मराठी माणसाला श्यामच्या आईची वेगळी ओळख करून द्यायला नको खरं तर. पण तरीही सांगते,
साने गुरुजींनी लिहिलेली "श्यामची आई"
हे पुस्तक पिढ्यानपिढ्या मराठी घरा-घरांमधे संस्काराचा एक अविभाज्य भाग म्हणून वाचलं जातंय. तिची एक गोष्ट नेहमीच आमच्या घरी वादग्रस्त ठरली आहे. आधी मी माझ्या आईशी त्या गोष्टीवरून वाद घालायचे, आता माझी मुलं माझ्याशी सहमत नाहीयेत. एकदा काय होतं की, श्यामला पोहता येत नसतं,
आणि त्यामुळे त्याचे सगळे मित्र त्याला चिडवत असतात.
त्याची आई श्यामला मारून मुटकून पोहायला पाठवून देते. सरते शेवटी श्यामला पोहायला येऊ लागते, पण तो आईवर खूप रागावलेला असतो. त्यावर त्याची आई त्याला म्हणते, "अरे श्याम,
दुसऱ्या कोणी तुला भित्रा म्ह्णून चिडवू नये म्हणून मी तुला मारलं रे. तुझ्या आईला कोणी म्हणलं
की, तुझा मुलगा किती भित्रा आहे,
तर तुला आवडेल का?" आणि श्यामला हे पटलं सुद्धा!
माझ्या मुलांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना हे अजिबात पटलं नाही. ह्या पिढीला शाब्दिक मार जरी ओळखीचा असला तरी कोणी खरोखर छडीने मारून संस्कार करतं हे पटणं कठीणच आहे. आमची पिढी जरी मार खाऊनच सुसंस्कारित झाली असली तरीही आईनी असं पोहता येत नसताना सगळ्या मित्रांसमोर झोडून काढणं आणि विहिरीत ढकलून देणं जरा अमानुषच वाटायचं. त्यामागची भावना आईनी समजावून सांगितली तरीही स्वतः आई झाल्याशिवाय ते काही पचनी पडलं नाही.
बऱयाचदा आई म्हणायची, "हे शिकून घे, ते कर नाहीतर सासरी माझी लाज काढशील!"
हा बऱ्याच आयांचा अगदी आवडता डायलॉग असायचा. मानस शास्त्रात सुद्धा प्रौढपणीच्या मानसिक समस्यांचे मूळ बालपणात असतं,
अशी धारणा आहे. म्हणजेच
बालवयातले आईचे संस्कार आपल्याला आयुष्यभर पुरून उरतात. मध्ये एकदा बदक आणि त्याचं पिल्लू ह्यांची एक व्यंगचित्रांची मालिका आहे, ती वाचत होते. त्यात ते पिल्लू मोठ होऊन मानसिक उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलेलं असतं. त्याला तीन ह्या अंकाची खूप भीती वाटत असते. काही केल्या कळत नाही असं का होतंय. शेवटी त्याला संमोहित करून लहानपणीच्या आठवणी काढायला सांगतात. तेव्हा त्याला आई दिसते. ती ओरडत असते, "येतोयस की मी येऊ?
एक, दोन,
..."
ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरीही, आईने केलेले संस्कार कायमच लक्षात राहतात. बरेचदा आयांना वाटते की मुलांचं
यश त्यांच्या कर्तृत्वावर मिळालय पण त्यांच्या लहानातल्या लहान चुकांचं खापर मात्र त्या स्वतःवर फोडून घेताना दिसतात. आणि ह्यामुळे कदाचित मुलं कितीही मोठी झाली तरीही आया त्यांच्या चुका काढणं काही थांबवत नाहीत. गंमत सांगते, माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत. त्यांनाही आता सून आलीये. पण त्या काकूंची आई अजूनही त्यांना चारचौघात, "बास एवढं तूप घेऊ नकोस,
जाडी होशील." "हा रंग शोभत नाही तुझ्या रंगावर, केवढी काळवंडली आहेस!", असं आणि बरंच काही बोलत असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की आपली मुलगी आता स्वतः सासू झालीये, आजी झालीये. आता तिला शिस्त लावण्याचे दिवस गेले आहेत. त्यांच्या डोक्यात श्यामच्या आईनंच घर केलेलं असतं.
अशा कितीतरी श्यामच्या आया आजूबाजूला दिसतात. पण त्यामुळे त्यांची मुलं त्यांच्या शब्दांनी दुखावतात. आई नेहमी चूकच काढते, अशी समजूत करून घेतात. आईला मी कधी कळणारच नाही, ह्या समजुतीनं तिच्यापासून नकळत अंतर वाढवत जातात. काळाच्या ओघात जेव्हा स्वतःवर आईपण येत आणि आपण आईचेच शब्द बोलायला लागतो तेव्हा किंवा काही अभाग्यांना आई काळाच्या पडद्याआड जाते तेव्हा तिच्यातली श्यामची आई उमगत जाते.
No comments:
Post a Comment