Friday, July 16, 2021

समाधान

                                             

    

अण्णांनी कानोसा घेऊन बघितलं, नुकतंच झुंजूमुंजू व्हायला लागलेलं. त्यांनी डोळे मिटूनच दोन्ही हातांची ओंजळ डोळ्यांसमोर  धरली आणि  "कराग्रे वसते..." म्हणू लागले. आज हवेत जरा गारठा जाणवत होता. अंथरुणात बसूनच त्यांनी  "... पदस्पर्शम क्षमस्वहे!" म्हणून पावलं जमिनीवर ठेवली. निगुतीनं अंथरूण- पांघरुणाची घडी जागेवर ठेवली. सकाळची आन्हिकं आटपून ते गिरणेवर स्नानास निघाले. गंगाबाईंनी परीटघडीची धोतरजोडी आणि त्यांचा पांढरा सदरा रात्रीच काढून ठेवलेला. सवयीप्रमाणे त्यांनी नेहमीच्या जागेवरून कपडे घेतले आणि ते नदीवर निघाले. नामजप करता करता सूर्याला अर्ध्य देत अण्णांनी कडाक्याच्या थंडीत स्नान उरकत घेतलं. सूर्याच्या पहिल्या किरणाला अण्णा काकड आरतीसाठी रामाच्या देवळात हजर होते. गेल्या चाळीस वर्षांचा हा नेम चुकला नाही. गंगाबाई  त्यांच्या आधी उठून- आन्हिकं आटोपून अण्णांच्या आधी देवळाच्या दारात धारोष्ण दुधाचा गडवा घेऊन अण्णांसाठी उभ्या राहत. अण्णांना गडवा दिला की त्या देवदर्शनही घेताच घरचा धबडगा आवरण्यासाठी निघून जात. अण्णा मग शांतपणे मन लावून देवपूजा, काकड आरती करून मग ध्यान लावून बसत. एव्हाना गावातही जाग आली असे. एक एक करत सगळेजण देवाचं दर्शन घेऊन- कोणी आत येऊन साष्टांग दंडवत घालून तर कोणी जाता-जाता चप्पल बाजूला काढून रस्त्यावरूनच भावपूर्ण नमस्कार करून आणि दुसरा नमस्कार देवळासमोरच्या पारावर ध्यान लावून बसलेल्या अण्णांना करून, मगच दिवस सुरु करत.

घरी गंगाबाई पुढचं-मागचं अंगण झाडून, सडा घालून दाराभोवती सुरेख रांगोळी रेखीत. गोठ्यातल्या गुरांशी गप्पा मारत त्यांना चारा घालून, दूध काढून ठेवीत. ते झालं की परसदारी बंब सुरु करीत, एकेकाच्या आंघोळीसाठी तो बंब दोन-तीन तास धुमसत राही. घरालाही जाग आली असे. मग मुलं, सासू-सासरे, दीर-जाऊ, त्यांची मुलं असा सगळा गोतावळा गंगाबाईंच्या नावानी धोशा लावत. "आई, मला उठवलं का नाहीस, माझा गृहपाठ राहिला होता थोडा..." "वहिनी, आज डाळ-मेथी, खर्डा आणि ज्वारीच्या भाकऱ्या करू जेवायला, चालेल नं? दोन जुड्या पुरतील नं? अगं बाई,तुमचे पोहे करूनही झाले, मला मेलीला जागच येत नाही हो सकाळी.."  "सूनबाई, उद्या एकादशी आहे, लक्षात आहे नं? घरात फराळाचं सामान आहे का, जर बघा बरं..."   गंगाबाई हसतमुखाने सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देत, प्रत्येकाच्या हातात  नाश्ता-चहा  देत, तोवर अण्णाही घरी आले असायचे. मग त्यांचं खाणं होईस्तोवर त्या ओसरीवरच थांबत. खाता-खाता अण्णा दिवसाचा कार्यक्रम सांगत. तेवढाच काय तो पती-पत्नीचा दिवसभराचा संवाद!

पंचक्रोशीत .पू. अण्णा कुलकर्णी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. दिवसा शाळेत मुलांना संस्कृत शिकवणे आणि शाळा सुटली अन चार घास पोटात सरकवून कीर्तनासाठी जाणे, हाच अण्णांचा दिनक्रम होता. कधीकधीतर संध्याकाळी पायी निघालेले अण्णा मध्यरात्री शेजारच्या गावात पोहचत आणि ताटकळून राहिलेले गावकरी त्यांच्या पायावर लोळण घेत. कुठलाही शिणवटा जाणवू देता अण्णा रात्र-रात्रभर उभे राहून कीर्तन करीत आणि सूर्योदयाच्या वेळेस गिरणेवर पोहचत.

अण्णा कीर्तन करू लागले की गावकरी अगदी मंत्रमुग्ध होत. अण्णा भावकर्यांना कधी यमुनेतीरीं फिरवून आणीत नाहीतर रामायणाची सफर घडवत. "रामायण झालं ते सीतेमुळे, आदिमायेमुळं. माया कोणाला चुकली आहे? जी दृश्य नाही आणि तुम्हाला नकळत बांधून ठेवते, ती माया... प्रभूवर श्रीराम सुद्धा मायेच्या चक्रात अडकले. श्रीकृष्णाने तर मायेनी सगळ्यांना जखडून ठेवलं आणि स्वतः मात्र अलिप्त राहिला... " अण्णा तासन्तास बोलत राहत आणि गावकरी त्यांच्या शब्दांच्या मायेत हरवून जात. कधीतरी त्यांच्या मनात येत असे, खरंच रामायण फक्त सीतेमुळेच झालं का? मग दशरथ, त्याच्या तीन राण्या, रावण ह्या सगळ्यांचा काय भाग होता? उर्मिलेच पुढे काय झालं, ती का नाही गेली लक्ष्मणाबरोबर, का तिला तीन-तीन सासवा, सासरे, अयोध्येची जबाबदारी जाणवून ती माघारीच थांबली? असो उगाच काहीतरी मनाचे खेळ.

इथे गंगाबाई दिवसभरचा पै- पाहुणा बघत, घरच्या शेतीची-गुराढोरांची काळजी घेत. मुलांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांची दुखणी-खुपणी, कुळाचार मन लावून करीत.  वर्षानुवर्षं मेहुणबारे सोडून त्यांनी जग बघितलं नव्हतं. माहेरी अठरा विश्व दारिद्रय, त्यामुळे गंगीला चांगलं दूध-दुभत्याचं घर पाहून दिलं होतं. लग्नानंतर जणू काही माहेरचा संबंधच संपला. आणि बारा मुलांच्या रगाड्यात त्यांच्या आई-तात्यांनाही कधी लेकीची खुशाली विचारायची फुरसत मिळाली नाही. तर अण्णांच्या अशा विरक्त वागण्यामुळे गंगीला माहेरी पाठवलं तर मुलगा सगळं सोडून मठकरी बनेल ह्या भीतीनं, सासू-सासर्यांनीही गंगीला कधी नजरेआड होऊ दिलं नाही. वर्षं सरता सरता यथावकाश दोन मुलं पदरी पडली, आणि त्यांच्या मागे गंगीची गंगाबाई झाली. आधीच घरात रमणारी गंगा आता आणखीनच गुरफटली. एव्हाना तात्यांचं ध्यान लावून बसणं, काही आठवडे घराबाहेर असणं, नव-नविन गुरु करणं आणि त्यांच्याकडून दीक्षा घेणं सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं होतं.

अण्णांचं कीर्तन सुरु असे आणि इथे सगळं आवरून, झाकपाक करून दोघी जावा ओसरीवर येऊन बसत. दुरूनच घंटेचा, चिपळ्यांचा आवाज येई. संध्याकाळी घातलेल्या सड्यामुळं हवेत गारवा जाणवे. मग जावा-जावांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी रंगत. कधी नव्हे ते आज धाकटीनी विचारलं, "वहिनी, तुम्ही का नाही कधी जात कीर्तनाला, सकाळी तासन्तास ध्यान लावायला? तुम्हाला नाही का वाटत हो की, भाऊजी असे दिवस-दिवस बाहेर असतात आणि तुम्ही घरातच अडकून पडता?" गंगाबाईंची तंद्री लागली, त्यांच्या डोळ्यांसमोर इतक्या वर्षांचा संसार उभा राहिला. वर्षानुवर्षं ना अण्णांचा दिनक्रम बदलला ना गंगाबाईंचा. मेहुणबार्यात बाराव्या वर्षी लग्न होऊन आलेली गंगी जी घरच्या गोतावळ्यात हरवली ती आजतागायत. अण्णांची भक्ती, उपासना, त्यांचा कीर्तनातील हातखंडा ह्याचं कौतुक ऐकत आणि अभिमान बाळगत कोणत्या इच्छा राहिल्या आणि कोणत्या नाही ह्याचाही आताशी विसर पडला होता. धाकटीनी पुन्हा एकदा हलवून विचारलं, "सांगा नं, वहिनी..." गंगाबाई गूढपणे हसून म्हणाल्या, "अगं हो, सुरुवातीला मलाही इच्छा व्हायची हे काय करतायेत ते जाणून घ्यायची, ध्यान लावून बसण्याची. पण ते जमायलाही हवं नं... अनुभूती यावी लागते. त्यांचं ध्यान लावणं, कीर्तन करणं, त्यातून आनंद मिळवणं वेगळं... आतापर्यंत काही कमी नाही राहिली माझ्या संसारात. सोन्यासारखी दोन मुलं आहेत, भरलेलं घर आहे.काय कमी आहे मला... त्यांना देवाला आयुष्य वाहून घेता आलं, ते घर सांभाळायला मी होते म्हणूनच नं? आणि त्यांच्या उपासनेत कुठेतरी मलाही  पुण्य मिळेलच की गं, काय?", असं म्हणत गंगाबाई स्वतःशीच हसत राहिल्या. आणि तिकडे अण्णा सांगत होते,"ऐका मंडळी, संसारात असूनही संसारातली अलिप्तता जाणवायला लागते. आपल्याकडे काय नाही ह्यापेक्षा काय आहे हे मनःचक्षू उघडून बघावं लागतं, तेव्हा कुठे परमात्म्याची ओळख होते. म्हणा, जय जय रामकृष्ण हरी..."  अण्णांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती आणि गंगाबाई याची देही याची डोळा स्वर्गानुभीतीनी तृप्त मनाने निद्राधीन झाल्या होत्या.





देव तारी...

 


"अरे तुला सांगतो, आमच्या ऑफिसातले लालवानी साहेब म्हणजे नं एक अजीब नमुना आहेत. साहेब आहेत असं सांगूनही अनोळखी माणसाला कळणार नाही. अरे ऑफिसात पाऊल ठेवलं की पाचव्या मिनिटाला त्यांचे ते गडगडाटी हसू कानावर पडतं. साला ऑफिसमध्ये काम सगळ्यांनाच असतं रे, पण लालवानी साहेब असले नं की हसत खेळत चक्क कामाचा फडशा पडतो आम्ही! कधीही विचारा,सगळेच ओव्हर टाईमसाठी एका पायावर तय्यार. सगळ्यांसाठी जेवण मागवणार, बायकांना घरापर्यंत सुखरूप  सोडण्याची सोय करणार.  तू येच एकदा त्यांना भेटायला.", अभिजीत शेजारी जोरजोरात चालू असलेल्या भजनी मंडळींच्या वरचा सूर लावून सांगत होता. शेवटी जेव्हा गाडीने विक्रोळी सोडलं, तेव्हा तो लगबगीने घाटकोपरला उतरायला निघाला. डोंबिवलीहून सात बावन्नची लोकल पकडून आम्ही सगळेच एकमेकांच्या सोबतीने मुंबईच्या लोकलमधला प्रवास एन्जॉय करायला शिकलो होतो. अभिजीतचं लालवानी पुराण दर काही दिवसांनी ऐकायला मिळायचं. हल्ली तर आम्ही त्याला, "आला लालवानी फॅन" असंच चिडवायला लागलो होतो.

तर एकदा त्याच्या बँकेत जाण्याचा योग जुळून आला. माझ्या बाबांचे पेन्शनचं काम नेमकं त्याच्याच शाखेत निघालं. त्याच्याकडे कागदपत्र देऊनही काम झालं असतं, पण लालवानींना निदान दुरून तरी बघावं म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून प्रत्यक्ष जाण्याचं ठरलं. आणि खरोखरच मी बँकेत पाऊल टाकतो नं टाकतो तेवढ्यात ते जगप्रसिद्ध गडगडाटी हसू ऐकू आलं. मान वळवली आणि लालवानी साहेबांच्या आधी  त्यांच्या शर्टाच्या बटणांची परीक्षा बघणारं थुलथुलीत वर-खाली होणारं पोटच आधी नजरेस पडलं. स्वतःच केलेल्या कुठल्यातरी विनोदावर ते खुश होऊन मनसोक्त हसत होते, टाळ्या देत होते. अभिजीतनं माझी ओळख करून दिली. लगेच त्यांनी मला, "साला, लंच टाईम होईलच आता, आता तू जेवल्याशिवाय काय तुला सोडत नाय आपण. अरे ये बाबू, बिर्याणी मागव रे त्या खालच्या राजधानीकडून, आणि हां बिल हा शाला अभिजित देईल काय!", असं म्हणून पुन्हा गडगडाटी हसायला लागले. मग हो-नाही करता करता माझ्यासाठी बिर्याणी मागवली गेली, बाकी सगळ्यांचे डबे होतेच. पण त्यांच्यासाठीही कुल्फी मागवली गेली. लालवानी साहेबांनी कुल्फीकडे तिरप्या नजरेनी बघताच गोरे बाईंनी त्यांच्याकडे डोळे वटारून बघितलं. "लालवानी साहेब, शुगर वाढलीये नं? आपलं काय ठरलंय?", असं म्हणून प्रेमळ धाकानी दटावले. गोरे बाई त्या शाखेतल्या सगळ्यांच्याच आजी होत्या, यंदा निवृत्ती घेणार होत्या. एकंदरीत त्या ऑफिसमध्ये खरंच खेळीमेळीचं हल्लीच्या दिवसात दुर्मिळ होणारं दृश्य होतं. गोरे बाईंचं लक्ष नसताना लालवानी साहेबांनी कुल्फी मटकावलीच आणि त्यांनी बघितल्यावर, आता काय उष्टी झाली, खावीच लागणार अशा नजरेनी पुन्हा ते पोट हलवत हसायला लागले. तर असे हे लालवानी साहेब- मधुमेह, उच्च रक्तदाब, गेला बाजार ऍसिडिटी ह्या सगळ्या रोगांना फाट्यावर मारून मनमुक्त हसत होते आणि सगळ्यांना हसवत होते. आणि त्यांच्या अघळ-पघळ ओसंडून वाहणाऱ्या शरीराकडे बघून बघून अभी मात्र प्रचंड टरकून होता.तब्ब्येतीची इतकी काळजी घेत होता. रोज पहाटे उठून प्राणायाम, नियमित सूर्यनमस्कार, मोजका आहार आणि व्यसनांना चार हात दूर ठेवूनच असायचा. अधून मधून लालवानी साहेबांनाही काही काही व्हाट्सअँप ज्ञान पाठवत होता. पण त्यांचं आपला एकच, "साला जिंदगी भेटते एक टाइम. हे तुमचा डाएट नि एक्सरसाईझ करून जिंदगी लंबी झाली ने तरी पन बुढाप्याचे दिवस वाढवेल! अभी तो मेरे खेलने- कुदने के दिन है|" आणि स्वतःवरच खूश होऊन गडगडाटी हास्य! अभिजित त्यांना समजवायचा,"नियतीच्या मनात काय असतं काय माहिती, आपण काळजी घेत राहायची..." पण लालवानी साहेबांनी जरी ते साहेब असल्याची कोणाला जाणीव करून दिली नसली तरी अभी स्वतःला ते कधीही विसरू देणार्यातला नव्हता.

अशात वर्षा सहल काढण्याची टूम निघाली. सगळ्यांनी येत्या रविवारी खोपोलीला भेटून जवळच्या धबधब्यांना भेट द्यायचं  ठरलं. डोंबिवलीहून उठून खोपोलीपर्यंत प्रवास करण्याची अभिची अजिबात इच्छा नव्हती. पण लालवानी साहेबांचे किस्से दुसऱ्या कोणाकडून ऐकायचेही नव्हते. शेवटी होता-ना करता करता तो तयार झाला. खोपोलीला पोहचल्यावर लालवानी साहेबांनी त्यांची बॅग उघडून दाखवली- त्यात सर्व प्रकारची सोय तब्ब्येतीत होती. बियर, चकणा, आणि विविध रंगांच्या पेयांनी भरलेली ती बॅग बघून सगळेच खूष झाले. "अभि, आज तरी शाला तू तुजा भाटगिरी शोड  रे. पिऊन तर बघ..."  "नको नको मला ते तसलं  काही नको." "हाय कंबख्त तुने पीही नहीं|", असं लालवानी साहेबानी म्हणताच सगळेच गालिब झाले. कधी नव्हे ते अभिजितनेही आज आपण थोडी घेऊन बघूया असं ठरवलं. सगळे धबधब्याजवळ पोहोचले. लालवानी साहेबांनी एक बाटली चढवली आणि ते आता बाकीच्यांना सामील व्हायला निघाले. पाणी पडून पडून खालचा दगड मस्त गुळगुळीत सोफ्यासारखा झाला होता आणि त्यावरून पाणी खळखळत येऊन पुन्हा खालच्या दगडांवर पडत होतं. मूळचा घाबरट अभी खालीच उभा राहून अंगावर तुषार झेलत मजा घेत होता. तर लालवानी साहेब त्या कोसळत्या धारा अंगावर घेण्यासाठी उघडबंब पोटानी त्या गुळगुळीत दगडावर बसले.डोळे मिटून मानेवर पडणाऱ्या धारांमुळे त्यांची चांगलीच तंद्री लागली होती. धो धो कोसळणाऱ्या पाण्यानी कोणाला कोणाचा आवाज ऐकू येत नव्हता. आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आतच वरून निखळलेल्या दगडाने लालवानी साहेबांचा घात केला होता. वरून एक दगड निखळला आणि लालवानी साहेबांच्या मानेवरच येऊन आदळला. त्यांच्यामुळे खाली असलेला अभिजित मात्र थोडक्यात वाचला. पुढे काय झालं, ऍम्बुलन्सला कोणी बोलावलं आणि लालवानी साहेबांना वेळेत हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं ह्याचा ताळमेळ कोणालाच सांगता येणार नव्हता. थोडक्यात लालवानी साहेबांच्या जीवावरचा धोका टळला होता. पण मणक्यांचा चक्काचूर झाल्याने डॉक्टरांनी उरलेलं आयुष्य जे काही उरलं असेल ते अंथरुणातच काढावं लागेल असं सांगून टाकलं.

अभिजीतआमच्या गाडीच्या मित्रांना हा किस्सा सांगत असताना, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. "लालवानी साहेब त्या जागी नसते ना, तर माझीच वेळ होती जाण्याची. पण म्हणतात ना देव तारी त्याला... तसा थोडक्यात वाचलो रे मी. पण आता त्यांच्याकडे बघवत नाही रे." खरंच नियतीच्या मनात काय असतं कोणालाच कळत नाही. त्या दिवशी लालवानी साहेबांच्या त्या जागी असण्याने अभिजीतच्या जिवावरचे अरिष्ट टळलं होतं.

काळ कोणासाठीच थांबत नसतो. बघता बघता बँकेत सगळ्यांना लालवानी साहेब नसण्याची सवय झाली. अधून मधून कोणीतरी त्यांचा विषय काढायचं, मग त्यांच्या  जुन्या आठवणी काढून सगळे थोडा वेळ हळहळायचे आणि पुन्हा आपापल्या कामाला लागायचे. असंच काही वर्षांनी पुन्हा एकदा अभिजीतच्या बँकेत जायचा योग आला. माझं काम झालं आणि लालवानी साहेबांची आठवण निघणं अनिवार्य होतं. अभीशी बोलत असतानाच पुन्हा तेच गडगडाटी हसू कानावर पडलं. चमकून आम्ही दाराकडे बघितलं तर काठीच्या आधाराने चालत लालवानी साहेब शाखेत अवतरत होते. त्यांना आलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. डॉक्टरांना खोटं पाडून लालवानी साहेब पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे होते आणि पुन्हा एकदा अभी मला सांगत होता, "देव तारी त्याला कोण मारी... बघ तूच."  

माझं काम संपवून मी हाफ डे लागू नये म्हणून धावत पळत ऑफिसला जायला निघालो. लालवानी साहेबांच्या येण्याच्या खुशीत अभिजीत राजधानीची बिर्याणी आणायला स्वतः खाली उतरला. खरं तर बाबूवरच ही जवाबदारी असायची, पण  लालवानी साहेबांमुळे जीव वाचल्याची जाणीव असलेला अभिजीत स्वतः सगळ्यांना बिर्याणी खिलवणार होता. तो खाली उतरून रस्ता ओलांडणार तेवढ्यात भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला उडवलं. अभी रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि आपलं काय झालं हे कळण्याच्या आधीच त्याची शुद्ध हरपली.


आजूबाजूच्या लोकांनी ते बघताच चपळाईने ऍम्ब्युलन्स बोलावली. अभिजीतला आत ठेवत असतानाच, अभिजीतसाहेब त्यांचं पाकीट जागेवरच विसरून घाईघाईत उतरले म्हणून बाबू त्यांचं पाकीट घेऊन खाली आला. समोरचं दृश्य बघून त्याच्या मनात आलं, "आज अभिजीत साहेबांच्या जागी मी असतो तर? खरंच देव तारी त्याला..."

 


Thursday, July 15, 2021

दिल है हिंदुस्थानी! - नाती

    काही वर्षांपुर्वीची गोष्ट- मला माझ्या मावस आते सासूबाईंचा (नवर्याच्या आजीच्या बहिणीची मुलगी- बुद्धीमत्ता चाचणी ज्यांनी दिलीये, त्यांच्या लक्षात आलं असेलच) WhatsApp आला- “अगं एक काम होतं, सांगू का?” अगदी महत्वाचं काम असल्र्यायाशिवाय त्या असं काही बोलणार नाहीत ह्याची खात्री असल्याने मीही अगदी लगेच फोन लावला. “हक्कानी सांगा, काय करू?” मग त्यांनी संकोच बाजूला सारून मला सगळं समजावून सांगितलं. त्याप्रमाणे मी नक्की काहीतरी करते असं आश्वासन दिलं, मग त्यांचा जीव भांड्यात पडला. माझं विचारचक्र सुरु झालं, आता काय करता येईल… 

    तर झालं असं होतं की, त्यांच्या मामे नणंदेच्या मैत्रीणीचा मुलगा -प्रशांत आणि त्याची बायको रिया प्रोजेक्टसाठी न्युयॅार्कला थोड्या दिवसांसाठी आले होते. दिवसांचे महिने होता- होता रियाला दिवस गेले होते. ऐनवेळी विसा रद्द झाल्याने नेमकं भारताहूनही कोणी मदतीला येणं शक्य नव्हतं. नववा महिना लागल्यावर तिची आई येणार होती, पण आता तर तेही शक्य नव्हतं. बरं अमेरिकेत स्वयंपाकाला, बाळाला सांभाळायला, वरकामाला बाई ठेवणं परवडलं असतं तरी कुठून ओळखीच्या- विश्वासाच्या बायका शोधणार हेही त्यंना माहिती नव्हतं. पहिलटकरीण असल्यानं घरी सगळ्यांनाच घोर लागला होता.

    शेवटी द्राविडी प्राणायाम (म्हणजे काय ते मला विचारू नका, शास्त्र असतं ते) करून त्यांनी मला गाठलं होतं. मग मला आठवलं की माझी चुलत चुलत नणंद -नेहा(एव्हाना बुद्धीमत्ता चाचणीचा सराव झालाच असेल, ज्यांनी स्कॅालरशिपच्या परीक्षा दिल्या नाहीत त्यांनी सोडून द्यावं. सगळी नाती कुठे आपल्या लक्षात येतात…) न्यु जर्सीला बरीच वर्षं स्थाईक असते. मग तिला फोनवर सगळं रामायण ऐकवलं. अपेक्षेप्रमाणे तिनं चुटकीसरशी उपाय सुचवले. मग मी रियाला आणि नेहाला एकमेकींची ओळख करून दिली. नेहानी तिच्या ओळखीच्या गुज्जू बेनचा (रोजच्या डब्यासाठी), वरकामासाठी तासावरच्या मेक्सिकन बाईचा, डिलवरीच्या वेळी मदतीसाठी सुईणीचा (Doula), असे सगळे फोन नंबर मिळवून दिले. रियाची सोय नीट लावून दिली. मग आमचा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

    इतके दिवस शांतपणे माझं फोनवरचं संभाषण, चर्चा ह्या सगळ्याकडे आपलं काहीच लक्ष नाहीये असं भासवणार्या अमेरिकेत वाढलेल्या माझ्या मुलीनं शेवटी विचारलंच- “Mama, to whom were you talking? Who’s Neha aatya n who’s that Riya?” पण तिनं स्कॅालरशिपच्या परीक्षा न दिल्यानं तिला मला ही नाती समजावणं जरा जडच गेलं. माझ्या मावस आते सासूबाईंच्या मामे नणंदेच्या मैत्रीणीच्या सुनेला माझ्या सासर्यांच्या काकाच्या नातीने मदत केली, हे तिला झेपतच नव्हतं. शेवटी नेहमीसारखा ABCD (American Born Confused Desi) चा डायलॅाग तिनं टाकलाच, “ah, this can happen only with Indians!”

#proudToBeIndian