Monday, February 13, 2023

परीकथेतील राजकुमारा...

    ह्या वर्षीचा व्हॅलेंटाईन तिच्यासाठी खास होता, लग्नांनंतरचा पहिलाच! इतकी वर्ष बाकीचे प्लॅन्स करत असताना, ह्या दिवसाची तिनं कित्ती स्वप्न रंगवली होती. पण ठरवून जुळवून केलेल्या लग्नात त्याचा अजून फारसा थांगपत्ता लागत नव्हता. जेमतेम तीन महिने झालेले लग्नाला. एखादा पुसटता स्पर्श अजूनही अंगावर काटा फुलवत होता. त्यातून घरात जॉईंट फॅमिली असताना तिची फारशी अपेक्षाही नव्हती. पण तरीही मनात हुरहूर होती. निदान एखादा गुलाब मिळावा, किंवा सकाळी पोळ्या करत असताना त्यानं हळूच कानात येऊन म्हणावं,"Will you be my valentine?" 

    किंवा तो भलताच रोमँटिक असेल तर त्यानं सुचवावं, "आपण सुट्टी घेऊन आजचा दिवस खास एकमेकांबरोबर घालवूया. कॉलेज बंक करायचो तसं आज ऑफिस बंक करून मस्त भटकूया. तुझ्या आवडत्या माटुंग्याला जाऊन साऊथ इंडियन नाश्ता करूया आणि मग दोघं मिळून खरेदी करूया. मग तुझ्या आवडीची मुव्ही बघू, मस्त चायनीज हादडू आणि संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर भटकूया. रात्री खूप उशिरा घरी येऊ, मग तू तो हनिमूनला घातलेलास ना तो गाऊन घालाशील नं?" नुसत्या कल्पनेनंच तिच्या गालावर गुलाब फुलत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तिला ह्यापेक्षा जास्त काही सुचतही नव्हतं. 

    पूर्वी कधी तरी वाचलेल्या कादंबरीतल्या हिरोसारखा असला तर तो? अरे बापरे! मग तो येईल, म्हणेल , "तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे, तू दोन दिवस सुट्टी टाक." मग तो माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधेल आणि गाडीत बसवेल. पट्टी उघडल्यावर कळेल की आपण ताजच्या लॉबीत उभे आहोत. इतके दिवस गेटवेवर उभं राहून जे लांबून बघायचो तिकडे आज आपण राहणार आहोत! संध्याकाळी त्यानं सनसेट क्रूझ बुक केली असेल. त्यासाठी त्यानं माझ्यासाठी छानसा स्ट्रॅपलेस गाऊन आणला असेल, रोमँटिक मूव्हीजमध्ये असतो ना अगदी तसाच! जो मला अगदी मापात बसेल. तोही ब्लॅक ब्लेझर, व्हाइट शर्टमधे रुबाबदार दिसेल. मग आमच्यासाठी खास एक टेबल बुक असेल त्यावर कॅण्डल लाईट डिनर असेल. आम्ही दोघं छानसा बॉल डान्स करू, जसं काही वर्षानुवर्षं गणपती डान्सऐवजी गिरगावात ह्याच स्टेप्स गिरवत होतो. स्वप्नरंजनातही तिला हसू आलं! कुठच्या कुठे भरकटत जाते मी... 

    ह्यातलं काहीही झालं नाही तरी निदान तो अन-रोमॅण्टीक नसावा. "वर्षातले सगळेच दिवस सारखे असतात, प्रेमासाठी काय हे परदेशी चोचले!", असं म्हणणारा तर नक्कीच नसावा. पण आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं. लग्नाआधी ह्या अपेक्षाही जुळवायच्या असतात हे कोणी सांगितलंच नव्हतं. काहीही झालं तरी जुळवून घ्यायचं, हेच संस्कार देऊन तिची पाठवणी झाली होती-चारचौघींसारखी. त्यामुळॆ तेराच्या रात्री तिनं ह्या सगळ्या विचारांना आवर घातला. अजूनही त्यानं काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे उद्याच्या डब्याची तयारी करून, त्यातल्या त्यात उद्या डब्यात बीट बदामाच्या आकारात कापून देऊ अशा विचारानं तिनं बीट उकडवून ठेवलं. उद्या काही विशेष आहे हे घरच्या कोणाच्या गावीही नव्हतं आणि त्याच्या तर मुळीच नाही. उगाच राग-राग आल्यासारखं झालं. पण मग स्वतःलाच समजावलं कि, त्याला माझ्या मनात काय-काय चाललंय ह्याचा कसा पत्ता असेल? उगाच काय रागवायचं. जाऊदेत उद्या लंच टाईमला खाली उतरून कॅडबरी घेईन आणि एकटीच खाईन, लग्नाआधी खायचे तशी. अशी समजूत घालून, उद्याचा अलार्म लावून ती झोपायला गेली. तो तर एव्हाना घोरूही लागला होता. 

    सकाळच्या गडबडीत वॅलेन्टाईन वगैरे विसरलंच गेलं. हिच्या पोळ्या होईस्तोवर सासूबाईंनी बीटाची खसखस किसून कोशिंबीर करून टाकली आणि बीटाचे बदाम हिच्या कल्पनेतच हसू लागले. पटापटा आवरून, डबे घेऊन ते दोघे खाली उतरले. त्यानं स्कुटर काढली आणि ती सवयीनं मागे येऊन बसली. तसं त्यानं म्हंटलं, "ऐक नं, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे!"

No comments:

Post a Comment