Sunday, January 9, 2022

गुलाबजाम!



लहान मुलं तुम्हाला आयत्या वेळी तोंडघशी पाडण्यासाठीच जन्म घेतात, अशी माझी तरी ठाम समजूत आहे. लहान असताना घरी कोणी आलं आणि आपण मुलांच्या गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला की, ते तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. कोणाकडे गेलो की, आपण मारे सांगावं, “ह्याला नं जिलबी अजिबात आवडत नाही, नका वाढू पानात.” त्याबरोबर त्यानं जिलब्यांची परातच उडवावी! त्यामुळे शक्यतो चारचौघात मी काही बोलायला घाबरते. पण कधी कुठली गुगली येईल, ह्याचा पत्ता नसतो. 

         मागच्या आठवड्यात आम्ही एकांकडे जेवायला गेलो होतो. त्या मैत्रीणीकडे तिची मोठी जाऊ-दीर, सासू-सासरे असा सगळा गोतावळा जमला होता. त्या काकू सुगरण म्हणून प्रसिद्ध होत्या. वर्हाडी, खानदेशी, चायनिज, काहीही खावं ते त्यांच्याच हातचं. मीठ, साखर, तेल, चमचमीत, तवंग असल्याशिवाय पदार्थाला रुची येऊच शकत नाही, ह्यावर ठाम विश्वास! आता त्यांच्या हातचं खायला मिळणार म्हणून मी मनातल्यी मनात खूप खूष होते. पानावर बसल्यावर नजरच आधी त्रुप्त झाली. डावी-उजवी बाजू तर सजली होतीच, पण सगळ्यात शान घेणारे एकसारख्या आकाराचे गोल- गरगरीत पाकात विराजमान झालेले गुलाबजाम माझी ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी खुणावत होते. आजूबाजूच्यांना काय वाटेल ह्याची तमा न बाळगता मी गुलाबजामनीच सुरुवात केली. बोटांनी उचलताच गुलाबजामचा लुसलुशीतपणा जाणवला. खळी पडून ललनेचं अस्फुटसं स्मितहास्य हलकेच ठिबकावं, तसा त्यातला पाक हलकेच एक-दोनच थेंब ठिबकला. त्या गुलाबजामला ताबडतोब मी जीभेवर ठेवलं, अन् आपोआपच डोळे मिटून समाधिस्थ झाले. अक्षरश: तो गुलाबजाम विरघळलाच आणि तो अस्सल खवा, प्रत्येक कणात समरस झालेला माफक गोड असलेला पाक झिरपत -सुख म्हणजे काय ह्याची अनुभूती देऊन गेला. त्या स्वर्गीय अनुभवातून प्रुथ्वीवर यायला मला जरा वेळच लागला. डोळे उघडले तर सगळेजण माझ्याकडेच बघत होते. त्यांच्या नजरा बघून माझी, “ हे धरणीमाते, पोटात घे.” अशी अवस्था झाली. सावरून घ्यायचं म्हणून मी मनापासून दाद द्यायला सुरुवात केली. “काकू, काय गुलाबजाम झालेत, महान! इतके सुरेख गुलाबजाम मी कधीच खाल्ले नव्हते.” नवर्याचीही अवस्था तीच होती. तो म्हणाला, “ ह्यापुढे दुसरीकडे कुठेही गुलाबजाम खाणंच अशक्य! कसं जमतं तुम्हाला? हिला पण एकदा शिकवा जरा.” अस्सा राग आला नं! मी का शिकू? काही गोष्टी इतरांनीच कराव्यात, आपण त्या हाणाव्यात, त्यांचं मनापासून कौतुक करावं, ह्या मताची मी आहे. सगळंच मला जमायला लागलं तर इतरांच कौतुक करण्यची संधी कधी मिळणार? तर काकूंचं असं मनापासून कौतुक चालू असताना त्या समजावत होत्या की, “काही नाही रे, इतकी वर्षं करतेय मी. अनुभवाने जमेल तिलाही.”  आग्रहानी त्या अजून गुलाबजाम वाढायला लागल्या. तितक्यात आमचे चिरंजीव पचकलेच, “मावशी, गुलाबजाम तर तू कालच केलेलेस नं? मी संध्याकाळी आलेलो तर तू मला आणि शंतनुला चवीसाठी दिलेलेस, आठवतंय? आजी तर आज सकाळी आल्या, त्यांनी नाही केले काही!” 


पुन्हा एकदा “ हे धरणीमाते, पोटात घे….”


Picture from Google search.

पोळी

नविनच संसाराची सुरूवात. त्यात सासर परगावचं, त्यामुळे राजा-राणीचा संसार. इतके दिवस तो बॅचलर म्हणून राहत असल्याने घर तसं रिकामंच. तिनं हौशीनं घर लावायला सुरूवात केली. आईला विचारत विचारत महिन्याची किराणा यादी आयुष्यात पहिल्यांदाच केली. सगळंच अगम्य होतं, त्यात किराण्यावाल्याचे हजार प्रश्न. “ताई, तांदूळ कोणता पाठवू?”  भाताचा, हे सोडून उत्तरच सुचेना. “पोहे-जाडे की पातळ?, रवा बारीक की जाडा?” आता पदार्थांच्या शरीरयष्टीचीही अशी सर्रास चर्चा होऊ शकते, हेच तिला माहिती नव्हतं. मग परीक्षेत उत्तरं येत नसताना वापरायची तीच strategy तिनी वापरली. बिनधास्त ठोकून द्यायचं, मनाला येईल ते- दुकानदाराला काय माहिती, तिला माहिती नाहीये. घरी सामान आलं की बघून घेऊ…

तर अशा नव्या नवलाईनी तिनं किराणा आणल्यावर, आपणही घरात काहीतरी भन्नाट करावं असं त्याला वाटू लागलं. रोजच्या स्वंयापाकाला मावशी होत्याच, पण  स्वयंपाकघरात फक्त तिच्याकडूनच अपेक्षा नको, म्हणून सुरूवात आपणच करावी ह्यावर आईशी तास-दीड तास चर्चा केल्यावर उपमा करून तिला surprise द्यावं, असं त्यानं ठरवलं. रेसिपी स्टेप बाय स्टेप लिहून घेतली. एक दिवस तो हाफ डे घेऊन लवकर घरी आला, अर्धा दिवस खपून उपमा केला. पण हाय रे कर्मा, तो उपम्यासारखा दिसेच ना. झाकण ठेवलं, काढलं, परतलं तरीही तो घट्टच होईना. त्यात लॅच उघडल्याचा आवाज! त्यानं पटकन गॅस बंद केला आणि बाहेर येऊन बसला.

“अगं, आता तुझ्याआधीच आलो जस्ट. मावशींनी गरम गरम केलंय काहीतरी, चल जेवून घेऊ. ये पटकन हात-पाय धुवून.” ती येईपर्यंत त्यानं ताटं मांडली आणि तिच्या कौतुकात न्हाऊन घ्यायला उत्सुक होऊन बसला. ती आली आणि म्हणाली, “अरे, पोळी नाही वाढलीस?”  “पोळी?”

“पिठलं आहे नं हे?” 

🤯😅

हेअरकट



पॅंडेमिकनी सर्व प्रकारची आत्मनिर्भरता शिकवली, तरीही पार्लरमधे जाऊन केस कापून घेण्याची हौस काही गेली नाही. तिथे जाऊन कॅटलॅाग बघून हजार फोटो बघून शेवटी, “बघ माझ्या चेहर्याला सुट होईल असा हेअरकट कर तुझ्या आवडीनी…”, असं म्हणून “जिच्या हाती कात्री ती केसाते उद्धारी”,  ह्या उक्तीनुसार विश्वासाने डोळे मिटून शांतपणे मी बसून राहते. तास-दोन तास माझ्या केसांची कशी वाट लागली आहे, आणि किती हजारांचा चुरा करण्याची गरज आहे, हे शांतपणे ऐकून घेते. पार्लरवाली, “मी होते, म्हणून तुला जगबुडीपासून वाचवलंय!”, ह्या आविर्भावात DONE! अशी घोषणा करते. मग पुढच्या वेळी येऊन हेअर स्पा करून घेण्याच्या पोकळ आश्वासनावर मी पर्स हलकी करून घरी येते. 

    घरी आल्यावर वीस वर्षांच्या नवर्याकडून (लग्नाला वीस वर्षं झालीयेत, नवर्याला नाही हे सुज्ञांस सांगणे न लागे) फक्त दोनच प्रतिक्रीयांची अपेक्षा असते. “हे काय, पार्लर बंद होतं?” किंवा, “ह्या वेळी काय- बालभी कटे और पताभी नही चला? ह्यॅ ह्यॅ…” अशा विनोदांवर माझ्याकडून टाळीची अपेक्षा!!  

ह्या व्यतिरीक्त तिसरी कुठली प्रतिक्रीया असते का? 😆

दिल है हिंदुस्थानी- कोठा

 


भाडिपामुळे एव्हाना एरंडेल, करत्या सवरत्या मुलांना लहानपणी ढुंगणं धुतल्याची आठवण उठता बसता  करून देण्याची आईची सवय सगळ्यांना परिचीत झालीये. 

आणि गंमत म्हणजे ही सवय फक्त मराठी आयांपुरता मर्यादित नसून सर्वप्रांतीय आयांची खासियत आहे.
आमच्या लहानपणी माझ्या आईच्या मैत्रीणींमधे गुजराथी, तामीळ, पंजाबी अशांचाही सहभाग होता. त्यातल्या एकीच्या मुलाला ( रुपेश) पाणी न पिणे आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होणे हा वरचेवर होणारा त्रास होता. 
रुपेश शाळेतून घरी येताच “टट्टी हुई? पानी पिया? “ हे प्रश्न बिल्डिंगमधल्या कोणत्याही काकू बिनधास्तपणे विचारायच्या. कधी कधी रूपेश जिना चढता चढताच “टट्टी आ गई….” असं ओरडत यायचा. सार्वजनिक पातळीवर रूपेशच्या टट्टीची चर्चा व्हायची, आणि त्यात कोणालाही काहीही वावगं वाटायचा प्रश्नच नव्हता! 

तसंच मला आठवतोय पंगतीतला एक प्रसंग. आमची लहान मुलांची पंगत बसली होती. गावाकडे कोणाचं तरी लग्न होतं. सगळ्यांना पानं वाढून झाल्यावर “वदनी कवळ..” म्हणून झालं. पहिल्या वाढलेल्या भाताच्या मुदीवर वरण अगदी नावापुरतं वाढलेलं. त्यामुळे मुदीचं आळं करून आम्ही वरणाची वाट बघत होतो. कुमुद आत्या वरण वाढायला लागली. ती वाढत असताना पंगतीच्या दुसर्या टोकाहून खणखणीत आवाजात (अर्थात दुसरी कुठली पट्टी अवगतच नव्हती कोणालाच!) आजी ओरडली, “पिंट्याला वरण वाढ गं. कोरडं कोरडं खातो आणि परसदारी कुंथत बसतो!” त्यावर फिदी-फिदी हसताना आमची पुरती वाट लागली होती. 

आता आम्हालाही मुलं झाली आहेत. आताच्या काळात हे विषय मुलांसाठी embarrassing असतात, ह्याची जाणीवही आहे. तरीही अजूनही कधी आईला फोन करून सागितलं की, “बघ नं, आजही ह्यानी डबा परत आणला, नाकी नऊ आणलेत माझ्या!” किंवा, “आजकाल बोलतच नाही काही, सारखे फोनमधे डोकी खुपसून असतात…” असा कुठलाही प्रॅाब्लेम सांगितला की ह्यावर तिचा रामबाण उपाय ठरलेला असतो- “ह्या रविवारी जंताचं औषध देऊन बघ…” 
त्रास काहीही असो, पिढी कुठलीही असो, उपाय ठरलेला!
कोठा साफ, तर शरीर साफ 😄

#proudToBeIndian

स्वप्नातल्या कळ्यांनो…

 


खूप वेळा वाटतं की, तुला एकदा विचारून टाकावं. तुझ्यासाठी मी नक्की कोण आहे? ओळख, मित्र, जवळचा मित्र की त्याहीपेक्षा वेगळं काही? पण पुन्हा एकदा विचार येतो, न जाणो तू खरं बोललीस आणि तुझं सत्य मला पचवता नाही आलं तर? आहे का माझी तयारी, तुझ्या मनातलं जाणून घेण्याची, की माझ्या जागेपणीच्या स्वप्नातलीच तू खरी आहेस? आताशा तर खरं काय आणि  माझ्या मनातलं काय ह्याच्या सीमारेषाही धुसर होत चालल्या आहेत. ह्या न संपणार्या स्वप्नातून मला स्वतःला उठवायचंच नाहीये.
सगळे आजूबाजूला असतानाही मी सिगरेट हाती घेतल्याबरोबर तुझा नापसंतीचा कटाक्ष मला कळून मी आपसूकच ती सिगरेट परत ठेवून देतो, तू मात्र नामानिराळी राहून चहाचे घुटके घेत गालातल्या गालात हसत राहतेस. 
तासन्तास आपल्या गप्पा रंगलेल्या असतात. आपल्या ह्या जगावेगळ्या मैत्रीला कोणी नावं तर ठेवणार नाही नं, ह्या विचारानं मी कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे बघत राहतो. माझं लक्षच नाहीये असं वाटून वैतागून तू निघून जातेस, अन् तुला माझ्या मनातल्या भावना का नाही कळत म्हणून धुसमुसत राहतो.
मी खुलून बोलावं म्हणून तू डिवचत राहतेस, आणि तुला सगळं कळूनही तू न कळल्याचं दाखवतेस म्हणून मी तणतणत राहतो. माझ्या ह्या अशा वागण्यानं हल्ली तू दुरावते आहेस. पण खरंच दुरावते आहेस की, कधी जवळच नव्हतीस? 
सांग नं गं एकदा, मी कोण आहे तुझ्यासाठी? पण नको, तो प्रश्नही नको, अन् तुझं उत्तरही नको. मी असंच मनापासून आजन्म तुझ्यावर प्रेम करत राहीन, बंधनात न अडकता. तुझ्या आवडत्या गाण्यासारखं- 
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा…”