Tuesday, August 24, 2021

ती आहे!



माझी आई कितीही संकटं आली तरी शांत असायची. कधी माझी तंतरलेली असली तरी ती शांतपणे मिष्किल हसून आकाशाकडे बोट दाखवून म्हणायची, “तो आहे, त्याचं सगळीकडे लक्ष असतं.”  ह्यावर मी आणखीनच चिडून म्हणायचे, “अगं, माझ्याबाबतीतच का असं?” मग ते “असं” म्हणजे शाळेत जायला झालेला उशीर, कठीण गेलेला पेपर, इंजिनियरिंगला आलेला खडूस external examiner, आयत्या वेळेस ड्रेसवरची ओढणी न सापडणे किंवा वर्षा सहलीच्या आदल्या दिवशीच नेमकी सुरू झालेली पाळी- ह्यातलं काहीही असलं तरी माझा त्रागा आणि तिचा शांतपणा ठरलेला.

भविष्याची काळजीच तिला वाटली नाही असं कसं म्हणू. बाबा वारले तेव्हा नविन घराचे हफ्ते, ६,१०,१६ वर्षांच्या तीन मुली आणि समस्त “आप्तेष्टांनी” (सन्माननीय अपवाद वगळता) फिरवलेली पाठ, हे सगळं ती  खंबीरपणे हाताळू शकली. फक्त “तो आहे!”, ह्या विश्वासावर.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आम्हा तिघी बहिणींच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आमची आजारपणं, करियरच्या दिशा ठरवताना- जोडीदार निवडताना उडालेली तारांबळ, दोन्हीकडचा मान-पान सांभाळून थाटात केलेली लग्न कार्य, बाळंतपणं, संसार उभे करताना केलेली आर्थिक मदत, सगळीकडेच तिला कधी काहीच कमी नाही पडलं. आम्हीच गांगरून जायचो, “आई गं, कसं होणार आता?” तेव्हा ती फक्त आकाशाकडे बोट दाखवून गालातल्या गालात हसायची.

ती गेल्यावरही तिचा "तो आहे" विश्वास वारसा हक्काने आम्हा तिघींकडे आला आहे, थोडासा बदल होऊन.

माझ्या बाळंतपणात माझ्या मैत्रिणींनी पाठवलेले डबे, नवर्यानी/सासूबाईंनी केलेल्या खिरी-लाडू ह्यातून मला ती जाणवत राहिली. इतक्या वर्षांनीही जेव्हा मैत्रिणीची आई इथे अमेरिकेत आली की आठवणीनी जेवायला बोलावून तव्यावरची पोळी पानात वाढते, माझ्याकडे जेवायला बोलावल्यावरही हक्कानी शेवटची भाकरी मित्राची आई मला गरम-गरम करून देते, भारतात गेल्यावर बहिणी, सासूबाई, नणंद, काकू/मावशी, आवर्जून आवडीचे पदार्थ करून खायला घालतात. हक्कानी डोक्याला तेलाची मालिश करून "केसांची कशी वाट लागलीये, काळजी घेत जा", असं दरडावतात, एखादी अनोळखी आजी रस्त्यानं जाता- जाता माझ्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत कौतुक करते, तेव्हा-तेव्हा मी मनात म्हणत असते, "ती आहे!"

आणि ती कायमच माझ्याबरोबर, माझ्या मुलांबरोबर, माझ्या बहिणी-भाच्यांवर प्रेम करत, आमची काळजी घेत सदैव आहेच. अधून मधून माझी मुलंही आताशा माझी मस्करी करतात "whatever happens mama is going to say- “ti aahe!”  

Monday, August 23, 2021

रिस्क!



एका घरात राहणारी इन-मिन तीन माणसं- हम दो- हमारा एक! कोविडचे वारे सुरु झाले अन सगळं गणितच बिघडलं. सुरुवातीला वर्क फ्रॉम होम त्या तिघांनी छान एन्जॉय केलं. निरनिराळ्या रेसिपीज करून बघ, लहानपणीचे बैठे खेळ मुलाला शिकव, घर स्वच्छ करून ठेव, एक ना दोन सगळे प्रकार करून झाले. मग हळूहळू ऑफिसवाल्यांनी पाश आवळायला सुरुवात केली. अत्यावश्यक सेवेमध्ये दोघांचेही जॉब्स समाविष्ट  झाले. तिचं काम दुप्पट झालं. आधीच कामवाली येत नव्हती, आता घरी आलं की कपडे धुणं, दुसऱ्यांदा आंघोळ करणं, त्यासाठी सकाळीच जास्तीचं पाणी भरून ठेवणं हे ओघानी आलंच. त्यात रोजच्या बातम्या- अमक्याला झाला, तमक्याला झाला, म्हणता म्हणता घरा-घरापर्यंत करोना येऊन ठेपला.

आता ऑफिसवालेही हुशार झाले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन घरच्या घरी चौदा दिवस अस्पृश्यासारखे घरी बसवू लागले. तीच युक्ती इतरांनीही काढली. आपापल्या बबलमध्ये सुरक्षिततेचा आव आणू लागले. वाघ म्हंटलं तरी आणि वाघ्या म्हंटलं तरी... किती दिवस असा घाबरून राहणार ना... आणि होऊ नये तेच झालं!

 ह्या दोघांचं लसीकरण झालं तरी लेकाचं झालं नव्हतं. त्यातच हे दोघे दिवसभर नोकरीला जाऊ लागल्यावर त्याला शेजारच्या मावशींकडे सोडणं भागच होतं. मावशी प्रेमानी आजू-बाजूच्या चार-पाच मुलांना सांभाळायच्या. त्यांची भांडणं सोडवणं, शाळेच्या लॉगिनचे प्रकार - जेवण-खाणं, खेळ सगळं लीलया पार पाडत होत्या. आणि त्यातल्याच एकाची टेस्ट पॉसिटीव्ह आली. झालं सगळ्या पालकांनी आपापल्या मुलांना चौदा दिवस वेगळं ठेवण्याचं ठरवलं.

 त्यातल्या त्यात हे सगळे सुखवस्तू असल्याने निदान दोन बेडरूम, दोन संडास-बाथरूम असल्यानी ह्या तिघांना अडचण वाटली नाही. लेकानी अजिबात आपल्या खोलीतून बाहेर यायचं नाही असं ठरलं. त्याला जेवण-खाणंही दारातच ठेवून देऊ लागले. सुदैवानी त्याचा ताप फारसा नव्हता, वासही अजून गेला नव्हता. तरीही ते तिघे अतिशय काळजी घेत होते. एकाचाच संपर्क यावा त्याच्याशी म्हणून तीच लेकाचं औषध-पाणी बघत होती. कळत-नकळत का होईना, लेकाशी संपर्क होतो म्हणून त्यानी तिची गादीही हॉलमध्ये टाकायला लावली. तीन खोल्यांमध्ये तिघं जण घरातच एकमेकांपासून लांब झाले. तिचा स्वयंपाक चालू असताना, दहा वेळा तिला हात धुवायची आठवणही करून देत होता, बेडरूमच्या दारात उभं राहूनसहाव्या दिवशी त्याची टेस्ट करणं गरजेचं होतं. त्यानी तत्परतेने अँपॉइण्टमेण्टही घेऊन ठेवली.

व्हाट्सअँप वरून घरातल्या घरात त्यांच्या गॅप सुरु झाल्या,  "काय गं, त्याला टेस्टिंगला घेऊन जाणार कोण?"

" मी जाईन की. त्या निमत्तानी त्याच्याशी चार शब्द बोलता तरी येतील रे. लेकरू पाच दिवस घरात असूनही आपल्यापासून लांब आहे रे, मलाच करामत नाहीये. आणि असंही तू दुपारची अपॉइंटमेंट घेतलीयेस. तुला उन्हाचा त्रास होतो ना. मग कसं जमेल तुला?"

"बरं बरं तूच जा. तुलाच करमत नाहीये त्याच्याशिवाय. अशीही तुला हौस (!) आहेच बाहेर फिरण्याची. जाऊन ये, तुलाही बरं वाटेल बाहेर पडलीस की."

"अरे, ह्यात कसली आलीये हौस? असो, मी जाईन त्याला घेऊन."

तिनी बॉसची बोलणी खाऊन दोन तास ऑफलाईन राहायची परवानगी काढली. मुलाला घेऊन खाली उतरली. आणि रिक्षेला हात करणार तितक्यात लक्षात आलं की पर्स तर घरीच राहिली. त्याला तिथेच सावलीत उभं करून ती पटकन वर गेली. दार लोटलेलंच होतं. नवऱ्याचं फोनवर बोलणं चालू होतं.

"हो ना, आता टेस्ट तर करायलाच लागणार. तरी बरं लेकाचं त्याच्या बेडरूममध्ये आणि माझं आमच्या बेडरूममध्ये quarantine चालू होतं. आता त्या कोविड सेण्टरवर किती गर्दी असेल काय माहिती. त्यात तिकडे सगळे येणारे असेच - कोणाला झालाय- कोणाला नाही काही पत्ता नाही. तिकडे जाऊन आपल्यालाच व्हायचा, काम ना धंदा नसताना. म्हणून मी तर घरीच राहिलो. उगाच कशाला रिस्क घ्या..."

तिनं निमूटपणे पर्स उचलली आणि दार हलकेच लोटून घेतलं.

Saturday, August 21, 2021

"आमचं" आणि "आपलं"...

 

लग्नाला कितीही वर्ष झाली तरीही नवरे आमच्या घरी, आमचा सुतार, आमचे फॅमिली डॉक्टर, गेला बाजार आमच्या संडासातल्या पाली (!), ह्या सगळ्या गोष्टींवर वारसा हक्क दाखवत राहतात. अरे मग, जिनी तुझ्यासाठी राहतं घर, संडासातल्या पाली- ह्या सगळ्या-सगळ्यांवर पाणी सोडलं तिला तू "आपलं"सं कधी करणार?

आयुष्यभर बहिणीशी भांडत स्वतःच्या कपाटाला हातही लावू ना देणाऱ्या तिनेच लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेल्यानंतर त्याच कपाटात ठेवणीतली अंथरुणं-पांघरुणं बघितल्याचा धक्का पचवलेला असतो. आई पण ओशाळवाणं होऊन म्हणते, "अगं, लग्नाआधी तुझ्या मागे लागले होते ते कपाट जरा स्वच्छ करून दे, तुझी फर्स्ट ईअरपासूनची पुस्तकं-नोट्स काढून टाक. पण तुला काही वेळ झाला नाही, मग आता मीच ते सगळं रद्दीत देऊन आले. आता बघ कसा सुटसुटीत वाटतंय!" तीही कसनुसं हसते, आईला आपल्या बबडीला समज आल्याची पाहून हुश्श्य वाटतं. अशा हळूहळू माहेरच्या पाऊलखुणा पुसल्या जातात.

"आमच्याकडे नं सगळ्यांना ओल्या नारळाच्याच करंज्या आवडतात, त्या सुक्या खोबऱयाच्या कशा खुळखुळ्याच्या वाटतात नाही...", असं ऐकल्यावर तिनं पुन्हा कधीच त्या खिरापतीच्या करंज्या केलेल्या नसतात- चुली वेगळ्या झाल्या तरीही! कारण तिच्या डोक्यात ती उंबरठा ओलांडून आली तेव्हाच ती इकडची झालेली असते. आता जे काही इकडे आवडेल तेच "आपलं", चुकूनही "आमच्या घरी असं करायचे...", असं ओठावर येऊ द्यायचं नाही अशी खबरदारी ती घेत असते. रुजवून घेण्याचा, सगळ्यांना सामावून घेण्याचा तिला इतका काही पुळका असतो की ओढून-ताणून "आमचं" चं "आपलं" कधी होईल ह्याची वाट बघण्यातच कैक वर्षं निघून जातात.

बघता बघता बाजू पालटतात. आता येणाऱ्या नवीन सुनेशी बोलताना ती जाणीवपूर्वक म्हणते, "आपल्याकडे नं..."

 

तुझं-माझं करमेना...



"मला नं भाऊच हवाय माझ्याशाख्खा दंगा घालनाला. मुलींना गुद्दे घातले की त्या ललतात..."

"अरे, असं आपल्या हातात नसतं, देव बाप्पा देईल ते बाळ तुझ्याशीच खेळायला येणार आहे नं..."

"नाही म्हंजे नाही, बहीन झाली तल तिला आपन डॉक्टल काकांना पळत देऊन टाकू."

हा असा संवाद सतत झाल्याने सरिता जेव्हा छोट्या आहनाला घेऊन घरी आली तेव्हा, तिच्या पोटात भीतीचा गोळाच होता. आता श्रेयस कसा वागणार आहे ह्याची धडकीच भरलेली. त्यातच ह्या दोघी हॉस्पिटलमधून घरी येणार म्हणून घरी सगळेच जमले होते. तिच्या मैत्रिणी, दोन्हीकडचे आजी-आजोबा, दीर-जाऊ, शेजारचे.

सासूबाईंनी त्या दोघींवरून भाकर-तुकडा ओवाळून टाकला, औक्षण केलं आणि श्रेयसनी सरिताच्या पायांना मिठी मारली. खाली वाकून सरितानी त्याची आहनाशी ओळख करून दिली, "ही बघ तुझी बहीण, आहना!"

श्रेयसला भाऊ हवा असल्याच एव्हाना सगळ्यांना माहिती होता त्यामुळे मुद्दाम त्याची खोडी काढायला त्याची काकू म्हणाली,"श्रेयू, तुला भाऊ हवा होता नं, मग आहनाला मी घेऊन जाते...", असा म्ह्णून तिनं आहनाला घेण्यासाठी हात पुढे केले.

ताबडतोब शूर सरदारासारखा दोन्ही हात पसरवून तिची वाट अडवून तो म्हणाला,"माजी बहीन आहे ती, ऐकलं नाहीश तू आईनी काय शांगितलं? हात नाही लावायचा कोंनीच!"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ये रड्या, एक गुद्दा घातला पाठीत तर लगेच आजीला काय सांगायला जातोस?"

"सांगणार सांगणार, हज्जार वेळा तुझं नाव सांगणार. सुमो रेसलर कुठला, खा-खा खातोस आणि मला बुकलत राहतोस. मला नाही खेळायचं तुझ्याशी..."

"जा रे जा, मग मी पण तुला बॅटिंग देणार नाहीये. शेपूट कुठला, सारखा माझ्या मागे मागे येतो. तुझे मित्र कर नं..."

ही अशी रोजची भांडणं ऐकून आजीचेही कान किटले होते.

"अरे, असे वैर्यांसारखे भांडू नका रे, ती चार भावांची गोष्ट आठवतेय नं? एकटी असली की काटकी मोडता येते, पण मोळीत असली तर त्यांची एकजूट कोणीच नाही तोडू शकत. अरे, मंदार- अमेय ऐकताय का?"

आजीचं ऐकायला ते दोघे घरात होतेच कुठे, ते तर केव्हाच मैदानावर खेळायला पळून गेले होते.

"कसं होणार गं ह्यांचं, अलका? तूच समजावून सांग गं." अलका गालातल्या गालात हसत होती. तिनं आजींना गॅलरीत आणलं, "ते बघा..."

खाली क्रिकेटच्या टीम्स पाडल्या जात होत्या. छोटा असल्याने अमेयला कोणीच घेत नव्हतं. संज्या तर सगळ्यांसमोर म्हणाला, " मंदार, का आणतोस ह्याला? रोज रडीचा डाव खेळतो, आणि एकदा बॅट घेतली की सोडता सोडत नाही हा. घरी पाठव ह्याला!" "

संज्या, असू देत रे. लहान आहे तो. आणि आज नाही रडणार तो. त्याला नाही घेतलं तर मी पण चाललो घरी. चल रे, अम्या."

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

" रितुडे, कित्ती गोड़ दिसत्येस तू. तुझा dp पण काय भार्री आलाय."

"काय हवंय? सरळ बोल, उगाच मस्का नको मारूस..."

"बरं बरं, मी आज संध्याकाळी तुझा ब्लॅक स्कर्ट घालणार आहे. आधीच सांगतेय नाहीतर मागच्या वेळी केलास तसा राडा घालशील माझ्या फ्रेंड्ससमोर."

"अजिबात नाही, मी नाही देणार."

"ए, तुला विचारतय कोण? मी सांगतेय!"

"बरा घालशील, मी लपवून ठेवीन."

"हा हा, too late! मी आधीच लपवून ठेवलाय. तू असाच खडूसपण करणार माहिती होतं मला. ही आई पण नं, तरी मी तिला सांगत होते मला पण same स्कर्ट घेऊयात म्हणून तर म्हणते कशी, दोघी बहिणीच आहेत तर एक कॉमन घ्या नं. म्हणजे आळी-पाळीने घालता येईल. आणि आपोआपच जास्त व्हरायटी मिळेल दोघींनाही. तिला नं काही कळतच नाही!"  

लहानपणपासून  ही अशीच जुळ्यांची दुखणी. पण रीमा जेव्हा नोकरीसाठी बेंगलोरला जायला निघाली तेव्हा रितूनं स्वतःच तिचा वॉर्डरोब उघडून दिला, "घे तुला जे कपडे हवे ते, तुला तिकडे जरा बरं दिसायला लागेल. आणि तुझा चॉईस म्हणजे महानच आहे. चल घे पटकन, before I change my mind!"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अशा सगळ्या भांडकुदळ पण एकमेकांशिवाय अजिबात नं करमणाऱ्या  भावंडांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!