एकदा
कपडे घ्यायला मॅालमधे गेले होते. कपड्यांचा ढीग घेऊन ट्रायल रुममधे गेले. हा टॅाप
घालून बघ,
नाक मुरडून दुसरा घालून बघ, असं
करता करता अचानक माझा खरेदीचा मूडच गेला. सगळे कपडे चुकीच्या साइझचे वाटू लागले.
मग ह्या दुकानात माझ्या देहयष्टीला सुडौल भासवणारे ब्रॅन्ड्सच नाहीत, असा
मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. सगळा पसारा आवरून बाहेर पडणार तितक्यात कानावर गोड
हिंदी आलं. “अजी,
सुनते हो. तुस्सी देखलो इक वार. थोडी मोटी तो नही
लगदी?”
परदेशात राहून दोन दशकं उलटलीयेत, तरीही
आपली भाषा ऐकली की,
पटकन मन भारतात जाऊन पोहोचतं. परदेशात असल्यानी
त्या दोघांनाही,
“आपली भाषा कोणाला कळणार आहे, बोला
बिनधास्त!”,
असा एकप्रकारचा आत्मविश्वास असावा. त्यात मी भसकन्
बाहेर पडून त्यांचा पचका करू नये, असं वाटून मी त्या २X२
च्या ट्रायल रुममधे बसून राहिले. आत बसून भिंतींना कान असतात ह्याच्ं प्रात्यक्षिक
करू लागले. आता तो काय म्हणतो ह्याकडे माझं लक्ष होतं. “जैसे हो, वैसेही
दिखना है आपको. बस करो अब…” असं वाक्य कानावर आल्यावर पटकन बाहेर जाऊन न बघितलेल्या
तिला सांगावंसं वाटलं,
“तुस्सी वड्डे सोणे लग रहे हो ज्जी” अगदी
पोटतिडकीनी तिला लेक्चर द्यायचा मोह मला होत होता की, बाई
आता तरी
आपण
कसं दिसतोय,
हे स्वतःला न विचारता दुसर्यांच्या नजरेतून आपलं
सौंदर्य बघण्याची सवय सोड आता! पण तेवढं पंजाबी सोडा, हिंदीही
बोलणं मला झेपलं नसतं. त्यामुळे मी मुग गिळून ते दोघं जाण्याची वाट बघू लागले.
तेवढ्यात तिनी ठसक्यात ऐकवलं, “तुस्सी तो रेहनेही दो, बैठे
रहो चुपचाप। मैने तो डॅाली के साथही आना था शॅापिंगवास्ते, इक्क
तो फॅशन सेन्स नही है आपको,
और गल कर रह्हे है।”
त्यांचा
तिळ-गूळ असा काही जमला होता की, बत्त्याने फोडूनही फुटला नसता! मी राजरोसपणे
रुमच्या बाहेर पडले. ती आतमधून तडतडतच होती, तर
तो गपगुमान त्याला दिलेल्या स्टुलावर गूळ लावल्यासारखा चिकटून बसला होता.
No comments:
Post a Comment