Friday, September 16, 2022
हिरकणी
Thursday, June 9, 2022
आतूर
आज-काल फक्त तुझाच विचार असतो मनात. कधी एकदा तुला भेटतेय असं झालंय. तुझ्या नुसत्या आठवणींनीही अंगावर काटा फुलून येतो. स्वतःशीच मी हसू लागते आणि आजूबाजूच्यांना मला चिडवण्याचं जणू निमित्तच मिळतं. तू आलास की हे करू, ते करू असं मी वर्षभर ठरवत राहते. तू आलास की, तुझ्याबरोबर लांबवर बाईकवर भटकायला जायचंय. माहितीये की, तुझ्याबरोबर बाईकवर भटकायचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तरीही वेडं मन अजूनही आशा ठेवून आहे. बाईक नाही तरी निदान लॉन्ग ड्राईव्हवर जाऊया, आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून जगाची पर्वा न करता दोघंच डोळ्यात डोळे घालून हरवून जाऊया. तू माझ्याबरोबर असलास ना की, वाफाळणारा टपरीवरचा चहा सुद्धा अगदी अमृततुल्य होऊन जातो.
महिने, आठवडे करत काही दिवस येऊन ठेपलेत. तुझ्या येण्याची चाहूल जरी लागली नं तरीही मला आपसूकच कळेल. तुझ्याआधीच तुझा गंध जीवाला वेडापिसा करेल. आणि मग ती आतुरता माझ्या रंध्र-रंधातून पाझरू लागेल. तुला जाणवतेय का रे माझी तगमग?
तू येशील नं तेव्हा मी जगाचा शिरस्ता पाळून दुरूनच तुझ्याकडे पापणी लववत बघत राहीन. पण मला माझाच भरवसा नाहीये. तू समोर आलास की, मी धावत धावत येऊन तुला घट्ट मिठीत घेईन पण तूही दुष्ट आहेस,काही कळायच्या आधीच कदाचित तू माझ्या मिठीतुन हळूच निसटून जाशील. तू भेटलास की नुसता भासच होता, ह्या विचारांनी मग अजूनच जीवाची काहिली होईल. पण त्या पुसटत्या भेटीनी तू पुन्हा पुन्हा येऊन मला चिंब चिंब भिजवणारा आहेस, ह्याची मला खात्री पटवशील. ये रे लवकर, नको आता ताटकळत ठेवूस.
- पावसाची आतुरतेने वाट बघणारी पक्की मुंबईकर!
Monday, June 6, 2022
दिल है हिंदुस्थानी- वढाळ मन!
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं ठरलं की,
आधी
कोण-कोण येणार आहे ह्याची यादी होते. व्हॅट्सऍपवर एक ग्रुप केला जातो. सगळ्यांच्या सुट्ट्या, बायकांच्या
माहेरी जायचे दिवस, मोठ्या आजीकडे जमायचे दिवस सगळ्याचाच ताळमेळ
घालायचा असतो. मोठया आजीला सगळे मोठी आजीच म्हणतात. आजोबा सगळ्या भावंडांत मोठे,
त्यामुळे
त्यांना मोठे आबा, आणि आजीला मोठी आजी म्हणूनच हाकी मारली जायची.
सगळ्यांच्या सोयींनी एक दिवस ठरतो भेटीचा. प्रत्येकाची वेगळीच तर्हा. कोणी हॉल बुक करायचा
सुचवतं तर कोणी रिसॉर्ट! कोणाला लग्नाच्या पंगतीचा मेनू ठेवायचा असतो तर कोणाला
चाट. कोणी म्हणतं सगळं बाहेरून मागवू, म्हणजे गप्पा मारता येतील तर कोणी सगळे
मिळून गाणी ऐकता-ऐकता उकडीचे मोदक करायचा घाट घालतं. शेवटी सगळ्यात उत्साही चंदा
मावशी हातात दोऱ्या घेते. तुम्ही सगळ्यांनी ठरलेल्या दिवशी माझ्याच घरी या, मोठी आजी दमलीये
आता. तिलाही जरा आराम मिळेल. बाकी सगळं मी बघून घेईन. चंदा मावशीकडे जायचंय
म्हंटल्यावर मागच्या वेळी तिच्याकडे कशी धम्माल केलेली त्याचे किस्से रंगतात. मग
एक दादा कोणते-कोणते खेळ खेळायचे त्याची जबाबदारी घेतो, एखादी ताई
सगळयांसाठी छोट्या-छोट्या भेटवस्तू आणायचं ठरवते.
बघता-बघता भेटीचा आठवडा येतो. पुढे-मागे करत
सगळे गावी जमतात. गावी कोणी मोठ्या आजीकडे, कोणी मावशीकडे,
कोणी
मामाकडे उतरतं. चंदा मावशीकडे सगळे जमतात. तिनी सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात
ठेवून साधाच पण रुचकर स्वयंपाक ठरवलेला असतो. मग उरलेल्या स्वयंपाकात सगळेच हातभार
लावतात. कोणी कोशिंबीर करतं, कोणी
पापड-कुरडया तळायला घेतं. हसत-खेळत जेवणं होतात. ठरलेले खेळ सुरु होतात, पण
तोपर्यंत मोठ्यांच्या डुलक्या सुरु झालेल्या असतात. मग घोरण्याची जुगलबंदी सुरु
व्हयायच्या आत मुलं पडवीत सटकतात, पत्यांचे डाव रंगतात.
संध्याकाळचा चहा-गप्पा संपता संपत नाहीत. पण
आता जायची वेळ झालेली असते. सगळ्यांचेच पाय जड झालेले असतात. मोठ्या आजीनी,
चंदा
मावशीनी, मामींनी वानोळा भरून दिलेल्या पिशव्या सांभाळत निरोप घेतला जातो.
निघताना, "आता एकदा शांतपणे भेटू आमच्या घरी, वेळ
काढून या. मग जरा गप्पा तरी होतील." इतका वेळ काय चाललेलं मग? मुलं एकमेकांना डोळ्यांनीच खुणावतात.
उन्हाळयाच्या दिवसात बहुतांशी परदेशात स्थायिक झालेले माझ्यासारखे भारतीय सुट्टी काढून भारतात जातायेत, जाणार आहेत किंवा ठरवतायेत. त्या सगळ्यांच्याच मनात भारतात जायच्या आधी अशा आठवणींचं माहोळ उठलेलं असतं. लहानपणच्या आठवणींनी मन केव्हाच तिकडे पोहोचलेले असते. भारतात पोहोचलं की,
काळाच्या
खुणा चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून आणि थकलेल्या हालचालींमधून जाणवतात. पण मनात
अजूनही कंबर कसून सगळ्यांचं उत्साहानी करणारी आई असते, केसांना
थरथरत्या हातानी तेल लावून देत "काय वाट लावलीस ग केसांची...", असं म्हणणारी काळाच्या पडद्या आड
गेलेली आजी असते. एकत्र जमून सासरी सगळ्यांनी केलेली धम्माल असते, जी आता
काळानुसार होणार नसते. सगळ्यांना एकत्र भेटलं तरीही, "तू घरी आलीच
नाहीस, एकदा ये वेळ काढून." अशी प्रेमळ तक्रारही होणार असते. आणि त्या
तक्रारींसाठी, वेळ जमवून भेटण्यासाठी, हक्कानी
भांडण्यासाठी, लाड करून घेण्यासाठी आणि काही जणांना कदाचित
शेवटचं भेटण्यासाठी वढाळ मन आतापासूनच
भरून आलेलं असतं.
#proudToBeIndian
Wednesday, May 25, 2022
हेअरकट
पोळी?
तिळ-गूळ!
एकदा
कपडे घ्यायला मॅालमधे गेले होते. कपड्यांचा ढीग घेऊन ट्रायल रुममधे गेले. हा टॅाप
घालून बघ,
नाक मुरडून दुसरा घालून बघ, असं
करता करता अचानक माझा खरेदीचा मूडच गेला. सगळे कपडे चुकीच्या साइझचे वाटू लागले.
मग ह्या दुकानात माझ्या देहयष्टीला सुडौल भासवणारे ब्रॅन्ड्सच नाहीत, असा
मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. सगळा पसारा आवरून बाहेर पडणार तितक्यात कानावर गोड
हिंदी आलं. “अजी,
सुनते हो. तुस्सी देखलो इक वार. थोडी मोटी तो नही
लगदी?”
परदेशात राहून दोन दशकं उलटलीयेत, तरीही
आपली भाषा ऐकली की,
पटकन मन भारतात जाऊन पोहोचतं. परदेशात असल्यानी
त्या दोघांनाही,
“आपली भाषा कोणाला कळणार आहे, बोला
बिनधास्त!”,
असा एकप्रकारचा आत्मविश्वास असावा. त्यात मी भसकन्
बाहेर पडून त्यांचा पचका करू नये, असं वाटून मी त्या २X२
च्या ट्रायल रुममधे बसून राहिले. आत बसून भिंतींना कान असतात ह्याच्ं प्रात्यक्षिक
करू लागले. आता तो काय म्हणतो ह्याकडे माझं लक्ष होतं. “जैसे हो, वैसेही
दिखना है आपको. बस करो अब…” असं वाक्य कानावर आल्यावर पटकन बाहेर जाऊन न बघितलेल्या
तिला सांगावंसं वाटलं,
“तुस्सी वड्डे सोणे लग रहे हो ज्जी” अगदी
पोटतिडकीनी तिला लेक्चर द्यायचा मोह मला होत होता की, बाई
आता तरी
आपण
कसं दिसतोय,
हे स्वतःला न विचारता दुसर्यांच्या नजरेतून आपलं
सौंदर्य बघण्याची सवय सोड आता! पण तेवढं पंजाबी सोडा, हिंदीही
बोलणं मला झेपलं नसतं. त्यामुळे मी मुग गिळून ते दोघं जाण्याची वाट बघू लागले.
तेवढ्यात तिनी ठसक्यात ऐकवलं, “तुस्सी तो रेहनेही दो, बैठे
रहो चुपचाप। मैने तो डॅाली के साथही आना था शॅापिंगवास्ते, इक्क
तो फॅशन सेन्स नही है आपको,
और गल कर रह्हे है।”
त्यांचा
तिळ-गूळ असा काही जमला होता की, बत्त्याने फोडूनही फुटला नसता! मी राजरोसपणे
रुमच्या बाहेर पडले. ती आतमधून तडतडतच होती, तर
तो गपगुमान त्याला दिलेल्या स्टुलावर गूळ लावल्यासारखा चिकटून बसला होता.
स्वप्नातल्या कळ्यांनो…
खूप वेळा वाटतं की, तुला एकदा विचारून टाकावं. तुझ्यासाठी मी नक्की कोण आहे? ओळख, मित्र, जवळचा मित्र की
त्याहीपेक्षा वेगळं काही? पण पुन्हा एकदा विचार येतो, न जाणो तू खरं बोललीस आणि तुझं सत्य मला पचवता नाही आलं तर? आहे का माझी तयारी, तुझ्या मनातलं जाणून
घेण्याची, की माझ्या जागेपणीच्या स्वप्नातलीच तू खरी
आहेस? आताशा तर खरं काय आणि माझ्या मनातलं काय ह्याच्या सीमारेषाही धुसर होत चालल्या आहेत.
ह्या न संपणार्या स्वप्नातून मला स्वतःला उठवायचंच नाहीये.
सगळे आजूबाजूला असतानाही मी सिगरेट हाती
घेतल्याबरोबर तुझा नापसंतीचा कटाक्ष मला कळून आपोआपच मी आपसूकच ती सिगरेट परत
ठेवून देतो, तू मात्र नामानिराळी राहून चहाचे घुटके घेत
गालातल्या गालात हसत राहतेस.
तासन्तास आपल्या गप्पा रंगलेल्या असतात.
आपल्या ह्या जगावेगळ्या मैत्रीला कोणी नावं तर ठेवणार नाही नं, ह्या विचारानं मी कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे बघत राहतो. माझं
लक्षच नाहीये असं वाटून वैतागून तू निघून जातेस, अन् तुला माझ्या
मनातल्या भावना का नाही कळत म्हणून धुसमुसत राहतो.
मी खुलून बोलावं म्हणून तू डिवचत राहतेस, आणि तुला सगळं कळूनही तू न कळल्याचं दाखवतेस म्हणून मी तणतणत
राहतो. माझ्या ह्या अशा वागण्यानं हल्ली तू दुरावते आहेस. पण खरंच दुरावते आहेस की, कधी जवळच नव्हतीस?
सांग नं गं एकदा, मी कोण आहे तुझ्यासाठी? पण नको, तो प्रश्नही नको, अन् तुझं उत्तरही नको.
मी असंच मनापासून आजन्म तुझ्यावर प्रेम करत राहीन, बंधनात न अडकता. तुझ्या
आवडत्या गाण्यासारखं-
“स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,
गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा…”






