Thursday, June 9, 2022

आतूर

   


 

        आज-काल फक्त तुझाच विचार असतो मनात. कधी एकदा तुला भेटतेय असं झालंय. तुझ्या नुसत्या आठवणींनीही अंगावर काटा फुलून येतो. स्वतःशीच मी हसू लागते आणि आजूबाजूच्यांना मला चिडवण्याचं जणू निमित्तच मिळतं. तू आलास की हे करू, ते करू असं मी वर्षभर ठरवत राहते. तू आलास की, तुझ्याबरोबर लांबवर बाईकवर भटकायला जायचंय. माहितीये की, तुझ्याबरोबर बाईकवर भटकायचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तरीही वेडं मन अजूनही आशा ठेवून आहे. बाईक नाही तरी निदान लॉन्ग ड्राईव्हवर जाऊया, आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून जगाची पर्वा न करता दोघंच डोळ्यात डोळे घालून हरवून जाऊया. तू माझ्याबरोबर असलास ना की, वाफाळणारा टपरीवरचा चहा सुद्धा अगदी अमृततुल्य होऊन जातो.

 महिने, आठवडे करत काही दिवस येऊन ठेपलेत. तुझ्या येण्याची चाहूल जरी लागली नं तरीही मला आपसूकच कळेल. तुझ्याआधीच तुझा गंध जीवाला वेडापिसा करेल. आणि मग ती आतुरता माझ्या रंध्र-रंधातून पाझरू लागेल. तुला जाणवतेय का रे माझी तगमग?

     तू येशील नं तेव्हा मी जगाचा शिरस्ता पाळून दुरूनच तुझ्याकडे पापणी लववत बघत राहीन. पण मला माझाच भरवसा नाहीये. तू समोर आलास की, मी धावत धावत येऊन तुला घट्ट मिठीत घेईन पण तूही दुष्ट आहेस,काही कळायच्या आधीच कदाचित तू माझ्या मिठीतुन हळूच निसटून जाशील. तू भेटलास की नुसता भासच होता, ह्या विचारांनी मग अजूनच जीवाची काहिली होईल. पण त्या पुसटत्या भेटीनी तू पुन्हा पुन्हा येऊन मला चिंब चिंब भिजवणारा आहेस, ह्याची मला खात्री पटवशील. ये रे लवकर, नको आता ताटकळत ठेवूस.

 - पावसाची आतुरतेने वाट बघणारी पक्की मुंबईकर!

 

Monday, June 6, 2022

दिल है हिंदुस्थानी- वढाळ मन!

 

    उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं ठरलं की, आधी कोण-कोण येणार आहे ह्याची यादी होते. व्हॅट्सऍपवर एक ग्रुप केला जातो.  सगळ्यांच्या सुट्ट्या, बायकांच्या माहेरी जायचे दिवस, मोठ्या आजीकडे जमायचे दिवस सगळ्याचाच ताळमेळ घालायचा असतो. मोठया आजीला सगळे मोठी आजीच म्हणतात. आजोबा सगळ्या भावंडांत मोठे, त्यामुळे त्यांना मोठे आबा, आणि आजीला मोठी आजी म्हणूनच हाकी मारली जायची.

    सगळ्यांच्या सोयींनी एक दिवस ठरतो भेटीचा.  प्रत्येकाची वेगळीच तर्हा. कोणी हॉल बुक करायचा सुचवतं तर कोणी रिसॉर्ट! कोणाला लग्नाच्या पंगतीचा मेनू ठेवायचा असतो तर कोणाला चाट. कोणी म्हणतं सगळं बाहेरून मागवू, म्हणजे गप्पा मारता येतील तर कोणी सगळे मिळून गाणी ऐकता-ऐकता उकडीचे मोदक करायचा घाट घालतं. शेवटी सगळ्यात उत्साही चंदा मावशी हातात दोऱ्या घेते. तुम्ही सगळ्यांनी ठरलेल्या दिवशी माझ्याच  घरी या, मोठी आजी दमलीये आता. तिलाही जरा आराम मिळेल. बाकी सगळं मी बघून घेईन. चंदा मावशीकडे जायचंय म्हंटल्यावर मागच्या वेळी तिच्याकडे कशी धम्माल केलेली त्याचे किस्से रंगतात. मग एक दादा कोणते-कोणते खेळ खेळायचे त्याची जबाबदारी घेतो, एखादी ताई सगळयांसाठी छोट्या-छोट्या भेटवस्तू आणायचं ठरवते.

    बघता-बघता भेटीचा आठवडा येतो. पुढे-मागे करत सगळे गावी जमतात. गावी कोणी मोठ्या आजीकडे, कोणी मावशीकडे, कोणी मामाकडे उतरतं. चंदा मावशीकडे सगळे जमतात. तिनी सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून साधाच पण रुचकर स्वयंपाक ठरवलेला असतो. मग उरलेल्या स्वयंपाकात सगळेच हातभार लावतात.  कोणी कोशिंबीर करतं, कोणी पापड-कुरडया तळायला घेतं. हसत-खेळत जेवणं होतात. ठरलेले खेळ सुरु होतात, पण तोपर्यंत मोठ्यांच्या डुलक्या सुरु झालेल्या असतात. मग घोरण्याची जुगलबंदी सुरु व्हयायच्या आत मुलं पडवीत सटकतात, पत्यांचे डाव रंगतात.

    संध्याकाळचा चहा-गप्पा संपता संपत नाहीत. पण आता जायची वेळ झालेली असते. सगळ्यांचेच पाय जड झालेले असतात. मोठ्या आजीनी, चंदा मावशीनी, मामींनी वानोळा भरून दिलेल्या पिशव्या सांभाळत निरोप घेतला जातो. निघताना, "आता एकदा शांतपणे भेटू आमच्या घरी, वेळ काढून या. मग जरा गप्पा तरी होतील." इतका वेळ काय चाललेलं  मग? मुलं एकमेकांना डोळ्यांनीच खुणावतात.

 

उन्हाळयाच्या दिवसात बहुतांशी परदेशात स्थायिक झालेले माझ्यासारखे भारतीय सुट्टी काढून भारतात जातायेत, जाणार आहेत किंवा ठरवतायेत. त्या सगळ्यांच्याच मनात भारतात जायच्या आधी अशा आठवणींचं माहोळ उठलेलं असतं. लहानपणच्या आठवणींनी मन केव्हाच तिकडे पोहोचलेले असते. भारतात पोहोचलं की, काळाच्या खुणा चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून आणि थकलेल्या हालचालींमधून जाणवतात. पण मनात अजूनही कंबर कसून सगळ्यांचं उत्साहानी करणारी आई असते, केसांना थरथरत्या हातानी तेल लावून देत "काय वाट लावलीस ग केसांची..."असं म्हणणारी काळाच्या पडद्या आड गेलेली आजी असते. एकत्र जमून सासरी सगळ्यांनी केलेली धम्माल असते, जी आता काळानुसार होणार नसते. सगळ्यांना एकत्र भेटलं तरीही, "तू घरी आलीच नाहीस, एकदा ये वेळ काढून." अशी प्रेमळ तक्रारही होणार असते. आणि त्या तक्रारींसाठी, वेळ जमवून भेटण्यासाठी, हक्कानी भांडण्यासाठी, लाड करून घेण्यासाठी आणि काही जणांना कदाचित शेवटचं भेटण्यासाठी वढाळ मन  आतापासूनच भरून आलेलं असतं.

#proudToBeIndian