Friday, September 16, 2022

हिरकणी

"काय गं काय ठरवलंस? आवडलाय का तुला काल आलेला मुलगा? त्यांचं स्थळ कागदोपत्री तरी छान वाटतंय. पण तसे तर सगळेच चांगले वाटतात. पण तुला आवडला पाहिजे मुलगा. तुलाच आयुष्यभर संसार करायचाय त्याच्याबरोबर. काय बोलतेय मी, रेवा? आहे का लक्ष?" "आई, मला नाही करायचंय गं लग्न इतक्यात. काय सारखी तुम्ही स्थळं आणता आणि काल तर कहरच केलाय तुम्ही. मला उशीर होतोय, मी चालले ऑफिसला, बाय!" "अगं, उत्तर तर दे, हो की नाही- एवढं तर सांग. तुला दुसरा कोणी आवडत असेल तर सांग तसं, हेही सांगितलंय ना तुला? तेही धड सांगत नाहीस तू. इथे बस थोडा वेळ. घरी आपण दोघीच आहोत आता, तर निवांत बोल थोडी माझ्याशी. आणि तुझी ट्रेन आठ अडतीसची असते, हे माहितीये मला. आहे अजून अर्धा तास." धुसफुसत रेवानी पायातली चप्पल काढली आणि पाय आपटत येऊन सोफ्यावर मान खाली घालून हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत बसली. तिच्याकडे बघत अश्विनी विचारू की नको विचारू अशा संभ्रमात, मनातलं वादळ थोपवत शांत बसून राहिली. रेवा बोलायला सुरुवात करेल, अशी आशा ठेवणं फोलच होतं. शेवटी तिनंच चाचपडत सुरुवात केली. " रेवा, बाळा आतापर्यंत मी किंवा तुझ्या बाबानी कधीच तुझ्यावर कुठली जबरदस्ती केली नाहीये. आणि त्यात काही मोठेपणा नाहीये, अर्थातच. लहानपणापासून तुला हवे ते खेळ आणून दिले. तू मुलगी आहेस म्हणून अशीच वाग, असेच कपडे घाल, इतके वाजताच घरी ये असेही काही निर्बंध घातले नाहीत. तुला मेकॅनिकल इंजिनियरिंग करायचं होतं, केलंस. स्वतःच्या मेहनतीने चांगले मार्क्स मिळवून छानशी नोकरीही मिळवलीस. आता सव्वीसची होशील ह्या वर्षी. आम्हाला कायम चाकोरीबद्ध विचारात राहण्याची सवय आहे गं. एका विशिष्ट वयाच्या टप्प्यात शिक्षण, लग्न, मुलं व्हायायला पाहिजे, अशा विचारसरणीची आमची पिढी. पण सगळ्यांचं तसंच व्हयायला पाहिजे असं नाहीये नं. आता जागरूकता वाढतेय. थोडं-थोडं मी ही तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतेय बाळा. पण तू बोल माझ्याशी, सांग मला तुला काय वाटतंय ते. तुला मुलांऐवजी मुली बघायला सुरुवात करू का आम्ही? की तुझी कोणी खास मैत्रीण असेल तर आण तिला घरी..." आईनी एवढा मोठ्ठा बॉम्ब टाकल्यावर रेवानी दचकून मान वर करून बघितलं. एक क्षण तिला वाटलं बोलून टाकावं सगळं मनातलं. एवढे पुढारलेले विचार आई कधी बोलू शकेल असं ह्या जन्मात तिला कधी वाटलं नव्हतं. पण तरीही तिला आपल्याबद्दल कसं सांगावं, ते रेवाला कळत नव्हतं. तिनं आईला उडवून लावलं,"काहीही काय बोलतेयस आई तू. अगं, लग्न नाही करायचंय सध्या म्हणजे काय मी लगेच लेस्बियन झाले तुझ्यासाठी! जरा इंटरनेट कमी वापरत जा. जगू देत मला स्वतंत्रपणे. लग्न झालं की ते सण-वार, सासरच्या पद्धती , जबाबदाऱ्या, नको बाई इतक्यात हे सगळं. चल, तुझ्याशी बोलण्यात माझी आठ-अडतीस निघून जाईल. पळते मी." असं बोलता बोलता ती सरसर जिना उतरून निघूनही गेली. अश्विनी मात्र ती गेल्याच्या दिशेने नुसती दिग्मूढासारखी बघतच राहिली. समीरशी ह्या विषयावर बोलणंच शक्य नव्हतं. त्याला हे असलं काही नैसर्गिक असतं हेच मुळी मान्य नव्हतं. त्याचीही काय चूक. एकंदरीतच लैंगिकता किंवा तत्सम त्याज्य विषयांवर बोलण्याची मानसिकताच नव्हती आजूबाजूच्या कोणाचीच. पण अश्विनी एच. आर. मध्ये असल्यानी तिला डायव्हर्सिटीबद्दल जाणीव होती. कोणाचीही लैंगिकता फक्त स्त्री आणि पुरुष अशा साच्यांमध्ये बांधता येत नाही. निसर्गात काळा आणि पांढरा असे दोनच रंग नसतात तर वैविध्य असतं. तसंच समलिंगी असणं, अलैंगिकता ही काही कोणाच्या प्रभावाखाली येऊन किंवा संगतीचा परिणाम होऊन झालेली तात्पुरती बाब नसते. वयाच्या तिसाव्या वर्षी हे सगळं पहिल्यांदाच ऐकल्यावर खूप सारे प्रश्न उमटले होते तेव्हा आणि परदेशातून आलेल्या कौनिसलरने शांतपणे सगळ्या प्रश्नांची संयमित उत्तरही दिली होती. घरी आल्यावर समीरशी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्नही केला होता अश्विनीने, पण व्यर्थ! वीस वर्षांपूर्वी झालेले ते संवाद आजही बदललेले नव्हते. लहानपणापासून अश्विनीला रेवाचं वेगळेपण जाणवत होतं. काय आणि कसं ते नेमकं शब्दात नाही मांडता येणार, पण रेवा इतर मुलींसारखी नाही, हे तिला कुठे तरी आत खोलवर जाणवत राहायचं. ती वयात येताना, तारुण्यात पदार्पण करताना अश्विनीने कधीच तिला कोणाबद्दल हळवं होताना बघितलं नव्हतं. रेवा अभ्यासू आहे, तिचं संपूर्ण लक्ष तिच्या गोल्सवर असते, असं समीर अभिमानाने सांगायचा. तरीही अश्विनीला कुठं तरी काहीतरी खटकत राहायचं. तिला स्वतःचे मोरपंखी दिवस आठवायचे. कोणत्याही मुलानी आपल्याकडे बघून हसलं, बोललं की त्याच्या प्रेमात पडल्यासारखं वाटणं आणि तो नजरेआड होताच आपण ते विसरूनही जाणं. खरंच किती अल्लड वय असतं ते. तासन्तास आरशासमोर असतात मुली, मुलीच काय मुलंही! केसांचा झुपका काय काढतील, हजार वेळा गुळगुळीत दाढीच काय करतील, एक-एक प्रकार करून कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचे-कोणाला तरी प्रेमात पाडण्याचे ते दिवस. ते कॉलेजचे दिवस डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखे असतात. मुलांना वाटतं की, आई-बाबांना काय कळतंय? पण ते विसरतात की , आई-बाबाही कोणे एके काळी ह्या सगळ्यातून गेलेले असतात. रेवा कॉलेजमध्ये गेल्यापासून अश्विनी तिच्याशी नेहमी मोकळेपणानी सगळ्या विषयांवर चर्चा करायची, तिची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करायची. तिच्या कुठल्या कुठल्या मित्रांवरून चिडवायचीही. पण रेवा नेहमीच उडवून लावायची. मग अश्विनीही तो विषय सोडून द्यायची. की जाऊ देत, हे दिवस अभ्यासाचेच आहेत. एक प्रकारे रेवा ह्या सगळ्याचा आता विचार करत नाहीये हे चांगलंच आहे. पण मग शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुरु झाली, त्यालाही आता चार-पाच वर्षं होऊन गेली. तरीही रेवा कोणाबद्दलच घरी काही सांगत नाही म्हंटल्यावर अश्विनीने आडून-आडून विचारून बघितलं. हिचं आपलं एकच- "इतक्यात लग्न कराय चं नाहीये मला..." सरते शेवटी पंचवीस पूर्ण झाल्यावर अश्विनी आणि समीर तिचं नाव नोंदवून आले. आधी आधी तर कोणत्याच स्थळाची माहिती तिला आवडायची नाही. हा काय भारताबाहेर राहतो, हा मुंबईतला नाहीये, ह्याचं शिक्षण किती कमी आहे, त्याला पगारच कमी आहे. एक ना दोन, काही ना काहीतरी कारण काढून ती स्थळं बाद करायची. शेवटी कंटाळून समीरने ठरवलं की आपल्याला आवडेल ते स्थळ सरळ घरीच बोलवायचं आणि बघायचा कार्यक्रम ठेवायचा. मग बघू रेवा काय करते ते. अश्विनीला खरं तर ते अजिबात पटलं नव्हतं. पण दोघंही बाप-लेक स्वतःचं खरं करणारे होते. त्यामुळे त्यांच्यापुढे अश्विनी वाद टाळायचा, म्हणून गप्पच बसायची. तर काल रात्री रेवा घरी आली तेव्हा मुलाकडचे घरी येऊन बसलेले. तिला काय बोलावं-करावं काही सुचलंही नाही. कसाबसा तो कार्यक्रम आटोपला. मुलाकडचे घरी गेल्यावर, रेवा कपडे बदलून काहीच ना बोलता झोपून गेली. समीरलाही त्याची चूक जाणवली असावी. तोही उद्या बोलू, आज झोपू देत तिला, असं म्हणून झोपायला गेला. अश्विनी मात्र रात्रभर टक्क जागीच राहिली. काही झालं तरी आता सोक्ष-मोक्ष लावायचाच, असं तिनं ठरवलं. इकडे ट्रेनमध्ये बसल्यावर रेवाचा विचार सुरु झाला. नक्की काय सांगू आईला-बाबाला? त्यांना कळेल का? लहानपणापासून त्यांना बोलताना ऐकलंय, "तुझ्या घरी बोलावशील ना आम्हाला?", "तू सासरी होऊन निघून जाशील गं आणि आम्ही बसू तुझी आठवण काढत..." "इथे आहेस तोपर्यंत लाड आहेत, नवऱ्यालाच कामाला लावशील असं दिसतंय तुझं ..." वरवर साधी-सरळ वाटणारी ही वाक्य कित्ती त्रास द्यायची मला. नाही करायचंय मला लग्न- ना मुलाशी ना मुलीशी! मला त्या दृष्टींनी आवडलंच नाही कधी कोणी! नाही म्हणता उगाच जगाला दाखवायचं म्हणून मीही मैत्रिणींमध्ये, "तो कसला हॉट आहे नं?", "भारी बॉडी बनवलीय यार त्यानी ..", अशा वाक्यांना दुजोरा देत राहायचे. पण हे असं त्यांना का वाटतं, हे कळलंच नाही कधी. २०१९ मध्ये ३७७ची बातमी आल्याने दबक्या वाजत सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. मग एकदा कॅम्पफायरच्या वेळी मनाली आणि आहनानी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. तेव्हा किती वेगळं वाटलेलं. मग पुढचे काही महिने मुलींकडे बघून आपल्याला काही वाटतंय का हे चाचपडण्यात गेले. विचार कर-करून डोक्याचा भुगा व्हायायचा. मी नक्की कोण आहे, मला कोणीच का नाही आवडत तसं? मित्र-मैत्रिणी पोत्यानी आहेत पण कोणाबद्दलच आकर्षण का वाटत नाही? माझ्यासारखे दुसरं कोणी असेल का? की मला काही मानसिक आजार आहे? कोणाला सांगताही येत नाही आणि विचारताही येत नाही. कोंडी झाली होती मनाची. इंटरनेटवर सर्च करून करून शेवटी ह्याला अलैंगिकता म्हणतात. विषमलिंगी-समलिंगी जसे असतात तसेच अलैंगिकही असतात. ज्यांना नैसर्गिकतःच कोणाबद्दलच शारीरिक आकर्षण वाटत नाही. ते वाचून जीव भांड्यात पडला होता. जगभरात माझ्यासारखे हजारो आहेत हे वाचून मन शांत झालं होतं. ते कळल्यानांतर कोण काय बोलतंय, कोणाला माझ्याबद्दल काय वाटतंय हा विचार करणंच थांबवलं. सगळं सुरळीत चालू असताना मधेच आई-बाबानी लग्नाचं टुमणं सुरु केलं. इतके महिने तर स्थळांमध्येच खोट काढून मी वेळ काढत होते, पण काल तर त्यांनी सरळ मुलालाच समोर आणून उभं केलं! आईला आता सांगणं भागच होतं. नाहीतर ती भलतेच विचार करत बसेल. पण सांगू तरी कसं? असा विचार करता करता माटुंगा कधी आलं ते कळलंही नाही. ऑफिस गाठल्यावर सगळेच विचार बाजूला पडले. दुपारी आईचा मेसेज आला की, आज आपण दोघीच आहोत रात्री जेवायला. तर आपण आज मस्तपैकी चायनीज खायला बाहेर जाऊया. बाबा त्याच्या मित्रांबरोबर जाणार होता. बाबा जेवायला नसला की त्या दोघींचा हा ठरलेला बेत असायचा. मग पटापट कामं संपवुन रेवा घरी जायला निघाली. घरी लवकर जाऊन आईसाठी आणि तिच्यासाठी मस्तपैकी भरपूर आलं घालून तिनं चहा केला. तेवढ्यात अश्विनीही घरी पोहोचली. चहाच्या नुसत्या वासानंच तिचा दिवसभराचा क्षीण निम्मा कमी झाला. चहाचे घुटके घेता-घेता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रेवानीच विषय काढला. "आज सकाळी अर्धवटच बोलणं झालं नं." "हो नं, तुला जायची घाई होती ना..." "आई, एक विचारू? तू मला मुली आवडतात का, असं का विचारलंस?" "अगं, सहजच. तुला लग्न कराय चं नाही म्हणतेस, मुलं नाकारतेयेस तर म्हंटलं एकदा विचारून बघावं. तुला कोण आवडतं हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला कोणीही आवडलं तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाहीये, हे माहितीये ना तुला? शेवटी तू खुश असावीस, एवढंच हवंय गं आम्हाला दोघांनाही ." "आणि कोणीच आवडत नसेल तर?" "म्हणजे?" "स्पष्टच बोलायचं झालं तर तुला LGBTQ+ बद्दल माहिती आहेच. पण त्यातल्या + बद्दल काय माहितीये?" ह्यावर अश्विनी निरुत्तर झाली. आपण पुढारलेले आहोत, आपल्याला डायव्हर्सिटीबद्दल माहिती आहे, ह्याचा वाटणारा फाजील आत्मविश्वास एका क्षणात गळून पडला. "फारशी नाही गं माहिती. तू समजावून सांग नं मला.." "कुठून सुरुवात करू? जगभरात २३च्या आसपास वेगवेगळ्या सेक्शुऍलिटीज आहेत. आपल्या भाषा अजून समृद्ध होतायेत. एवढी विविधता असते निसर्गात, जी अजून माणसांना शब्दबद्ध करताही आली नाहीये. तर त्या + मध्ये असेक्शुअल म्हणजेच अलैंगिक असाही प्रकार असतो, हे ऐकलेलंस का?" खटकन ट्यूब पेटावी तशी अश्विनी वीस वर्षांपूर्वीच्या त्या सेमिनारमध्ये जाऊन पोचली. त्यात काहीतरी उल्लेख होता खरा. "हो गं, अंधुक ऐकल्यासारखं आठवतंय. म्हणजे ज्यांना शारीरिक आकर्षण वाटत नाही तेच ना?" "हो, बरोबर. तसंच. पण त्यातही खूप व्हेरिएशन्स असतात. म्हणजे अशी माणसं प्रेमात पडू शकतात, लग्नही करू शकतात. पण त्यांचं नातं खूप वेगळ्या लेव्हलचं असू शकतं गं. ते तू म्हणतेस नं, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच! त्यामुळे अगदी हताश होऊ नकोस. मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात. आणि पुढे मागे मी कदाचित लग्नही करीन किंवा नाहीसुद्धा करणार. पण त्यानी काहीच फरक पडत नाहीये मला!" अश्विनी सुन्न झाली. मनावरचं मळभ हळूहळू दूर होत होतं. रेवा हळूच तिच्या मांडीवर डोकं ठेवून कुशीत शिरली. सवयीनं अश्विनी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. मणा-मणाचं ओझं उतरून हलकं-हलकं वाटत होतं आता रेवाला. ह्यापुढचा प्रवास सोपा नसला तरीही त्यासाठी सज्ज होणं भाग होतं. रेवा तर मोकळी झाली होती पण अश्विनी मात्र हादरून गेली होती. हा समाज मुलींसाठी किती निष्ठूर होऊ शकतो हे तिनं स्वतः अनुभवलं होतं, अनुभवत होती. त्यात रेवाच्या नशिबी काय भोग असतील? इतकी वर्ष तिनं कसं सहन केलं असेल? नकळत तिचे डोळे पाझरू लागले. पण आता रडून उपयोग नव्हता. अश्विनीनं हलकेच रेवाला उठवलं. देवाजवळ दिवा लावला आणि देवाकडे हजार हत्तीचं बळ मागितलं. रेवाला तिच्या निर्णयात समर्थपणे साथ देऊन प्रत्येक पावलावर येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचवण्यासाठी, तिला समजून घेऊन वर्षानुवर्ष बघत असलेल्या तिच्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांना बदलण्यासाठी! तिच्यातली हिरकणी आता जिद्दीने वाटेत येणारा प्रत्येक गड सर करण्यास सज्ज होत होती.