पॅंडेमिकनी सर्व प्रकारची आत्मनिर्भरता शिकवली, तरीही पार्लरमधे जाऊन केस कापून घेण्याची हौस काही गेली नाही. तिथे जाऊन कॅटलॅाग बघून हजार फोटो बघून शेवटी, “बघ माझ्या चेहर्याला सुट होईल असा हेअरकट कर तुझ्या आवडीनी…”, असं म्हणून “जिच्या हाती कात्री ती केसाते उद्धारी”, ह्या उक्तीनुसार विश्वासाने डोळे मिटून शांतपणे मी बसून राहते. तास-दोन तास माझ्या केसांची कशी वाट लागली आहे, आणि किती हजारांचा चुरा करण्याची गरज आहे, हे शांतपणे ऐकून घेते. पार्लरवाली, “मी होते, म्हणून तुला जगबुडीपासून वाचवलंय!”, ह्या आविर्भावात DONE! अशी घोषणा करते. मग पुढच्या वेळी येऊन हेअर स्पा करून घेण्याच्या पोकळ आश्वासनावर मी पर्स हलकी करून घरी येते.
घरी आल्यावर वीस वर्षांच्या नवर्याकडून (लग्नाला वीस वर्षं झालीयेत, नवर्याला नाही हे सुज्ञांस सांगणे न लागे) फक्त दोनच प्रतिक्रीयांची अपेक्षा असते. “हे काय, पार्लर बंद होतं?” किंवा, “ह्या वेळी काय- बालभी कटे और पताभी नही चला? ह्यॅ ह्यॅ…” अशा विनोदांवर माझ्याकडून टाळीची अपेक्षा!! ह्या व्यतिरीक्त तिसरी कुठली प्रतिक्रीया असते का?
No comments:
Post a Comment