नविनच संसाराची सुरूवात. त्यात सासर परगावचं, त्यामुळे राजा-राणीचा संसार. इतके दिवस तो बॅचलर म्हणून राहत असल्याने घर तसं रिकामंच. तिनं हौशीनं घर लावायला सुरूवात केली. आईला विचारत विचारत महिन्याची किराणा यादी आयुष्यात पहिल्यांदाच केली. सगळंच अगम्य होतं, त्यात किराण्यावाल्याचे हजार प्रश्न. “ताई, तांदूळ कोणता पाठवू?” भाताचा, हे सोडून उत्तरच सुचेना. “पोहे-जाडे की पातळ?, रवा बारीक की जाडा?” आता पदार्थांच्या शरीरयष्टीचीही अशी सर्रास चर्चा होऊ शकते, हेच तिला माहिती नव्हतं. मग परीक्षेत उत्तरं येत नसताना वापरायची तीच strategy तिनी वापरली. बिनधास्त ठोकून द्यायचं, मनाला येईल ते- दुकानदाराला काय माहिती, तिला माहिती नाहीये. घरी सामान आलं की बघून घेऊ…
तर अशा नव्या नवलाईनी तिनं किराणा आणल्यावर, आपणही घरात काहीतरी भन्नाट करावं असं त्याला वाटू लागलं. रोजच्या स्वंयापाकाला मावशी होत्याच, पण स्वयंपाकघरात फक्त तिच्याकडूनच अपेक्षा नको, म्हणून सुरूवात आपणच करावी ह्यावर आईशी तास-दीड तास चर्चा केल्यावर उपमा करून तिला surprise द्यावं, असं त्यानं ठरवलं. रेसिपी स्टेप बाय स्टेप लिहून घेतली. एक दिवस तो हाफ डे घेऊन लवकर घरी आला, अर्धा दिवस खपून उपमा केला. पण हाय रे कर्मा, तो उपम्यासारखा दिसेच ना. झाकण ठेवलं, काढलं, परतलं तरीही तो घट्टच होईना. त्यात लॅच उघडल्याचा आवाज! त्यानं पटकन गॅस बंद केला आणि बाहेर येऊन बसला.
“अगं, आता तुझ्याआधीच आलो जस्ट. मावशींनी गरम गरम केलंय काहीतरी, चल जेवून घेऊ. ये पटकन हात-पाय धुवून.” ती येईपर्यंत त्यानं ताटं मांडली आणि तिच्या कौतुकात न्हाऊन घ्यायला उत्सुक होऊन बसला. ती आली आणि म्हणाली, “अरे, पोळी नाही वाढलीस?” “पोळी?”
“पिठलं आहे नं हे?”
No comments:
Post a Comment