Friday, July 16, 2021

टाळ्या !

 


मेघनाला कधी एकदा संध्याकाळचे सहा वाजतायेत आणि आईला फोन लावतेय असं झालेलं. इथे अमेरिकेत आल्यापासून रोज आई, बरोबर साडेसहाच्या ठोक्याला मेघनाला फोन करायची. तिची सकाळ आणि मेघनाची ऑफिसहून घरी येण्याची वेळ, हा त्या दोघींचा हक्काचा वेळ असायचा. विराजला प्रश्न पडायचा रोज काय बरं बोलत असतील ह्या माय-लेकी! कधी दोन मिनटात बोलणं व्हायचं तर कधी तासभर गप्पा रंगायच्या. बरेच वेळा आईला रेसिपी विचारता विचारता, मेघना रात्रीचा स्वयंपाक उरकायची. आणि तिथे पुण्यात आईचा  सकाळचा चालण्याचा व्यायाम मेघनामुळेच नियमित चालू होता.

आज आईच्या फोनची आतुरतेने बघण्याचं खास कारण होतं मेघनाकडे. दुपारीच तिनं घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती आणि आईला ही खुशखबर कधी एकदा देतेय असं तिला झालं होतं. मागच्याच वर्षी तिचे बाबा हृदय विकाराच्या झटक्याने अचानक निघून गेले होते. मेघनाला त्यांना शेवटचं बघायलाही मिळालं नव्हतं. त्या वेळेसही नुकतीच तिची गोड बातमी आली होती, सगळेच किती खूष होते. मेघना-विराजनी लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षं जगभर फिरून झाल्यावर अमेरिकेत स्थिर-स्थावर होण्याचं ठरवलं होतं. सुदैवाने दोघांनाही एकाच वेळी अमेरिकेत संधी मिळाली होती. इथे येऊन एक वर्षं होत नाही तोवरच त्यांना दोनाचे तीन होण्याची बातमी मिळाली होती. सगळी गाडी रुळावर येतेय असं वाटत असतानाच नेमकी मेघना पायात पाय येऊन घरातच पडली आणि डॉक्टरांनी तिला संपूर्ण आराम करण्यासाठी घरी बसवलं. मेघना एकुलती एक असल्यानी तिच्या आई-बाबांनी ताबडतोब तिची काळजी घेण्यासाठी अमेरिकेत त्यांच्याकडे येण्याचं ठरवलं. बाबांनी धावपळ करून व्हिसाही तात्काळ सेवेतून मिळवला. नेमका त्यांना व्हिसा मिळाला आणि काही कारणास्तव आईचा मात्र नाकारला गेला. त्यामुळे ती जरा हिरमुसली. पण बाबांनीच तिला धीर दिला कि आपण उद्या जाऊन पुन्हा एकदा अर्ज देऊन बघू. पण ती वेळ आलीच नाही. सकाळी त्यांना उठायला उशीर का होतोय म्हणून आई त्यांना उठवायला गेली, मेघाशी एकीकडे बोलणं चालूच होतं. आणि त्यांना कळून चुकलं की बाबा केव्हाच पुढच्या प्रवासासाठी निघून गेलेत. हा धक्का ना आई पचवू शकली ना मेघना. तीस वर्षांच्या संसारानंतर, एकटीनं कसं जगायचं हा प्रश्न तिच्यापुढ़े वासून उभा राहिला. तर बाबांना साधं शेवटचं बघूही शकले नाही ह्याच्या धसक्याने मेघनाला इतकं घेरलं की तिचं बाळही बाबांना सोबत करण्यास निघून गेलं.

काळ हेच सर्व दुःखांचं औषध असतं हेही खरंच. हळूहळू आईनी आणि मेघनानी एकमेकींना सावरलं. आणि आज पुन्हा एकदा मेघाच्या मनात आशा पल्लवित झाली होती. पण मागच्या अनुभवानी तोंड पोळलेली मेघा आता ह्या खुशखबरीनी पण सावध होती. विराजलाही सांगायच्या आधी तिला आईजवळ मन मोकळं करायचं होतं. आईनी फोन उचलेपर्यंत मेघनाच्या जिवात जीव नव्हता. आईनी तिच्या "हॅलो" वरूनच काहीतरी महत्त्वाची बातमी आहे हे ओळखलं. "सांग बेटा, काय बोलायचंय?" "आई, अगं तुला कसं बरोब्बर कळतं ना...", आता मेघनाचा आवाज दाटून आला. डोळे भरून आले. आता ह्या क्षणी आई जवळ हवी होती ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. "अगं, तुला सांगतानाही भीती वाटतेय पण तू आजी होणार आहेस गं आई..." विमलताईंनी ताबडतोब देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली. "मेघना, बाळा मला खूप आनंद झालाय. आता मनात सगळे छान विचार आणायचे. पूर्ण काळजी घ्यायचीस मी येईपर्यंत. मी आजच जाऊन तिकिटाचे बघून येते. मी कधी येऊ ते सांग तू मला." आईच्या आश्वासक शब्दांनी मेघनाला शंभर हत्तींचं बळ आलं. "मी सांगते तुला आई, आधी आता विराजला बातमी देऊ देत. सांगू ना गं त्याला?" "अगं वेडाबाई, सांग आधी त्याला. त्यालाच तर काळजी घ्यायचीय तुझी आता, मी येईपर्यंत. तुला मी एक क्षणही माझ्या नजरेआड होऊ देणार नाहीये. मला आधी ती व्हिसाची भानगड निस्तरायला लागेल. चल तू बोल त्याच्याशी, मी एजन्ट शोधते आता." असं म्ह्णून त्यांनी फोन ठेवला.

त्यानंतरचे सहा-सात महिने कसे पटापट निघून गेले. अमेरिकेत मुलगा-की मुलगी हे आधीच कळत असूनही मेघना-विराजनी डॉक्टरांना सरप्राईझ ठेवायला सांगितलेलं. मुलगी झाली तर तिला मेघनासारखं भरतनाट्यम शिकवायचं आणि मुलगा झाला तर त्याला विराजसारखं क्रिकेटचं वेड लावायचं ह्यावर ते दोघंही ठाम होते. दर महिन्याच्या डॉक्टर विझिटला डॉक्टर विचारायचे, "काय मग, जाणून घ्याचंय का- डान्सर की क्रिकेटियर?" कितीही मोह झाला तरी ते दोघं एकमेकांकडे बघायचे, आणि म्हणायचे, " जे असेल ते आता ड्यू डेटलाच कळू देत." आणि मग डॉक्टरही त्यांना चिडवायला म्हणत, "बरं बरं, घरी जाऊन विचार बदलला तर कळवा मला. माझ्याकडे ह्या बंद पाकिटात आहे तुमचं सीक्रेट सेफ!" विमलताईंनी आणि विराजच्या आईनी नातू की नात ह्याची पैजही लावलेली. अर्थात दोघींनाही जे होईल ते सुखरूप होऊ देत असंच मनोमन वाटत होतं. विमलताईंना मेघाचं बालपण पुन्हा अनुभवायचं होतं, तर विराजच्या आईला विराजचं.

हो-नाही करता-करता पेन्शनचं काम, व्हिसाचं काम, घरातली एक ना हजार कामं निस्तरता-निस्तरता विमलताईंच्या प्रवासाचा दिवस उजाडला. आई सुखरूप इकडे येऊन पोहचावी म्हणून मेघनानीही देव पाण्यात घातले होते. नाही म्हंटलं तरी बाबांची आठवण वरचेवर होत होती.

विमलताई येतानाच बाळंतविडा, बाळाची घुटी, मेघासाठी लाडू, काढे, खिरी सगळ्याची जय्यत तयारी करून घेऊन आल्या होत्या. मेघाच्या डोहाळजेवणासाठी गर्द हिरवीगार पैठणी , फुलाची वाडी नाही तर निदान मोत्याचे दागिने घालून त्या तिला सजावणार होत्या. एयरपोर्टवर डुलत डुलत चालणाऱ्या त्यांच्या मेघाला बघून त्यांना दुडूदुडू धावणारी छोटुशी मेघाच आठवली. आता माझ्या मेघाला छोटी मेघा होईल, असं मनात आल्यावर त्या स्वतःशीच हसल्या. स्वतःचा तोल सांभाळत मेघनाने आईला घट्ट मिठी मारली. भेटल्यापासून विमलताईंनी तिला सल्ले द्यायला सुरुवात केली. "अगं आई, जरा धीरानं घे. हे पाणी पी, आणि कार्ट दे विराजकडे, तो आणेल.", असं म्हणून मेघनानं आईला जरा ब्रेक घ्यायला लावला. सगळं सामान गाडीत टाकून सोनोग्राफीचे फोटो, बाळाच्या हालचाली, सगळं सगळं आईला सांगता-सांगता घर कधी आलं कळलंही नाही.

पुढचे दोन-तीन आठवडे डोहाळेजेवण, डॉक्टरच्या व्हिझिट्स, घरात सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवण्यात कसे गेले कळलंच नाही. रविवारी मेघनाला कळा येणं सुरु झालं. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे हॉस्पिटलला जायची बॅग तयार होतीच. रविवार असल्यानी विराजही घरीच होता. तिघंही आता बाळाची आतुरतेनं वाट बघू लागले. विराजच्या आई-बाबांनीही ताबडतोब कळवायला सांगितलं. तेही फोनजवळच बसून होते. जवळ जवळ चौदा तासांच्या प्रतीक्षेनंतर साहिलचं आगमन झालं. त्याचं रडणंही इतकं नाजूक होतं की, डॉक्टरांना दोन मिनिटं कळलंच नाही की हा रडतोय की नाही. पण मग त्याच्या टपोऱ्या डोळ्यांनी जेव्हा त्यानं इकडे तिकडे बघितलं तेव्हाच डॉक्टरांनीं सुटकेचा निश्वास टाकला.

साहिलला घेऊन मेघना-विराज घरी आले. घरात नुकतंच जन्मलेलं बाळ आहे हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही इतका साहिल गुणी होता. शहाण्या बाळासारखा दूध पिऊन शांत झोपून जायचा. बघता बघता, आईचीही भारतात परत जाण्याची वेळ आली. मेघनानं घरीच आया ठेवली होती. त्यामुळे तिला घरून कामही करता यायचं आणि साहिलकडे लक्षही देता यायचं. तसं बघायला गेलं तर साहिल खरंच खूप शांत होता. वेळच्या वेळी खाणं-पिणं झोप, आणि इतर वेळेस स्वतःशी खेळत राहणं.

घरात आवाज असा नाहीच.सुरुवातीला मेघना-विराज अगदी खुश होते की आपल्याला आई-बाबा होणं किती सहज जमलंय. आणि काय लोकं म्हणत असतात की लहान मुलांच्या रडण्याने डोकं दुखतं, शांतता हवी म्हणून दहा मिनिटं तरी बाथरूममध्ये जाऊन बसतात, काय आणि काय. साहिल एक सारखा आपल्याच हातांकडे बघत राहायचा नाहीतर टाळ्या वाजवून खुश व्हायचा. रडणं जणू त्याला माहितीच नव्हतं. सात-आठ महिन्यांचा साहिल स्वतःशी हसायचा पण कोणीही कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याकडे बघण्याचा टाळायचा. मेघना-विराज खट्टू झाले की आपल्याला स्वतःच्याच मुलाला हसवता येत नाही. बुआ कुक करून झालं, गुदगुल्या करून झाल्या, काही करता तो त्यांच्याकडे बघेना आणि हसेना. पण तो स्वतःतच खुश असे त्यामुळे त्या दोघांना त्यातच आनंद वाटत असे. बघता बघता वर्ष वाढदिवस आला, त्याच्या आजी-आजोबांनी त्याच्यासाठी छान झब्बे पाठवले होते. पण झब्बा चढवल्याबरोबर तो जिवाच्या आकांताने रडू लागला. त्याच्या पार्टीसाठी आलेल्या कोणाकडेच जाईना. फक्त मेघनालाच तो चिकटून बसला होता. शेवटी त्याला घरचे साधे कपडे घातले तेव्हा कुठे तो शांत झाला. आलेल्या पाहुण्यांनी,लहान मुलं असंच करतात, गर्दीची सवय नसते, हळूहळू घराबाहेर पडा तुम्ही, पार्कमध्ये घेऊन जा-लायब्ररीत घेऊन जा लहान मुलांमध्ये”, असे सल्ले दिले. मेघना-विराजलाही ते पटलं. भारतात कसं मोठे घरी असतात, आले-गेले असतात, त्यात मुलं कशी  मोठी होतात कळतही नाही. सगळ्या भारतीयांना परदेशात मुलं वाढवताना होणारी कुतरओढ त्या दोघांनाही जाणवत होती.

 आता त्यांचे कान -मा , बा-बा ऐकण्यासाठी तरसू लागले. पण साहिल कुठलेच शब्द बोलायला तयार नव्हता. एव्हढं काय काहीही शिकवायला गेलं तरी तो त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असे. त्याच्या वयाची मुलं एव्हाना ते २०, अवयव ओळखणं, प्राण्यांचे आवाज काढणं, चित्रात प्राणी-रंग ओळखणं असे बरंच काही करू लागली होती. नाही म्हंटलं तरी कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण जे शत्रुंच्याही बाबतीत होऊ नये ते आपल्या बाबतीत कसं होईल, त्याचा उच्चारही करवत नव्हता. तरी मेघनाने आईकडे, सासू सासर्यांकडे आडून आडून चौकशी केलीच. दोघांच्याही घरी अशी केस ऐकिवात नव्हती. सगळ्यांनी त्यांना समजावलं की, “काही मुलं थोडा वेळ घेतात, मुलगे जरा उशिराच करतात सगळं.” पण मेघनाचं काही केल्या समाधान होत नव्हतं. त्यावरून कधी नव्हे ते विराजशी तिचं मोठं भांडणही झालं. विराजला तर हा विचारही अभद्र वाटत होता. साहिलच्या बाबतीत काही वेगळं असेल ह्याचा विचारही त्याला हादरवणारा होता. जर देव नं करो साहिल ऑटिस्टिक असेल तर त्याच्या बाबतीत बघितलेल्या सगळ्या स्वप्नांचं काय आणि आपल्या भविष्याचं काय, हे सगळे विचार त्याला नकोसे झालेले. तर साहिलला वेळच्या वेळी जी काही मदत लागणार असेल ती आपण घेतली पाहिजे, त्याच्या मागे आपणच खंबीरपणे उभं राहून जे काही होईल त्याला तोंड दिलं पाहिजे, अशी मेघनाची विचारसरणी होती. सरते शेवटी विराजनी तिच्या हट्टापुढे हात टेकले.

डॉक्टरांच्या वाऱ्या, हर तर्हेच्या चाचण्या करून शेवटी साहिलला ऑटिझम असल्याचं निदान झालं. आणि मग लोकरीचा गुंडा उलगडत जावा तशा सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला. बाळ असताना त्याचं आई-बाबांना ओळखणं, नजरेला नजर देणं, शांत राहणं- स्वतःमध्येच रमणं, काही प्रकारच्या कपड्यांच्या पोताचा त्रास होणं, सगळंच डॉक्टरांनी नीट समजावून सांगितलं. इतर मुलांशी त्याची तुलना करणं हे किती चुकीचं आहे, हे मेघना-विराजला कळलं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्यात चूक कोणाचीच नसून स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे हेही कळून चुकलं.

साहिलला वेगळ्या प्रकारच्या पालकांची गरज आहे, आणि ते आव्हान पेलायला आपण सज्ज झालं पाहिजे असा निर्धार त्या दोघांनी केला. वेळोवेळी खचायला होईल, नकळत इतरांच्या नजरांचा सामना करावा लागेल, पण तेव्हा मन शांत ठेवून येईल त्या परिस्थितीला समोर गेलंच  पाहिजे, त्याला गत्यंतर नाही. कोणी कोणाला समजवायचं हेच कळत नव्हतं. सुरुवातीला खंबीर भासवणारी मेघना आता पार ढासळली होती, तर आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव होऊन विराज सावरला होता.

 "विराज, आपल्याच बाबतीत हे असं का व्हावं, आपण कोणाचंही वाईट केलेलं नसताना कोणत्या चुकीची शिक्षा आपल्या लेकराला मिळतेय रे?" "अगं, असं विचार आता करायचा नाही. आपल्या साहिलला आपल्याला काही कमी पडू द्यायचं नाहीये. आणि ऐक जसा साहिल मोठा होईल तसं त्याच्यातल्या सुप्त गुणांची आपल्याला ओळख होईल. मी ऐकलंय की अशा मुलांना specially abled kids म्हणतात काही जण. तसाच आपला साहिल आहे, सगळ्यात वेगळा!" त्या दोघांनी आशेनी साहिलकडे प्रेमानं बघितलं. आई-बाबांचं आपल्या बाबतीत काहीतरी बोलणं चाललंय एव्हढं आता साहिलला कळत होतं. त्यानं खुश होऊन टाळ्या वाजवायला सुरुवात केली.त्याचा आनंद बघून डोळ्यातले अश्रू थोपवत मेघना-विराजही जोरजोरात टाळ्या वाजवत राहिले.