुझ्यापाशी सुखरूप आहे, त्यात मी कधीच येणार नाहीये. पण तरीही कुठेतरी कल्पनेतच का होईना मला तू हवा आहेस. सुख-दुःख वाटून घ्यायला, माझा सखा म्हणून. जो मला नेहमी आणि नेहमी फक्त समजून घेईल, ज्याच्या खांदयावर मी डोकं ठेवून निर्धास्त होईन. ज्याच्या फक्त असण्यानीच माझं  हसू मावळणार नाही. ज्याच्याकडे मला स्वातंत्र्य मागावं नाही लागणार तर ते आपसूकच दिलं जाईल. मलाही निर्णय घेता येतात, ह्याचा आत्मविश्वास निर्माण होईलही कदाचित. माझ्यावर बोट उचलून बोलण्याची कोणी हिम्मतच नाही करणार, कारण ढालीसारखा तू असशील माझ्याबरोबर!

तुलाही माहितीये मलाही माझा परीघ सोडता येणार नाही, पण त्याच परिघात तू सामावून गेलायेस रे. तसंच  तुझ्याही क्षितिजावर लुकलुकणारी चांदणी म्हणून कधीतरी आकाशाकडे मान वर करून बघत जा माझ्याकडे अधून-मधून. समुद्राच्या लाटांनाही  माहित असतंच ना की, किनाऱ्याची कितीही आस असली तरी साथ क्षणभराचीच असते. पण त्यांची ओढ काही कमी होत नाही नं? 

फक्त एक करशील? जे आहे ते नाकारू नकोस, जे माझ्या कल्पनेत आहे ते तुझ्याही ओठांवर येऊ दे. ते कधी नव्हतंच, फक्त वल्गना होत्या असा बेईमानपणा स्वतःशी तरी करू नकोस. स्वीकारलं नाहीस तरी अवहेरू नकोस. करशील एवढं? माझ्यासाठी?

No comments:

Post a Comment