पाऊस कोसळत होता, आणि मी घरी अक्कलदाढ काढल्याने गाल फुगवून शांतपणे पाऊस बघत बसले होते. मनात नेहमीसारखाच तू होतास. हल्ली तर वेळा-काळाचं भान न ठेवताच तू समोर येऊन ठाकतोस आणि माझ्याही नकळत चेहऱ्यावर ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत हसू पसरत जातं. मग आई किंवा ताई विचारते, "काय गं, एकटीच काय हसत बसलीयेस? बरी आहेस नं ?"
मागच्या सहा महिन्यात तुझ्याशी झालेल्या गप्पा, तुझे सूचक बोलणं, माझं फोनवरच लाजणं, आणि मनाशी आपले संवाद घोळवत राहणं ह्याचा सध्या नादच लागला होता. घरी सगळे झोपले की हळूच फोनची केबल काढून बेडरूम मध्ये न्यायचा आणि अंधार करून तासनतास तुझ्याशी फोनवर बोलत बसायचं. मध्ये आई उठलीच तर काही नाही रॉंग नंबर आला होता, असं काहीबाही कारण सांगून पटकन ठेवून द्यायचा. मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते, पण जगाला कळायचं ते कळतंच. त्यात आई-बाबा वयात आलेल्या मुलं-मुलींवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात, हे स्वतःची मुलं त्या वयात येईपर्यंत कळत नाही. त्यामुळे त्यांना सांगितल्यावर ते काय म्हणतील, ह्या भितीनी पोटात गोळा उठत होता. आज सांगू-उद्या सांगू असं ठरवत घरी सांगण्याची हिम्मत काही केल्या होत नव्हती.
दर वर्षी पाऊस सुरु झाला की लाईट जाणं किंवा फोन बंद पडणं हे अंगवळणीच पडलं होतं. त्यासगळ्याचा ह्या आधी कधी त्रासही झाला नव्हता. पण ह्या वर्षी मात्र माझ्या आवडत्या पावसावर मी रागावले होते. फोन रुसून बसलेला, त्यात अक्कल दाढ काढल्याने खूप दुखत होतं. कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या काळात असे टेक्स्ट मेसेजेस, सेल फोन असे चोचलेही नव्हते. त्यामुळे तुझ्याशी बोलताही येणार नव्हतं. किती दिवस? त्याचाही अंदाज नव्हता. तुझी खूप खूप आठवण येत होती, पण सांगणार कोणाला, आणि करणार काय? उगाच, "माझ्या डोळ्यातला पाऊस, आकाशातून कोसळताना बघ.." अशा आशयाच्या फिल्मी कविता सुचत होत्या.
सगळीकडे पाणी साचून लोकल बंद पडल्या होत्या. घरचे सगळेच सुखरूप घरी पोचले होते. आईनी मस्तपैकी कांदा भजी तळायला घेतली होती, जी मला आज खाता येणार नव्हती. मग तर गालावरची सूज आणखीनच वाढली. आणि तेवढ्यात बेल वाजली. आता कोण तडमडलं, असा विचार करून दार उघडून बघितलं तर नख-शिखांत भिजलेला तू एका हातात हेल्मेट आणि यलो रेन जॅकेट घालून मिश्किल हसत उभा होतास!! क्षणभर मला कळलंच नाही की, नेहमीसारखा भास आहे की, खरंच तू आहेस. तेवढ्यात आई मागनं आली, "कोण आलंय गं?", विचारत. तोंडातल्या कापसाच्या बोळयामुळे काही बोलताही येत नव्हतं, त्यामुळे नुसतेच हवेत हातवारे करत राहिले. ह्याक्षणी धरणी मातेने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत होतं. एकाच वेळी अत्यानंद आणि भितीनी माझ्या चेहऱ्यावर नेहमीचेच बावळट भाव आले असणार. मग तूच बोलायला सुरुवात केलीस, "मी सौरेश, नेहाचा मित्र. आत येऊ का?" कप्पाळ, आजपर्यंत माझा एकही मित्र कधी घरी आला नव्हता. इन फॅक्ट, मला मुलांशी बोलताच यायचं नाही, त्यामुळे एकही मित्रच नव्हता. आणि हा बिनधास्त सांगतोय की मी नेहाचा मित्र! एव्हाना सगळे हॉलमध्ये जमले होते आणि मला कोणाच्याच नजरेला नजर देण शक्य नसल्याने मी वेन्धळयासारखी दार धरून पाऊस काही सुचवेल का ह्याकडे बघत उभी होते. त्यानंतर समोर काय घडतंय ह्याकडे एक मूक प्रेक्षक म्हणून बसण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तू मात्र अगदी रोजचं येणं जाणं असल्यासारखा सगळ्यांशी बोलत होतास. तुला बाबांनी टॉवेल, त्यांचे कपडे बदलायला कधी दिले आणि तू फ्रेश होऊन कधी किचनमध्ये जाऊन भजी खात आईशी गप्पा मारायला लागलास, हे कळलंही नाही. मी आपली दिङगमुखासारखी इकडून तिकडे फिरत होते. आई-बाबा, ताई सगळेच तुझ्याशी गप्पा मारण्यात दंग होते. आणि अचानक बाबांच्या लक्षात आलंच की हा परका मुलगा एवढ्या पावसाचा आपल्या घरी कशाला आला आहे, हे तर आपण विचारलंच नाही. हा आपला आल्यापासून सगळ्या विषयांवर गप्पा मारतोय आणि आपण काहीच विचारलं नाही. मग त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ह्यानी पण अगदी सहजतेने सांगितलं, "काका, झालं काय की मी हिच्यासाठी लायब्ररीतून रेफरन्सचं पुस्तक आणलं होते. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे नं. तर नेमका पाऊस सुरु झाला आणि ही कॉलेजला पण आली नाही नं आज. मग तिचा अभ्यास वेळेत व्हयायला हवा ना. म्हणून मग मीच आलो पुस्तक द्यायला." आई आपली गालातल्या गालात हसत होती. मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघत होते. बाबाही अगदी पटल्यासारखे मान हलवत होते, मनातं म्हंटलं सुटलो आता.
बाबांनी मग आईकडे चहाची फरमाईश केली. आमच्या घरी चहा म्हणजे एक सोहळा असतो. त्यासाठी योग्य प्रमाणात आलं कुटून घ्यायचं, तुकडे करून किंवा किसून नाही चालत. असं छान पाण्यात उकळायचं, काढ्याइतपत नाही. मग त्यात माफक साखर विरघळेपर्यंत एक उकळी काढायची. त्यात आता चहा पावडर टाकून झाकण ठेवून तो चहा दबू द्यायचा. तोवर दूध वर येईपर्यंत उकळून घ्यायचं. मग दुधावर साय धरायच्या आधी ते चहात गाळायचं. दुधाचं प्रमाणही ठरलेलं, चहाचा गुलाबी रंग तर हवा पण दूधपाक नको, तसाच पाणचटही नको. आजीनी ठरवून दिलेली ही चहा करण्याची कृती पिढ्यानपिढ्या इकडची तिकडे झाली नाहीये. आणि असं असताना सौरेशनी एकदम म्हंटलं, "थांबा काकू, मी करतो चहा. तुम्ही बसा शांत." एरवी आमच्याकडे कोणीही आलं तरीही आई चहा मात्र स्वतःच करायची, तर आज तीही अगदी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच ओट्यापासून लांब झाली. मी आपली बघतच राहिले.
बाबांनीही मला आणि ताईला हॉलमध्ये पपेरमध्ये आलेली बातमी दाखवायला बोलावलं. छातीतली धडधड आता शेजारच्यांनाही ऐकू जाईल असं वाटत असताना सौरेश सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर आला. थरथरत्या हातांनी कप ओठांना लावला आणि काय आश्चर्य अगदी आईसारखाच चहा झाला होता! (आम्ही हॉलमध्ये असताना आईनी चहा कसा करायचा हे तुला शिकवलं होतं, हे खूप उशिरा कळलं.) बाबांनी मस्त डोळे मिटून आधी चहावर येणाऱ्या वाफेचा खोल श्वास घेतला, आणि पहिल्या घोटातच सौरेशच्या पाठीवर थाप मारून, "पसंत आहे मुलगा!", अशी दाद दिली. आम्ही दोघे गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागलो. आईनी मला विचारलं, "हाच ना तो रात्रीचा रॉंग नंबर? आणि काय रे पुस्तक द्यायला आलेलास ना, पुस्तक कुठेय?" ते ऐकल्यावर आपली चोरी पकडल्याचं आम्हाला दोघांनाही कळून चुकलं.
No comments:
Post a Comment