पहिल्यांदाच
दीर्घकथा लिहिण्याचा प्रयत्न करतेय, चूकभूल माफ असावी. ह्या कथेतली पात्र खरी की कल्पनाविश्वातली, ह्याचा फारसा खोलात जाऊन विचार करू नका. ही पात्रं आपल्या
आजू-बाजूला सर्वत्र सापडतील, म्हणूनच मला
त्यांना नावंही द्यावीशी वाटली नाही. ही गोष्ट आहे त्याची आणि तिची! काळाच्या ओघात
हरवलेल्या अव्यक्त प्रेमाची, मैत्रीची, आणि स्वतःच्या तरुणपणीचा काळ आठवणाऱ्या
सगळ्यांचीच.
#दीर्घकथा भेट भाग
१
"ह्या शुक्रवारी काय करतोयस?"
"काही विशेष नाही, बोल काय प्लॅन आहे?"
"भेटायचं का?"
"आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण-कोण
आहे अव्हेलेबल..."
"बराच वेळ काहीतरी type करतेयस पण काहीच मेसेज नाही, कुठे
अडकलीस?"
आता ह्याला कसं सांगू की ग्रुपला नाही तुला भेटायचंय एकटं. इतक्या
वर्षांचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय. मोकळं व्हायचंय.
"ए बाई, बोल ना. कामं आहेत मला, एवढी फॉर्मॅलिटी तुला कधीपासून लागायला
लागली. विचार करून बोलणं शोभत नाही हं तुला :) "
"अरे काही नाही लिहीत होते तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आलेय. बरं
तू फ्री आहेस का ते सांग शुक्रवारी, ग्रुपचं नंतर बघू."
"मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे! कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांगा,
मी
येईन."
"शाब्बास! शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पाषाण!"
"ठीक आहे, तुला साडे सहाला पीक करतो. वेळेवर ये!"
"अरे मी येईन की, कशाला पिकअप साठी उलटं येतोस?"
"गप बस, वेळेवर खाली उतर. चल, बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही
दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील."
"ओके, बाय."
हम्म प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता
ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे ठरवलयेस ना, सोडून द्यायचं. तिनं
स्वतःलाच दटावलं.
आठवड्याच्या गडबडीत त्यानी पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही,
आणि
तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही ह्याची खात्री नव्हती. शेवटी न राहवून
शुक्रवारी सकाळी तिनी पिंग केलंच.
"पिंग"
" पॉंग"
"भेटतोयेस ना आज?"
"अर्रे हो, आज भेटायचं ठरलंय ना. कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही
बोललीस का? कुठे जायचंय जेवायला?"
"भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये."
तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच
एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता. मग ऑर्कुटमुळे थोडंफार
कळलं शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही
व्हयायचं. काही वर्षांनी आलं व्हाट्सअँप.
मग कुठून कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधून मधून भेटणं व्हायचं पण सगळा ग्रुप
मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची "बसायला" तर मुली त्यांची पोरा-बाळांसकट
ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही
म्हंटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगळ्या असलेली काही मंडळी
एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात आठवीत "ब"
तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्याकुठे भरकटत
जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय? असं डायरेक्ट कसं विचारू? पण
एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा
दिसतोय खरा. ह्या आधी कधी आम्ही दोघेच भेटलो नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही
जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की, एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं. पण
त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीही संपुष्टात येईल,
व्यभिचार
तर नाही हा- ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट! ह्या विचारांनी कधी स्वतःचं मन
स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत
असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही.
"काय रे, आहेस का?"
"हो, भेटू संध्याकाळी. साडेसहाला तयार राहा."
"अरे तू पण ना, येईन ना मी डायरेक्ट पाषाणला."
"मी येतोय सांगितलं ना? बरं चल, बाय फॉर
नाऊ."
"बाय…"
#दीर्घकथा भेट
भाग २
भेटायचं ठरलं तर खरं, पण
संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते, मुलंही
मागे-पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा,मुलं, सासू-सासरे,
नोकरी
ह्या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो.
आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या, सगळ्यानपासून-
कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. पन्नाशीकडे झुकताना
हल्ली जाणवायला लागलंय की, आता वेळ फार उरला नाहीये. अधून मधून
कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ऍक्सिडेंटची
बातमी येत राहते. जीवन क्षणभंगुर आहे हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आता ते पटायला
लागलंय. त्यामुळे आता ह्या मनाला मोकळं करायचंय, सगळे गुंते
सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेले असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या
आधीच...
तिचं आवडीचं "एक आधी कहानी थी,
जो
मिलके सुनानी थी..." गाणं लुपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत
वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. साडेपाचला आईच्या हातचा कडक
चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती,
चेहऱ्यावरच्या
सुरकुत्याही त्यांचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती
कधी नव्हतीच. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते रविवारी, निदान फेशियल
तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून
गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो. पोट सुटलंय, टक्कल पडलंय आणि
चष्माही! पण नवरा मात्र अजूनही स्वतःला
सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही चाळिशीतलाच दिसतो. त्याची
उंची, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि हसरा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर तिला
उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय, अशी जाणीव
झाली. इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आपला छोटासा संसार, सुख-समृद्धीने
भरलेले घर असतानाही कुठेतरी एक बोच जाणवत राहते खरी. कोणाच्याच आयुष्यात सतत चढता
आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरीही सगळ्यात जास्त ठेच जवळच्या
माणसांकडूनच मिळते, हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा, ह्या
टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचं. जशा जुन्या गोष्टींना
आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तशाच अव्यक्त
भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःच स्वतःला
समजावत राहिली की, जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये.
मग त्यातल्या त्यात
मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनानी तिनं स्वतःलाच एक
छानसं स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं.
साडेसहाच्या ठोक्याला ती खाली उतरली.
तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला पटकन. तिनी हलकेच
त्याच्या खांदयावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्यामागे ओढणी सावरत बसली.
बाईक सुरु झाली आणि मग तिनं मागचं हॅन्डल पकडत तोल सावरला, त्याच्या
खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला, पण मागे ऐकू आलं
नाही. त्यामुळे ती थोढीशी पुढे होऊन तो काय बोलतोय हे ऐकायचा प्रयत्न करू लागली.
कानावर फक्त "स्पीडब्रेक!" एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर
हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिनी त्याच्या खांदयावर हात ठेवला.
"म्हणून सांगतोय,
खांदयावर
हात ठेव! मलाही सावरायला बरं पडेल." त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला.
श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द
करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल,
ट्रॅफिकबद्दल,
पण
तिच्या कानाच्या पाळया गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता.
त्याच्या पर्फ्युमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडंपिसं करत होता. सरते शेवटी ती थोडी
मागे सरकून बसली, मागच्या हँडलला घट्ट धरून.
"ऐकू येत नाहीये,
पाषाणला
पोचलो की बोलू..." एवढंच मोट्ठ्यानी ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू
लागली. काय होतंय हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत
माझ्यात? छे, भलतंच काहीतरी! पुन्हा एकदा काय बोलायचंय ह्याची मनाशी उजळणी करून
घ्यावी नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत
बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या
होत्या आज. "ती सध्या काय करते?" वरून काही
गोष्टींचा उलगडा झालेला, थोडी हिम्मतही आलेली. तरीही सिनेमा
बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं, खूपच वेगळं!
#दीर्घकथा भेट
भाग ३
"उतरतेस का? पोचलो आपण.."
"अरे हो, कळलंच नाही."
पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून,
हेल्मेट
नीट ठेवून तो सवयीने कपाळावरून हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच झुल्फ मागे
करायचा हेल्मेट काढलं की, ते आठवून तिला हसायला आलं. आता
डोक्यावर पूर्ण चमन-गोटा होता!
"हसा मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेयेस पण! थोडीशी लठ्ठ झालीयेस,
पण
बाकी काहीच फरक नाही."
"बस काय, पन्नाशी आली आता. किती खेचशील? बरं चल तिकडे एक
बेंच मोकळा दिसतोय, कोणी यायच्या आधी जाऊन बसुया."
थोड्याशा आडोशाला असलेल्या बेंचवर, एकमेकांमध्ये पुरेसं अंतर ठेवून दोघं
स्थिरावले. समोरच्या तलावातलं पाणी सूर्यकिरणांनी चमकत होतं. लाटांवर आकाशातली
रंगपंचमी उतरली होती. आणि मंद वाऱ्यांनी तिच्या बटा डोळ्यांवर येत होत्या.
"कधीपर्यंत आहेस, पुण्यात?"
" ह्या रविवारी परत..."
"मुलं कशी आहेत? आता तुझी मुलं तुझ्यापेक्षाही उंच
झालीयेत ना?"
"हो ना, जिराफ झालीयेत दोघंही! तुझी मुलगी कशी आहे?"
"मस्त! बास्केटबॉल शिवाय काहीच सुचत नाही तिला. अभ्यास ऑप्शनलाच
टाकलाय!"
"तुझ्यासारखाच! तुझं काय वाईट झालं? तिचंही छान होईल
सगळं"
"आपला काळ वेगळा होता. आता कित्ती कॉम्पिटिशन वाढलीये. पण खरंय,
होईल
सगळं छान. आतापासून काय विचार करायचा, करेल तीही वेळ आली की."
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर
पुढे काय बोलायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच आहे एवढा
अंदाज आला होता. पन्नाशीतही खरंच किती सुंदर दिसतेय ही! म्हणजे असे मेकपचे थर
नाहीत, उगाच केस रंगवलेले नाहीत. साधी-सोज्वळ आणि स्वतंत्र विचारांच्या
बाण्याने थोडीशी कठोर वाटणारी. बरीचशी हळवी आणि ठार वेडी! पाऊस म्हंटलं की जिथे
असेल तिथे जाऊन चिंब भिजणारी, भेटायचं ठरलं की द्राविडी प्राणायम
करून भेटणारी! ती लाटांकडे बघत विचारांची जुळवाजुळव करत असताना, त्याला
पुढे सरकून तिचं डोकं खांदयावर ठेवून काहीच न बोलता शांतपणे बसून राहावंसं वाटत
होतं.
शेवटी तिनंच त्याच्याकडे मान वेळावून बघितलं. तो
तिचंच निरीक्षण करतोय हे बघून ती गोरी-मोरी झाली.
पण मग सावरून तिनी बोलायला सुरुवात केली.
"तुला खूप विचित्र वाटलं असेल ना असं एकट्यालाच भेटायला बोलावलं मी.
आणि थँक्स की भेटायच्या आधी तू दहा हज्जार प्रश्न नाही विचारलेस!"
"बस काय! एवढी फॉर्मॅलिटी!", त्यानी रागावून
बुक्का मारण्याची त्याची टिपिकल धमकी दिली.
तशी हसून तिनं बोलायला सुरुवात केली.
"News flash!! मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण प्लिज
मध्ये थांबवू नकोस. तू काही बोलावंस अशी अपेक्षा नाहीये, पण फक्त ऐकून घे आज. नेहमी म्हणतोस ना
की रागावणं सोडून दिलंयेस तू, ते आज लक्षात ठेव."
मग पुन्हा तलावाकडे बघत, त्याची नजर चुकवत तिनी जणू स्वगतच सुरु
केलं.
#दीर्घकथा भेट
भाग ४
"मला अजूनही
आठवतंय आपण सहावीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंचमागेच तुमचा
बेंच होता. तू आणि ओमकार! त्यावेळी चक्क उंच मुलींमध्ये गणना व्हायची माझी!
त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच, स्पोर्ट्समध्ये/
नाचात /अभ्यासात सगळीकडेच पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव-गाव-फळ-फुल
खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूनी बरीच जणं होती.
आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहीत होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही
आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तरं तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील! ते तुला न सांगताही कळलं. तू
म्हणालास-मी तुझ्या बाजूनी आहे! इतकं भारी वाटलं सांगू! आणि मग जिंकणं-हरणं नाममात्र राहिलं... तुला हे
काही आठवतही नसेल."
"आठवत कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून दोन
पोनीटेल्स बांधायचीस. छोटी मिनी माउस! आणि कायम नाकावर राग असायचा, भांडायला
तय्यार! तुला मी रेडोबा नाव ठेवलं होतं."
"माहितीये मला. पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं
पण ते तिथपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस
तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो,
शाळेजवळच
तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती दहा एक मिनिटं मजेत जायची एकत्र
जाताना. पुढे सातवीत असताना मला एका मैत्रिणीनी सांगितलं की इतिहासाच्या
पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यु लिहिलेलंस. ते खरं की खोटं हे
अजूनही माहिती नाही. पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. खरं
सांगू, इतकी भीती वाटली. मुलींचं नाव खराब होतं, जग नावं ठेवतं.
काय आणि काय! तेव्हा इतकं छोटं जग होतं न आपलं! मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी
करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहितीये आणि आता माझं काही खरं नाही. कसली
भीती होती, काय माहिती. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम! सातवीनंतर 'अ'
आणि
'ब' अशा तुकड्या वेगळ्या केल्या. सातवीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती
मिळाले ह्यापेक्षा तू माझ्या तुकडीत आहेस की नाही, ह्याची मला
जास्त उत्सुकता होती. म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस.
का कोणास ठाऊक, माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस, अशी एक वेडी आशा
होती मला. पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग
संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही,
ह्याच
विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते ना कोणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलण्याची
हिम्मत!"
"कसं बोलणार? मला 'ब' तुकडीत
टाकलेलं. इतका राग आला होता नं. 'ब' म्हणजे बुद्धू
एवढंच माहिती होतं. त्यात तुला 'अ', म्हणजे तू मला
चिडवणार असं वाटलं मला."
"आपण कित्ती वर्ष ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी न बोलल्यानी गैरसमज
करून घेतलेत नं? तर असो,
शाळेची
पुढची तीन वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची.
तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पळत लवकर पोचायचे. तू बघून न
बघितल्यासारखा करायचास. पण मी माझ्याच नादात होते, तुला लांबूनच
बघून खुश व्हयायचे. तेव्हा घरात लॅण्डलाइनही नव्हती, त्यामुळे संपर्क
असण्याचं संबंधच नव्हता. दहावी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय
करतोयस ह्याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी
पाणीपुरी खायला गेलेलो. माझी टर्न यायची मी वाट बघत असतानाच समोरच्या गृपमधली एक मुलगी
माझ्याजवळ येऊन म्हणाली
तू नूतन मराठीमध्ये होतीस का? मी हो म्हण्टलं. १९९०ची बॅच का?
मी
म्हण्टलं, हो. तशी ती निघून गेली आणि तिचा पूर्ण ग्रुप खो
खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच
उभी होती तर तिनी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तर त्या ग्रुपला मी
तुझ्या शाळेत होते हे माहिती होतं, कारण आता तू त्यांच्या कॉलेजमध्ये
होतास. त्या सगळ्यांना तू सांगितलेलंस की मी तुझ्या मागे लागलेय! इतकं भयंकर वाटलं
न ते ऐकून! एरवी कमीत कमी तीन प्लेट पाणीपुरी खाणारी मी, त्या तिसऱ्या
पुरीनंतर आजतागायत पाणीपुरी खाऊ शकले नाहीये मी. डोळ्यातलं पाणी ठसक्यानी आलंय असा बहाणा करून मी
घरी निघून आले."
तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिनी त्याला थांबवलं.
"स्पष्टीकरण नकोय मला, खरंच. खूप वर्षांपूर्वीच्या ह्या
सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं-किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या-खोट्याची शहनिशा
करण्याची तेव्हा हिम्मत नव्हती, आणि आता इतक्या वर्षांनंतर इच्छाही
नाहीये. पण
इतकी वर्ष हे सगळं आत साठवून ठेवलं ते आता वाहतं करायचंय. तर घरी आले आणि खूप
रडले. माझ्यासाठी जे खूप हळुवार, न उमलेलं, न व्यक्त केलेलं
असं खूप खास होतं, त्याची अशी परवड झाली होती. स्वतःचीच खूप घाण वाटली. वाया गेलेली
मुलगी अशी जी व्याख्या होती, ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने
मी तुझ्या मागे पडले होते आणि तू ते सगळ्यांना सांगत फिरत होतास! माझ्या मनातले
सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नावच नसावं
बहुदा. तोही माझ्या मैत्रिणींनी केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा
विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला, आता साक्षात
मदनाचा पुतळाही माझ्यासमोर आला तरीही मी ढळणार नाही."
तेव्हाचं सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवंढा आलाच. असंही आज-काल कारण
नसतानाही डोळे भरून यायचे. गायनॅकनी सांगितलंच होतं की वयाच्या ह्या टप्प्यावर हे
असं होणारच. मूड स्विनग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं,
बरंच
काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं! जे आवडेल ते करायचं. जे मनात येईल ते बोलून
मोकळं व्हायचं.
तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या
रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे, आपल्यामुळे ती कित्ती हर्ट झालीये,
ह्याची
जाणीव त्याला पहिल्यांदाच झाली.
"तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कदाचित हे सगळं माहितीही नसेल. मी
स्वतःला समजावलं शेवटी, की ते एकतर्फी प्रेम होतं. हे असं मुलं करतात हे ऐकून होते. मुलीही
एकतर्फी प्रेम करतात हे माहितीच नव्हतं, आणि असं करणारी ती मुलगी मी होते! हा
एवढा मोठ्ठा धक्का होता ना! शाळेतली ती तीन-चार वर्ष मी कुठल्यातरी धुक्यात वावरत
होते. इतर मुलींची अफेयर्स होत होती, तुटत
होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र
लिहिलेलंस असं काहीबाही कानावर यायचं. तरीही मी त्या "अफवांवर" विश्वास
ठेवायचे नाही. स्वतःलाच समजवायचे की तुला मी खूप आवडते पण तुला आपलं प्रेम खूप
सिक्रेट ठेवायचंय म्हणून तू बोलून दाखवत नाहीस! कसली मूर्ख होते मी!",
आणि
ती खो-खो हसत सुटली. त्याच्याकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती.
तसंच लाटांकडे बघत, तो उठून गेला नाहीये ना एवढी खात्री
करून, तिनं स्वगत सुरु ठेवलं.
"पण तुझ्या मैत्रिणींमुळे मी जमिनीवर आले. स्वतःला सावरलं आणि
अभ्यासात बुडवून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक/इन्स्टा नसल्यानी तुझी काही
खबरबात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी बीकॉम, ते करता करता
सीए, मग एमबीए! त्यात इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे ओघानी आलंच. एव्हाना
माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो
माझा! त्यानी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाले. तोपर्यंत कोणत्याही
मुलानी माझ्याकडे त्या नजरेनी बघितलंच नव्हतं बहुदा, त्यामुळे
पहिल्या मुलानी विचारल्या बरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं!", पुन्हा
बेदम हसू आलं तिला, स्वतःचीच कीव
येऊन. बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर
त्यानं हलकेच थोपटलं. त्यानी बळकटी येऊन ती पुढे बोलती झाली…
#दीर्घकथा भेट
भाग ५
"त्यानंतरची वर्षं सगळी
घाई-गडबडीची गेली. सासरच्या तर्हा समजून घेणं, त्या
घराला-माणसांना आपलं करून घेण्यात, स्वतःच्या करियरला पुढे नेण्यात कशी
गेली कळलंच नाही. बरीच नवीन नाती जोडली गेली, नवीन सर्कल तयार
झालं. इतक्या वर्षात पुण्यातल्या पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही. शाळेनंतर
सगळेच आपापल्या फिल्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते. कॉलेज, क्लासेस,
इंटर्नशिप
सगळीकडचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्या सगळ्यांच्या गदारोळात मी
नवर्याच्या साथीने व्यस्त होत गेले. त्यातच मध्यन्तरी ऑर्कुट आलं. आवर्जून तुला
शोधलं. तिकडे तुझ्या पोस्ट्स, तुझे बायकोबरचे फोटोज बघून छान वाटलं. तूही तुझ्या आयुष्यात
सेटल आहेस, खुश आहेस असं जाणवलं. तुझा नाद तिकडेच सोडून द्यायचा होता. इतक्या वर्षांनंतर तुझ्याशी बोलण्याची हिम्मत नव्हती, तरीही
रेटानीच कॉन्टॅक्ट केला. तू तुझ्याच धुंदीत होतास, तुझ्याबद्दल
भरभरून बोललास. पण माझ्याबद्दल एका शब्दानेही विचारलंसच नाहीस! मग कळलं की
पुलाखालून कितीही पाणी गेलं तरीही पुलाला पत्ताच नाहीये! माझ्या मनाचा एक कप्पा
तुझ्यात अजूनही कुठेतरी गुंतला होता हे माहितीच नव्हतं, आणि त्यावरची
खपली पुन्हा एकदा मीच वस्तर्यानी खरवडून काढली होती. एक वेडी आशा होती की तूही मला
इतकी वर्षं शोधत असशील, मी पिंग केल्यावर तू भरभरून बोलशील. माझ्यावरच्या ना व्यक्त केलेल्या
प्रेमाची कबुली देशील. वेल, मनाचेच खेळ ते...
मग पुन्हा ना कधी मी तुला मेसेंजरवर
पिंग केलं, आणि अर्थात तू करणारच नव्हतास! पुन्हा काही वर्षं अशीच गेली, स्वतःच्या
आयुष्यात असलेलं सुख शोधण्यात-अनुभवण्यात. मुलांच्या जन्माने एका वेगळ्याच
नात्याचा अनुभव आला. माझं सगळं अस्तित्व त्यांच्यासाठीच होऊन गेलं. ह्याआधी इतक्या
निरागस प्रेमाचा अनुभवच घेतला नव्हता. मी जरा नजरेबाहेर गेले तरी कावरी-बावरी
होणारी त्यांची नजर आणि मी समोर येताच मोठ्ठ बोळकं भरून हसू! सगळ्या जगाचा,
अगदी
तुझाही विसर पाडायला लावणारी होती ती वर्षं... त्यातच आम्ही सगळे औरंगाबादला शिफ्ट
झालो, मग तर पुणं मागेच पडलं. येता-जाताना वळणावर कधीतरी तू नजरेस पडशील ही
जीवघेणी प्रतिक्षाही संपली. मी कयासाने
पुण्याला येण्याचं टाळत गेले. आई-बाबाच मग आमच्याकडे येऊन भेटून जात. मुलं
लहान असल्याचं कारण कोणालाही पटण्यासारखंच होतं.
हल्लीच काही वर्षांपूर्वी
व्हाट्सअँपचा ग्रुप झाला आपला. हळूहळू भेटी-गाठी व्हायला लागल्या. अगदी पहिल्या गेट-टुगेदरला तू भेटशील अशी हुरहूर वाटत होती. तू येणार
की नाही हे कोणाला विचारूही शकले नाही.
नवरा-मुलांसकट सगळे भेटलेलो, तेव्हा तुला तुझ्या बायकोबरोबर भेटायची
खूप इच्छा होती. पण तुम्ही आलातच नाही. थोडी निराशा झाली खरी, पण
मग हायसही वाटलं. तू समोर आल्यावर माझं वागणं काही बदललं असतं, तर
नवर्याच्या नक्कीच लक्षात आलं असतं, असं उगाच वाटून गेलं. बावळट ती बावळटच राहिले मी! तुला कदाचित कळणार नाही हे सगळं. माझ्या
आयुष्यात काही कमतरता होती, किंवा नवरा-सासर काही वाईट होतं अशातला
भागच नाहीये. लौकिकार्थाने मी अतिशय सुखी होते, आहे. काडीचंही व्यसन नसणारा नवरा, प्रेमळ सासर, आर्थिक दृष्ट्याही
कुठलीच कमी नाही, मुलंही वेळेत झाली आणि अगदी लाघवी आहेत.
ते म्हणतात नं कधी कधी सुखी टोचतं, तशातला
भाग आहे माझा. कुठेही काहीही कमी नसताना मनात एक सल राहून गेला. तुझी ठुसठुसणारी
आठवण, आणि तुला माझ्या भावना कधीच न सांगू शकल्याचे शल्य! इंग्लिशमध्ये
व्हॉट इफ म्हणतात तसं प्रश्नचिन्ह! तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असावं कधीतरी, अशी
भाबडी आशा.
अधून-मधून तूही सामील व्हायला लागलास
गेट-टुगेदरमध्ये. आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं! इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्षात
समोर बघून आत काहीच हाललं नाही. इतर मित्रांसारख्याच मी तुझ्याशीही सहज गप्पा मारू
शकले. त्यात काहीच वावगं वाटलं नाही. मी खरंच पोक्त झाले होते एव्हाना. तुझं
सुटलेलं पोट, पडलेले टक्कल आणि सतत दोन तासाला बाहेर जाऊन सिगरेट पिऊन येणं हेही
जाणवलं नाही. तू कट्टर शाकाहारी, तर नॉन-वेजशिवाय माझं पानही हालत नाही.
त्यामुळे मग तू येणार असलास की आपसूकच शुद्ध-शाकाहारी हॉटेलमध्ये बेत ठरू लागले.
नाखुशीनेच मी सामील होत गेले. आठवतंय एकदा आपण सगळे लोणावळ्याला ओव्हरनाईट स्टे
साठी गेलेलो. तिकडे रात्री मी पहिल्यांदाच वाईन घेतली. कॅम्पफायरच्या भोवती बसून
आपण गाणी, गप्पा मारत होतो. तेव्हा गझलचा सिलसिला सुरु झालं आणि मी अचानक सेंटी
झाले. तेव्हा मी गाणं म्हणटलेलं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच
केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा... त्यावेळी तू माझ्या डोळ्यात डोळे
घालून असं काही बघितलंस नं, की आजूबाजूला कोण आहे ह्याचा विसरच
पडला. त्या एका क्षणी पुन्हा तो व्हॉट इफचा भुंगा कानात गुणगुणायला लागला.
त्यानंतर तू काही मेसेजेस पर्सनलवर
पाठवायला लागलास. गप्पांच्या नादात हमखास उशीर व्हायचा. त्यामुळे मिटनंतर मुलींना
सोडायला कोणी नं कोणीतरी जायचंच. मला जाणवलं की मला सोडायला नेमका तूच यायचास. तसंच एकदा गमतीत मी
म्हंटल काय रे फक्त सोडायला येतोस, घ्यायलाही येत जा की-रॉयल ट्रीटमेंट!
आणि खरंच तेव्हापासून मला घ्यायलाही तू येऊ लागलास. तरीही मी मनाला समजावलं ह्यात
काहीच विशेष नाहीये. आपण फक्त चांगले मित्र आहोत. अधून मधून चक्क
गप्पा मारणं सुरु झालं. वयाचा पोक्तपणा म्हण किंवा एव्हाना मी वस्तुस्थिती मान्य
केली होती असं म्हण, पण त्या काळातल्या आपल्या गप्पा
खरंच मनमोकळ्या होत्या. पण तरीही कुठेतरी स्वतःचंच मन स्वतःला खायचं, मग
उगाच आपले पर्सनल चॅट मी डिलीट करत गेले. त्यात एकदा तू खूप ड्रंक होतास बहुदा.
तेव्हा काहीतरी बरळलास - तुला शाळेतलं काही आठवतंय का? मी
होतो ना तुझा जवळचा मित्र? मग का नाही मला समजावून माझ्यासाठी
भांडलीस? का आपल्यात अबोला येऊ दिलास? एकदा, फक्त एकदा विचार
करून बघ ना आज की, आपण लांब गेलो नसतो तर काय झालं असतं? पुन्हा एकदा
शाळेतले होऊया ना... असं काहीतरी. तुला आठवतही नसेल हे. की हेही माझ्याच मनाचे खेळ
काय माहिती, पण मी ते चॅट डिलीट केलं एवढं मात्र नक्की. त्यावरून मी पुन्हा
घसरण्याच्या आधीच स्वतःला सावरलं.
मग मात्र मी खाडकन जागी झाले.
वस्तुस्थितीची जाणीव झाली. स्वतःलाच प्रश्न विचारले. खरंच मला तुझ्याबद्दल काही
विशेष वाटतंय अजूनही? किंवा कधी वाटलं होतं ते ते एक प्रकारचं आकर्षण होतं, मनाचे
खेळ होते? काय होते ते, काय वाटतंय आज? खूप मेडिटेशन
केलं. तुझ्यापासून काटेकोरपणे स्वतःला लांब ठेवलं. आणि मग हळूहळू स्वतःचीच नवीन
ओळख होत गेली. विचारांची सुसंगत सांगड लागली.
वयात येण्याच्या काळात एखाद्या मुलाला
आपण आवडतोय, ही कल्पनाच खूप सुखद असते. त्यात आजूबाजूच्या मैत्रिणीही भरीला
घालतात-हो, हो, तुझ्याकडेच बघत होता तो! आणि मनाचे खेळ सुरु होतात. त्यात आपल्याकडचे
सिनेमेही भन्नाट असतात. "नकारातच होकार असतो, खरं प्रेम खूप
वेगळं असतं - ह्यांव असतं अन त्यंव असतं." माझ्या मैत्रिणीही तेव्हा प्रेमात
सपशेल आपटत होत्या. त्यांचंच बघून माझ्या मनानेही एक चित्र उभारलं असेल कदाचित.
त्या कल्पनेचा माझ्यावर इतका काही पगडा बसला होता की मला सारासार विचार करण्याची
बुद्धीच उरली नव्हती. इतकी वर्ष मी त्या संकल्पनेला इतकी घट्ट धरून बसले होते की,
की
तेच खरंय आणि माझं पहिलं प्रेम मी गमावून बसलेय असं वाटत होतं. पण त्या दिवशी
जाणवलं की, तसं काही नव्हतंच, किंवा निदान तुला प्रत्यक्ष
भेटल्यानंतर तरी ते खास काही जाणवलं नव्हतं. पण ह्या नादात आता मी तुलाही
कुठेतरी गुंफवत चाललेय. तुझं मला नशेच्या भरात का होईना तसं बोलणं,आताशा
मला आवर्जून घ्यायला येणं-सोडायला येणं, प्रवासाला जाताना-घरी सुखरूप पोचल्यावर
मला आवर्जून कळवणं, असं बरंच काही तू स्वतःहून करायला लागलेलास. आणि अंगावर शहारा आला.
भीती वाटली त्या व्हॉट इफची. खरंच जर तुझ्याही मनात काही असेल, माझ्या
वागण्याने मी तुला मिसलीड तर करत नाहीये नं? हे सगळं ह्या
वयात? ह्याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मी व्यभिचार म्हणेन! आपलं
लग्न झालंय, षोडश वर्षांची मुलं आहेत! त्यांना जर कळलं की, आईची काय थेरं
चालू आहेत तर काय? हसू नकोस, बावळट!"
तो पोट धरून खो-खो हसत होता आणि तिला
इतका राग आला नं त्याचा. ती इतकी घाबरून, मनापासून बोलत होती आणि तो हसत सुटला होता.
"अगं बावळट,
कुठच्या
कुठे जातेस तू! News flash!! मित्र-मैत्रिणी गप्पा मारू शकतात.
एखाद्या लग्न झालेल्या, मुलं असणाऱ्या तुझ्यासारख्या काकूबाईला जवळचा मित्र असू शकतो!
क्षणभर मला भीती वाटली की मी तुला काही भलते सलते मेसेजेस तर नाही केले. एखाद्या
तिर्हाईतानी ऐकलं तर त्याला वाटेल आपलं खरंच काहीतरी लफडं चालू आहे आणि तू ब्रेकअप
करतेयेस!"
ती अगदीच कावरी बावरी झाली. इतक्या वेळाने पहिल्यांदाच त्याच्याकडे वळून बघितलं. त्याच्या
डोळ्यातलं पाणी जाणवलं की अति हसल्यानी आलंय ते पाणी? खरंच वेड लागलंय
का आताशा? काय खरं काय खोटं?
"बस इकडेच पाच
मिनटं, मी एक सिगरेट ओढून येतो..."
ती काही म्हणणार एवढ्यात तो उठून
गेलाही. तो गेल्याच्या दिशेनी ती बघत राहिली.
तिच्यापासून थोडं लांब जाऊन त्यानं एक
सिगरेट शिलगावली, तिचा धूर छातीत कोंडून घेतला! आणि मग इतका वेळ थोपवून ठेवलेल्या
अश्रूंना वाट करून दिली. त्याच्या पाठीला तिची नजर जाणवली आणि त्यानी पटकन हातातली
सिगरेट फेकून दिली. जवळच्या बाटलीतल्या पाण्याने खसखस चूळ भरली, तोंडावर
पाणी मारलं आणि स्वतःला सावरलं. ती त्याच्याकडेच बघत होती.
"चला मॅडम,
काहीतरी
खाऊया नं? भूक लागलीये खूप! पाणीपुरी दिसतेय, खाऊया?"
तिनी डोळे मोट्ठे करून रागाने बघितलं.
"तुला काही
वाटलंच नव्हतं नं? मग पाणीपुरी खायला काय हरकत आहे?", त्यानी मुद्दाम
तिला चिथावलं. आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्यालाच त्याची चूक जाणवली.
"ए बाई, डोळे
पूस हं, नाहीतर येणाऱ्या-जाणाऱ्यांना मी तुला थोबाडीत मारलीये असं वाटायचं!
हस की गं!", असं म्हणत तिला हवेतच गुदगुल्या केल्या सारखं केलं तेव्हा कुठे ती
थोडीशी रिलॅक्स झाली.
"समोरच उडप्याचं
हॉटेल दिसतंय डोसा खाऊया चल. आज शुक्रवार आहे, व्हेज खा
माझ्यासाठी एक दिवस."
#दीर्घकथा भेट
भाग ६
उडप्याच्या हॉटेलात शिरताना येणारा तो
मंद उदबत्तीचा आणि सांबारचा संमिश्र सुगंध नकळत मनाला शांत करत गेला. टेबल
मिळाल्यावर ते दोघंही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या
मेन्यूकार्डला चाळण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती, तर त्याच
मेन्यूकार्डच्या आडून तो तिचं निरीक्षण करत होता. लांबून बघणार्याला हे दोन
त्रयस्थ वेगळी टेबलं न मिळाल्याने बळजबरी एका टेबलावर बसली आहेत असं वाटलं असतं.
तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलं.
लहानपणी द्वाड, मस्तीखोर
म्हणूनच सगळे ओळखायचे. दर दिवसाआड आईला शाळेत बोलावलं जायचं. शाळेत बाईंचा आणि घरी
आईचा मार ठरलेला. शिक्षा करून करून सगळे दमले आणि मी कोडगा होत गेलो. का वागायचो
मी असं व्रात्य, देवालाच माहिती. पण त्या मस्तीतही ही माझा चांगुलपणा शोधताना जाणवली.
मॉनिटर असताना घरचा अभ्यास तपासायची आणि मी केला नसेल तर बाईंना नावही नाही
सांगायची. अशा माझ्या छोट्या-छोट्या चुका ही सहज न सांगता लपवायची. तिच्याबद्दल
नक्की काय वाटतंय हे समजून घेण्याची अक्कलच नव्हती, त्या वयात.
त्यातच एकदा तिचं नाव गिरवत बसलो होतो,तर अचानक मागून दादा आला. त्यानी वही
खेचून घेतली आणि मला चिडवायला लागला. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचे मित्र मला
चिडवायला लागले. इतका राग आला ना! मग मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. माझा तिच्याशी
काहीच संबंध नाही असं दाखवू लागलो. त्यातच मार्क्स कमी पडल्याने मला वेगळ्या
तुकडीत टाकण्यात आलं. मग तर आणखीनच चिडचिड झाली. सगळ्या दिड शहाण्यांना 'अ'
तुकडीत
आणि आम्हाला 'ब'! आपोआपच हिच्यापासून लांब होत गेलो, जे काही जाणवलं होतं ते तिथेच
संपून गेलं. त्याच्याही नकळत त्यानी बोलायला सुरुवात केली.
“आता मी काय बोलतोय ते ऐकून घे, शांतपणे.
ह्या गोष्टी तू इतक्या मनाला लावून घेतल्या असशील हे जाणवलं नव्हतं. मान्य आहे की
तुला कुठलंही स्पष्टीकरण नकोय, पण मलाही मोकळं होऊ देत आज. आपली दहावी
झाली आणि कॉलेजचे मंतरलेले दिवस सुरु
झाले. त्या काळात घरी नुकतीच लँडलाईन आली होती. माझ्या वाढदिवसाला नेमकी सुट्टी
होती आणि आम्ही सगळे घरी होतो. फोन वाजला आणि बाबांनी उचलला, काहीतरी बोलले आणि मला हाक मारली. "तुझ्यासाठी कोणा मुलीचा फोन आहे. तिला
तुझ्याशीच बोलायचं आहे!" दादा लग्गेच फोनेजवळ येऊन बसला,"हम्म
तिचाच फोन असणार..." मी फोन घेतला पण तोपर्यन्त फोन कट झाला होता. दादानी घरी
सगळ्यांना तू कशी माझ्या मागे पडलीयेस, शाळेत पण माझ्याकडे बघत असायचीस असं
काहीबाही सांगितलं. मीही ते उडवून लावलं. तो
फोन तू केलेलास की दुसऱ्याच कोणी ह्याचाही आजतागायत पत्ता नाही,
पण
तो फोन तूच केलेलास अशी मी समजूत करून घेतली. आणि तुझ्यामुळे दादाला चिडवण्याची संधी
मिळाली म्हणून तुझा आणखीच राग आला! दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा चालू
होत्या… त्यातच एक मुलगी तुझ्या कॉलनीत राहायची, तिनी तुझा
उल्लेख केला. आदल्या दिवशीचा दादाचा राग डोक्यात होताच, मी लगेच तिखट-मीठ लावून तू कशी माझ्या
मागे पडली होतीस ते सगळ्यांना फुशारक्या मारत सांगितलं. पण त्या सगळ्याचा परिणाम
तुझ्यावर काय होईल हे कळलंच नाही, तेव्हा तर नाहीच पण इतक्या वर्षात मी
ते सगळं विसरूनही गेलो होतो गं. नकळत किती
दुखावलं मी तुला- तुला जिच्याबद्दल मला... नाही ते शब्द ओठांवर काय मनातही येऊ देणार
नाही मी!”
तेवढ्यात वेटरनं येऊन
विचारलं, "क्या लेंगे साब?" नको त्या वेळी येऊन नको ते प्रश्न
विचारणं हे वेटरच्या जॉबकोडमध्येच असावं बहुदा.
दोघांनी बराच वेळ
मेनूकार्ड बघून शेवटी इडली-सांबाराची ऑर्डर दिली. खाणं येईपर्यंत ती उगाच इकडे
तिकडे बघत राहिली, तर तो मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत राहिला. भावना मोजक्या शब्दात
मांडणं, ह्यात तिचा हातखंडा होता. तर स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेऊन मुकं
होत जाणं हा त्याचा स्थायी भाव! पण ह्या क्षणी तिनी स्वतःला मिटून घेतलं होतं.
शब्दांनी जणू साथच सोडली होती. आणि बांध फुटल्यासारखा तो बोलता झाला.
"सगळं सगळं
आठवतंय गं मला! शाळेतले ते दिवस, माझा मूर्खपणा, रादर माझे अक्षम्य
अपराध सगळं आठवतंय. माफी मागूनही ते घाव
कधी भरून निघणार नाहीत. मी तुझ्या लायकीचा नव्हतो कधीच. खूप लहान वयातच
सिगरेट, दारूची संगत जोडली. अभ्यासात तर
उजेडच होता. कसा-बसा बी-कॉम झालो. दादाच्या ओळखीनीच नोकरी लागली, मार्केटिंगमध्ये
चिकटलो. मध्यन्तरी कितीतरी मुलींबरोबर लफडी झाली. त्यातच एकीला प्रेग्नन्ट केलं.
आईला कळलं आणि तिनी लग्नाशिवाय पर्यायच राहू दिला नाही. आमचं लग्न झालं खरं,
पण
आम्ही दोघेही एकमेकांबाबत सिरीयस नव्हतोच. त्यात ती प्रचंड श्रीमंत, इंजिनीअर.
त्यांच्या घरी सगळेच उच्च-शिक्षित. तिला आमच्याकडे सगळंच खटकायला लागलं. आम्हाला
खूप गोड़ मुलगा झाला, माझा जीव-की प्राण होता तो. पण तो झाल्यावर ती जी माहेरी गेली ती परत
आलीच नाही. आधी बाळंतपणात आराम, मग मुलाला सांभाळायला कोणी नाही
म्ह्णून, असं करत ती तिकडेच राहिली. तिचीही चूक नव्हतीच म्हणा. माझी व्यसनं
बघता तिला मुलावर ते संस्कार होऊ द्यायचे नव्हते. आईनं मला समजावण्याचा खूप
प्रयत्न केला. बाबा, दादा-वहिनीही मला कुठे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, होमिओपॅथी
सुरू करून बघ असे प्रयत्न करत होते. पण आमचं लग्न टिकलं नाही ते नाहीच.
घटस्फोटाच्या नादात बरीच वर्ष गेली. मला मुलगा हवा होता, पण तोही तिनी
माझ्यापासून हिरावून घेतला. आमचं राहतं घरही कायद्याने तिला द्यायला लावलं.
मुलासाठी मी त्यावरही पाणी सोडलं, आणि पुन्हा आई-बाबांकडे येऊन राहू
लागलो. ह्या सगळ्या धक्क्यांनी आईही आम्हाला अकस्मात सोडून गेली. अवघ्या
बत्तिसाव्या वर्षी डायबिटीस जडला. जगायचाच कंटाळा आला होता, सेल्फ
डिस्ट्रक्शन म्हणजे काय ह्याचा बेमिसाल पुरावा होतो मी.
का माहित नाही पण, त्या
काळात तुझी खूप आठवण यायची. तुला आठवतोय ना तो ड्रंक कॉल त्या काळातलाच! असं
वाटायचं जर मी तुझ्याशी शाळेत धड वागलो असतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात आजही
असतीस, आणि माझी अशी फरपट कधीच झाली नसती. पण ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी
होत्या. मला माहिती होतं की, तुझं लव्ह-मॅरेज होऊन तू सुखात आहेस.
नवराही तुला साजेसा, उच्च-शिक्षित! तुझ्या जगात मला कुठेच स्थान नव्हतं. रात्र-रात्र
नुसते सिनेमे बघत बसायचो दारूच्या संगतीत. बाबांनी खटपट करून ओळखीतल्या एका मुलीशी
लग्न लावून दिलं. तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न केला. दिड वर्षातच
सानियाचा जन्म झाला. तू म्हणालीस ना तसं तिच्या जन्माने मी पूर्ण बदलून गेलो. जगण्यासाठी आता एक वेगळीच उम्मेद आलेली. तिच्या
बोबड्या बोलांनी आणि जबाबदारीच्या जाणिवेनं मला खूपच सावरलं. बघता-बघता कशी वर्ष
निघून गेली कळलंही नाही. खोटं का सांगू, तुझी आठवण येणंही बोथट होत गेलं.
मग गेल्या पाच-सात वर्षात आपला ग्रुप
पुन्हा ऍक्टिव्ह झाला. मिट्स होत गेले. तू असताना शक्यतो यायचं नाही हा अलिखित
नियम पाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण मग तुझे फोटोज, स्टेटस बघितलं
की, एकदा तरी प्रत्यक्षात तुला भेटावसं वाटायचं. मग हळू हळू पुन्हा आपली
मैत्री जुळली, नव्याने तुला जाणून घेऊ लागलो. मनमोकळ्या गप्पा होतानाच कुठेतरी
काहीतरी सुटून गेल्याचं जाणवायचं. पण कधी तू तर कधी मी त्या निसरड्या वळणावरून
परतायचो. पुन्हा कित्येक आठवड्यांचा, महिन्यांचा अबोला, पुन्हा
ग्रुपबरोबर गप्पा-टप्पा, असं चालूच राहिलं. आपण सगळे भेटायचो
तेव्हा मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी कोणी ना कोणी घ्याचंच. त्यात मुद्दामून
तुला सोडायला मीच येईन हयाची खबरदारी घ्यायला लागलो. हळूच एकदा तू गमतीत म्हणालीस,
सोडायला
येतोस तसं घ्यायलाही ये की! मला काय तेवढंच कारण पुरेसं होतं. तेवढाच
पाच-दहा मिनिटांचा तुझा जास्त सहवास! पण सगळ्यांसमोर आपली फारशी मैत्री नाही,
तू
काहीच खास नाहीस ह्याचे नाटकही पुरेपूर करत राहिलो. मी तुला काहीही बोललेलं
नसतानाही तूही शाळेत असताना माझ्या चुका
लपवायचीस तशी माझ्या नाटकात सामील होत गेलीस.
बायकोशी भांडण झालं की असं वाटायचं,
तू असतीस
तर तू खूप समजूतदारपणे घेतलं असतंस. मामेभावाशी भांडण झालेलं तेव्हा तुलाच मेसेज
करून तावातावाने सांगितलेलं. पहिल्यांदाच मनमोकळं रडलो होतो तुझ्याशी चॅट करताना.
कधी छोटा-मोठा अपघात झाला, प्रवासाला जाताना-घरी सुखरूप पोचल्यावर
तुला कळवणं गरजेचं वाटू लागलं. मला कळत होतं की, माझा तुझ्यावर
कोणताच हक्क नाहीये. पण तुला कळवण्याशिवाय राहणंही शक्य नव्हतं.
तुला माहितीये, आजपर्यंत मी स्वतःशी ह्यातलं काहीच
मान्य केलं नव्हतं. स्वतःच्या मनाला मी समजावत होतो की ह्यात काहीही वावगं नाहीये.
तरीही तुझ्याशी केलेलं प्रत्येक चॅट ताबडतोब डिलीट करत होतो. तू केलंस त्या मेडिटेशनची मलाही गरज आहे
बहुतेक. पण मला माहितीये तुझं नसलं तरी माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे!
हो मी आज तरी खोटं नाही बोलू शकत. माझं काही चुकतंय का? गप्प का अशी, बोल ना
काहीतरी!"
त्यानी इतका वेळ बोलून झाल्यावर एक मोठ्ठा श्वास घेतला. त्याच्या
लक्षात आलं की त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले होते आणि तिच्याही डोळ्यातून
अश्रूंचा पूर आला होता . तरीही ती हसत होती. खूपच अजब रसायन होतं ते!
"बावळट, बोल ना ..."
"आजूबाजूला बघ, बाकीचे सगळे केव्हाच निघून गेलेत.
हॉटेल स्टाफही आता आपली ब्याद कधी टळतेय ह्याचीच वाट बघतायेत. डोळे पूस आणि निघूया
आता."
सुरुवातीला त्रयस्थांसारखे बसलेले दोघे एव्हाना सगळा परकेपणा सोडून
गप्पांमध्ये हरवलेले असताना त्यांना डिस्टरब न करण्याचे एटीकेट्स निदान आता तरी सगळेच
वेटर्स पाळत होते. त्याला एकदम चोरट्यासारखं वाटू लागलं. बिल पे करून आणि घसघशीत
टीप ठेवून ते दोघे बाहेर पडले.
#दीर्घकथा भेट
भाग ७ (अंतिम)
बाहेर पडताच त्यांना जाणवलं की,
घरी
सगळे काळजी करत असतील. एक-दोन मेसेजेसही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे,
उशीर
होईल, झोपून जा, असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना छान गार वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकांशी
काहीही न बोलता ते पुन्हा पाषाणच्या दिशेने चालू लागले. एव्हाना
तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा-पुन्हा त्याच्या
दिशेनी झेपावत होती. तरीही ना ती ओढणी सावरत होती, ना तो...
त्याच्या बाईकच्या जवळ पोचताच इशारा मिळाल्यासारखा अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस
येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला. तर ती जगाची पर्वा न करता हात आकाशाकडे
उंचावून त्या जलधारांनी तृप्त होत चिंब भिजत राहिली. तिचं पावसात भिजण्याचं वेड
त्याला पुरेपूर माहिती होतं. तोही मूकपणे तिचं बालपण पुन्हा अनुभवत राहिला. थोड्याच
वेळात, वळिवाचा पाऊस जसा अचानक आला तसाच अचानक थांबलाही.
पाऊस थांबल्यावर तिला जगाचं भान आलं.
तो शेजारी ना दिसल्याने एकदम कावरं बावरं
होऊन नजर त्याचा शोध घेऊ लागली. झाडाखाली आडोशाला त्याला बघून, ती
अगदी खळखळून हसली. थोड्या वेळापूर्वी आलेलं मळभ केव्हाच दूर झालं होतं. कान पकडत
तोही बाहेर आला.
"मला नाही आवडत
अजूनही पावसात भिजायला! तू भिज, थंडीत कुडकुड आणि उद्या छान शिंका देत
बस!"
"बरं बुआ,
मी
आहेच वेडी. पाऊस आला आणि मी भिजले नाही तर तो येण्याचंच थांबवेल असं वाटतं
मला." आणि पुन्हा एकदा तिच्या मनमोकळं हसण्याचा सडा पडला.
थोड्या अंतरावर असणाऱ्या चहाच्या
टपरीतून आल्याच्या चहाचा सुगंध मातीच्या सुगंधाशी चढाओढ करू लागला. तशी त्यांची
पावलं आपसूकच त्या दिशेने वळली. असं मनसोक्त भिजायचं आणि टपरीवरच्या चहाचे घुटके
घेत ऊब आणायची, हे तिचं ठरलेलंच! ह्या आधी कितीतरी वेळा असं पावसात भिजल्यानंतर ती
हमखास जगजीतची तिची आवडती गझल ऐकायची, त्याचीच तिला आठवण झाली.
कभी यूँ भी तो हो
ये बादल ऐसा टूट के बरसे
मेरे दिल की तरह मिलने को
तुम्हारा दिल भी तरसे
तुम निकलो घर से
कभी यूँ भी तो हो...
कभी यूँ भी तो हो
तन्हाई हो, दिल हो
बूँदें हों, बरसात हो
और तुम आओ
कभी यूँ भी तो हो...
आणि आज स्वप्नवत ते सगळंच होत होतं. स्वतःच्या हाताला चिमटा घेऊन तिनं वास्तवात पाऊल ठेवलं. इथून पुढे
काय? जे काही मनात होतं ते बोलून तर मोकळे झालो. त्यानी काही बोलावं अशी
अजिबात अपेक्षा नव्हती. खरं तर तो सगळं ऐकून घेईल आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल
काहीच असं नव्हतं, तुझाच गैरसमज झालाय, माझ्या गळ्यात पडू नकोस, असं
काहीतरी ऐकून घेण्याची तयारी होती तिची. पुर्वीसारखंच, अजून कोणाकडून
तरी ती त्याच्या कशी मागे पडलीये, हेही भविष्यात ऐकायला मिळेल असंही एकदा
वाटून गेलं होतं. आणि आता ते दुःख झेलण्याची तयारी नसल्यानी उगाच मनाची समजून
काढलेली की असं काही नव्हतंच! त्या गावची मी नव्हेच! एकदा वाटलं होतं, मनातलं सगळं
बोलण्याची आपली हिम्मतच होणार नाही. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून
साडेसातपर्यंत आपण घरीही पोहोचले असू, असे काय अन काय विचार येऊन गेले होते
त्याला भेटायच्या आधी. पण तो असं काही बोलेल ह्याची जराही जाणीव नव्हती तिला.
टपरीवर स्टोव्हजवळ उभं राहून ती
पातेल्यातला चहा उकळताना बघत होती. स्टोव्हच्या धगीनी थंडी हळहळू कमी होत होती की
मनातल्या विचारांच्या कल्लोळानी? त्याचीही अवस्था विचित्र होती. चिंब
भिजलेल्या तिच्याकडे मन भरून बघत बसावं की वेल्हाळ मन आवरून चहाकडे नजर फिरवावी?
चहावाल्यानीच मग मौन तोडलं,
"अहो तुम्ही दोघांनी कितीही वेळ चहाकडे बघितलं ना तरी त्याला उकळायला
जेवढा वेळ लागणार आहे, तेवढा लागणारच, काय? थोडी सबुरी
करा..."
खरंय, सबुरी तर
करावीच लागणार. दोघंही कसनुसं हसून शेजारच्या बाकड्यावर टेकले. तिनं उगाच केस
झटकले, ओढणी अंगभर लपेटून घेतली. त्याची नजर आपल्याकडेच आहे हे जाणवताच तिच्या
अंगभर शहारा फुलला. तेवढ्यात चहा आला. गरम गरम ग्लास हातात घेऊन हळूच फुंकर मारत
तिनं चहाचा पहिला घोट घेतला. त्या घोटानी तिला चांगलीच तरारी आली. मग त्याच्याकडे
वळून तिनं बोलायला सुरुवात केली...
"खरं तर तू काही
बोलावंस अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज मनातलं सगळं खरं खरं बोलायचं
ठरवलंय म्हणून मनापासून सांगते, खूप खूप छान वाटलं. षोडश वर्षीय
तरुणीसारखं मन अगदी पिसासारखं हलकं झालंय. पण आता इथून पुढे काय? आपापल्या
जबाबदाऱ्या, संसार ह्या सगळ्याला विसरून तर नाही चालणार ना? आपलं
मन मोकळं होणं खूप गरजेचं होतं. मनातल्या व्हॉट
इफची उत्सुकता संपवायची होती. निदान मला तरी
एकदा प्रत्यक्ष भेटून सगळं बोलण्याची नितांत गरज वाटत होती. आणि आता जाणवतंय की
तुलाही तसंच वाटत होतं, पण पुढाकार घेणार कोण? मूग गिळून बसण्यात साहेबांचा इगो
सुखावतो नं. पण
माझी ह्याउप्पर काहीच अपेक्षा नाहीये. माझ्या नवऱ्यावर माझं जीवापाड
प्रेम आहे, माझ्या मुलांना एक सुरक्षित संपूर्ण कुटुंब मिळालंच पाहिजे, ह्याचीही
पूर्ण जाणीव आहे.”
"अगं हो, किती
पटापटा बोलतेस! जरा थांब, चहा संपव तो गार व्हायच्या आधी. मलाही
परिस्थितीची जाणीव आहे, म्हणूनच तर ह्या आधी कधी ह्या भावनांचा उच्चारही केला नाही ना मी. आपली आहे ती निखळ मैत्री टिकवून ठेवायची. जे आहे ते आहे,
त्याला
नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आपण इतकी वर्ष प्रयत्न केले, पण ते निष्फळच
ठरले ना. आतापर्यन्त एकमेकांना सावरत आलोय तसं सावरत राहायचं. ही वाट खूप निसरडी
आहे. स्त्री-पुरुष हे नातंच इतकं गुंतागुंतीचं आहे की ते कोणाला समजावणं-कोणी
समजून घेणं हे अशक्यच आहे. आपलं नातं आपल्यापुरता सिमित राहील ह्याची मी हमी देतो. तुझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला आपल्या जागी ठेवून बघितलं तर त्यांच्याशी प्रतारणा होतेय असंही वाटतंय. कारण शारीरिक संबंधांपेक्षाही आपली मनं गुंतली आहेत आणि सामाजिक चौकटीत तो व्यभिचार म्हणूनही गणला जाईल. पण आपलं मन स्वच्छ आहे, हे आपल्याला माहितीये. एकाच वेळी दोन व्यक्तींवर प्रेम कसं काय असू शकतं ? असा प्रश्न मलाही पूर्वी पडायचा. पण काही प्रश्नांनाही उत्तर त्या प्रसांगातुन गेल्यावरच कळतात. आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया. माझ्याकडून चुका होणार नाहीत, ह्याची मी कशी खात्री देऊ? मीही माणूसच आहे. पण मला सावरायला तू आहेस, ह्याची खात्री आहे. हक्क नाही गाजवणार, पण तू आहेस हा विश्वासच मला खूप बळ देईल!"
"खरंय तुझं. आपलं
नातं ह्यापुढे जाणं शक्य नाही. जे आहे तेच छान जपूया. ह्यापुढे कधी चॅट करताना ते
कोणीही वाचलं तरी आक्षेपार्ह्य वाटणार नाही, ह्याची काळजी
घेऊया. म्हणजे डिलीट करण्याची गरजच वाटणार नाही. तसं काही बोलतच नाही म्हणा आपण,
पण
चोराच्या मनात चांदणं म्हणून डिलीट करत होतो. आता तेही नाही करायचं. आपल्या
मुलांना ते वाचून, आपली मैत्री बघून लाज/तिरस्कार तर नाही वाटणार ना ह्याचा विचार केला
पाहिजे."
"इतिहासात असायचा
तसा तहनामा करून सतराशे साठ कलमे पाठ करून घेणार आहेस का आता? हे
नाही करायचं, ते नाही करायचं... ऐकून घे, जे होणं शक्य नाही त्या कशालाच मी हो म्हणणार नाहीये! एवढा विश्वास तर ठेव माझ्यावर.
माझंही माझ्या बायकोवर, मुलीवर प्रचंड प्रेम आहे. सानियाला मला गमवायचं नाहीये, जसं
मी माझ्या मुलाला गमावलंय. ह्या जन्मात काळाने मात केलीये, मी पुढच्या
जन्मी मला वेळेत अक्कल यावी ह्यासाठी प्रार्थना करीन. आणि तू अशीच राहा, नेहमी
भांडतेस तशीच हक्कानी भांडत राहा. जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरीही तुझं माझ्या
आयुष्यात असणं, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला ते नजर अंदाज मधलं गाणं आठवतंय का?
इक
आधी कहानी थी, जो मिल के सुनानी थी... त्यात तो म्हणतो ना, तुम कभी मेरे थे,
बस
ये भी गवारा है.. तसंच!"