आता शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळ्यात बरेच जण कुठे ना कुठे प्रवास करत असतात, त्यामुळे जवळपास दोन महिने फारशी कोणाची भेट होणार नाही. तर त्या आधी एकदा भेटी व्हाव्या म्हणून इथे अमेरिकेत “समर पार्टीज” सुरू झाल्या आहेत. आम्हा भारतीयांच्याही भेटी-गाठी होतायेत, तर मुलांच्या शाळांमधल्या अठरापगड मित्र-मैत्रीणींच्याही पार्ट्या होतायेत. अशावेळी काही फरक प्रकर्षाने जाणवतात.
आपले भारतीय आमंत्रण करतानाच, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर त्यांनाही घेऊन या नक्की, असं आग्रहानी सांगतात कोणाचे आई-बाबा/सासू-सासरे/ पर-राज्यातील बहीण-भाऊ/मित्र-मैत्रीण असं कोणीही तुमच्याकडे आलं तर त्यांनाही आमंत्रण करतात. आयत्या वेळेलाही तुम्ही बिनधास्त इतर कोणालाही घेऊन जाऊ शकता. सगळ्यांचंच आपुलकीने स्वागत होतं. कोणाकडे जायचं असलं की, रिकाम्या हातानी कसं जायचं, ह्या संस्कारांनी भारतीय काही ना काहीतरी घेऊनच एकमेकांकडे जातात. “ह्याची काय गरज होती, कशाला -कशाला…”, म्हणून त्या भेटवस्तू स्विकारल्या जातात. आल्या-आल्या पाणी/सरबत/पेयपानानी जी पाहुणचाराला सुरूवात होते ती बडिशोप/पान/दर्दी लोकांच्या चहानीच संपते. मध्यंतरात काही-ना-काही खायला-प्यायला येतच राहतं, आणि प्रसादाला नाही म्हणू नये तसं ते पोटात ढकलंलंही जातं. सरते शेवटी, लोणच्याच्या बरणीत कसं हलवून हलवून तेल टाकलं जातं, तसं आईसक्रीम किंवा तत्सम गोड पदार्थ ठोसले जातात. सगळ्याचाच आग्रह असतो किंवा किमान प्रत्येकाला आवर्जून हे घेतलं का-ते घेतलं का, अशी प्रेमळ विचारपूस असते.
त्याउलट अ-भारतीयांकडे जायच्या आधीच मेनूला काय असणार आहे ते, तुम्ही तुमची-तुमची दारूची सोय करा (BYOB== Bring Your Own Bottle/Beer)-आम्ही हे-हे देणार आहोत! येण्याची वेळ- पार्टी संपण्याची वेळ, +१ घेऊन यायचंय की तुम्ही एकट्यानेच जायचंय, ह्या सगळ्या प्रकारचे तपशील दिलेले असतात. उगाच संभ्रम नको, आणि कोणाचाच खोळंबा नको. अनौपचारिकपणा इतका की, खाण-पिण समोर ठेवलेले असतं. ज्याला जेव्हा हवं, जे हवं ते घ्या आणि खायला लागा. कोणी येऊन "जेवण लागलंय, करा सुरुवात सगळ्यांनी", असं सांगायला येईलच अशी शाश्वती नाही. सुरुवातीला तर मी समोर सगळं असूनही कोणी घ्यायला ना सांगितल्याने उपाशी घरी परतलेय!
अमेरिकेत जन्म झालेल्या न् वाढलेल्या माझ्या मुलीला तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीकडे आज जायचं होतं तर माझं आपलं, "काहीतरी गिफ्ट घेऊन जा, किमान उन्हाळ्याचं आईस्क्रिम तरी घेऊन जा...", असं चालू होतं. त्यावर तिनी शांतपणे सांगितलं की मी आधीच विचारलंय की मी काही घेऊन येऊ का, तर ती नाही म्हणालीये. तर मी काहीच घेऊन जाणार नाहीये. जाता -जाता तिच्या शैलीतला शालजोडीतला तिनं टाकलाच, “ No one is going to shove food the moment you walk in, you know!”
#proudToBeIndian
No comments:
Post a Comment