Thursday, October 25, 2018

दिल है हिंदुस्थानी! - ओळख

नमस्कार मंडळी!
आपल्या पैकी खूप जणांनी कधी ना कधी भारतात कायमचा परत जाण्याचा विचार केलेला असतो. पण काही कारणांनी तो पुढे ढकलला जातो. आणि असं करताना आपली नक्की ओळख कुठली तेच पुसट होत जातं; त्याविषयीची हि कविता. 



काय चुकतंय कधीपासून चुकतंय
 काहीच कळत नाही
जे हवं आहे ते मिळू नये म्हणूनही धडपड
आणि जे आहे ते निसटू नाही म्हणूनही धडपड

भूतकाळही सोडवत नाही
आणि भविष्याचीही शाश्वती नाही  
सरता सरत नाही तिथली ओढ
जोडता जोडली जात नाही इथलीही नाळ

थांबेल का तो काळ माझ्यासाठी
जो थिजला आहे फक्त माझ्यासाठी
जेव्हा होती दिवाळी रस्त्या-रस्त्यांवर
आणि कंदीलही सजले होते घरा-घरांवर

जेव्हा होते डोळे माझ्या वाटेवर
आणि वळली होती पावलंही परतीकडे

पण ... तो पणच नडला मध्ये
वर्षांची दशकं झाली पण ...पणच आला मध्ये
ना इथले होऊ शकलो
ना तिथलेही होऊ शकू

आता  वाट बघता बघता मीही हरवेन
आणि माझा वाट बघणारा रस्ताही ...
काय चुकतंय कधीपासून चुकतंय
 काहीच कळत नाही!

#proudToBeIndian